सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

अपॉइंटमेंट (वि. वा. शिरवाडकर)


वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे एक अभिजात कवी, कल्पनारम्य नाटककार, कादंबरीकार आणि शैलीदार ललित लेखक म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. तरी एक कथालेखक म्हणून त्यांचा परिचय आपल्याला फारसा नाही. पण शिरवाडकरांची प्रतिभा कथालेखन क्षेत्रातही त्याच तोलामोलाची आहे, हे अपॉइंटमेंट कथासंग्रह वाचल्यावर जानवते.

एकूण तेरा कथा असलेल्या या संग्रहात वेगवेगळे भाव लेखकाने व्यक्त केले असून आपल्या नानाविध लेखन शैलीने या संग्रहाला सजवले आहे. कर्णाच्या जीवनावर थोडक्यात दृष्टिक्षेप टाकणारी 'रथचक्र' ही कथा विशेष असून रस, सीतेचे चित्र, आघात आणि पाहुणे या कथा फार भावस्पर्शी आहेत.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. आगगाडी डोळ्यांसमोरून निघून जाते. नंतर तिचा आवाजमात्र कानांवर येतो, आणि पुढे तोही नाहीसा होऊन आगगाडी कुठं गेली हे दर्शविणार काळे लोखंडी रूळ मात्र दृष्टीला पडतात! (पान ९)
२. परंतु स्टेशनवरचे बिघडलेले नळ, चावी मागेपुढे कितीही फिवरली तरी सारखे वाहत राहतात त्याप्रमाणे त्याचं प्रदीर्घ भाषण आमच्या उद्गारांनी  खंडित होऊ शकले नाही (पान ३०)
३. कर्तव्याकर्तव्याच्या भयानक संघर्षातून अंतःकरणाला जाळणाऱ्या विविध यातनांतून सुटण्याचा हा एकच उपाय आहे. मित्रासाठी लढायचे आणि भावासाठी मरायचे. त्यामुळे भावांचा मार्ग मोकळा होईल आणि मित्रासंबंधीचे आपले कर्तव्यही पार पडल्यासारखे होईल : कर्ण (पान ५०)

बहुत काय लिहीणे.


प्रकाशन : काॅन्टिनेन्टल
प्रथमावृत्ती : जानेवारी १९७८
पाने : १७५
किंमत : १५०

~ गणेश

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

आपुलकी (पु. ल. देशपांडे)



शाळेत असतांना (बहुतेक इयत्ता नववीत) अभ्यासक्रमात संत नामदेवांचा फार सुंदर अभंग होता.

परिसाचेनी संगे लोह होय सुवर्ण|
तैसा भेटे नारायण संतसंगे ||

अर्थात परीसासोबत राहिल्याने लोखंडाचे पण सोने होते. तसेच संतांबरोबर राहिल्याने देवाची प्राप्ती होते. असा या अभंगाचा मतितार्थ आहे. मी या अभंगाचा उल्लेख यासाठी करत आहे कारण असेच अनेक परीस पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यात येऊन गेले आणि त्याच्या आयुष्याचे खरोखरच सोनं झाले. हा ग्रंथ वाचल्यावर पु. ल. देशपांडे किती समृद्ध आयुष्य जगले असतील याची कल्पना येते. पु. ल. देशपांडे यांनी लिहलेला प्रत्येक ग्रंथ आणि त्या ग्रंथाची प्रत्येक ओळ म्हणजे वाचकांसाठी अद्वितीय अनुभव आहे. त्यासाठी कुठल्याच समीक्षेची गरजच नाही. मला त्यांच्या साहित्याची समीक्षा करण्याचा अजिबात अधिकार नाही पण ही माझी समीक्षा नसून असला विलक्षण ग्रंथ हातात पडल्यावर निघालेले आनंदाचे उद्गार आहेत.

पु. ल. देशपांडे यांना आपल्या जीवनात भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आठवणीचा शब्दबद्ध केलेला ठेवा म्हणजेच 'आपुलकी' होय. या ग्रंथात भाईंनी पंधरा व्यक्तिमत्त्वाचा उलगडा केला आहे. यात इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, कवी गिरीश ऊर्फ प्रा. शंकर केशव कानिटकर, श्री. रा. टिकेकर, माधव आचवल, शरद तळवलकर, आवाबेन देशपांडे, वसंतराव देशपांडे, अनंत काणेकर, शिक्षण तज्ञ जे. पी. नाईक, शंकर घाणेकर, कवी सदाशिव अनंत शुक्ल, माधवराव वालावलकर, मटा संपादक गोविंदराव तळवलकर, नाटक प्रेमी मदनमोहन लोहिया आदींचा समावेश यात आहे.

प्रत्येक व्यक्ती बरोबर आपली ओळख कशी झाली यापासून ते थेट त्या व्यक्तीचा त्या त्या क्षेत्रातील कार्याचा आवाका, सहवासातील गमती जमती ह्या पुलंनी आपल्या अद्वितीय शब्दात वर्णन केल्या आहेत. आयुष्यात एकदातरी नक्की वाचावे असला हा ग्रंथ आहे. यातील बहुतेक व्यक्ती आता कोणाच्याही स्मरणात नसतील. हेच त्या व्यक्तींचे मोठेपण आहे. कारण यातील एकही जण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काम करत नव्हता. ध्येय वेडाने झपाटलेली ही माणसे शेवटपर्यंत साहित्य, कला, संगीत, नाटक, शिक्षण, समाजकार्य असल्या क्षेत्राच्या उन्नतीसाठी झगडत राहिली. काळाच्या ओघात आपणही त्याचे कार्य विसरत चाललो आहेत ही नक्कीच शोकांतिका आहे.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. प्रतिभासंपन्न कलावंताला सर्वसामान्यांपेक्षा अधिक दिसत असते, अधिक ऐकू येत असते, किंबहुना त्याच्या साऱ्या इंद्रियांना सारेच काही अधिक जाणवत असते. (पान ४३)

२. आणि पायांनी कुणीतरी रांगोळी विस्कटावी तसे ते गाणे कानांवर येता येता विस्कटले जाते. त्याच्या नसण्याच्या वेदनेवर ते सूर मात करू शकत तर नाहीच, पण तिची तीव्रता वाढवतात. (पान ७२)

प्रकाशक :मौज प्रकाशन गृह
प्रथमावृत्ती : ८ नोव्हेंबर १९९८
पाने : १४०
किंमत : १२५

~ गणेश

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

कविता : कुमार सैनिक

अंगावर दारुगोळा बांधलेला
हातात आधुनिक बंदुका घेऊन
तो 'कुमार सैनिक'(?) निघाला
आपल्या धर्माची रक्षा करण्यासाठी
‘त्या’ धर्माच्या लोकांची
हत्या करण्यासाठी
तो नियंत्रण रेषा ओलांडून आतही आला
आपल्या युद्ध भूमीत
पंधरा सोळा वर्षाचा तो कुमार
हातात लेखणी पुस्तका ऐवजी
त्याच्या हतात होती खतरनाक बंदुक
लाल रक्ताच्या शाईने तो
लिहणार होता आपल्या वहीत
स्वतःचीच आत्मगाथा
खेळणीच्या बंदुकाबरोबर खेळण्याच्या वयात
रेषेच्या पलिकडची बालके खेळतात
खऱ्याखुऱ्या बंदुकांशी
कारण त्यातूनच तर ते होणार आहेत
भविष्यातले योद्धे!
कशासाठी........?
दुसर्‍याला ठार मारण्यासाठी
ते आत्ताच घेतात शिक्षण
मग त्यांना बाकीचे शिक्षण व्यर्थच
'तुम्ही मरा नाही तर जगा
पण रेषे पलिकडच्यांना ठार मारा'
हिच त्यांची शिकवण असते
आणि ध्येय त्यांचे फक्त मरण असते
अनेकांचे बळी घेऊन मारतात हे
किडा-मुंग्यांसारखे, अगदी बेवारस
ज्या भूमीतून ते शिक्षण घेऊन येतात
ती भूमीही त्यांना स्वीकारीत नाही
शेवटी माती इथेच मिळते
तीही साम्मानाने!

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा, शारजा (UAE)





पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा, शारजा (UAE)
दिनांक : १६ सप्टेंबर २०१६

ग्रंथ तुमच्या दारी, दुबई आणि आमी परिवार (Akhil Amirati Marathi Indians) यांच्या संयुक्त विद्यमाने शारजा युनिव्हर्सिटी सभागृहात पहिल्या आंतरराष्ट्रीय वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रवीण दवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त व उद्योजक श्री विश्वास ठाकुर,  दुबईत ग्रंथ तुमच्या दारीला सुरुवात करून देणारे व प्रसिद्ध उद्योजक डाॅक्टर संदिप कडवे, आमी परिवाराचे संस्थापक संतोष कारंडे, आमीचे मुख्य कार्यकारी आधिकारी नितीन साडेकर, प्रसिद्ध अनुवादक आणि लेखक श्री रवींद्र गुर्जर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वालिशा किरपेकर ,सानवी सावंत ,स्वरदा पाटील ,अवनीं रिसबुड या चिमुकल्या मुलींनी गायलेल्या सरस्वती वंदनाने झाली. युएईच्या विविध भागातून आलेले जवळपास ४००—५०० वाचक प्रेमी मराठी बांधव या मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी डाॅक्टर संदिप कडवे यांनी संपादित केलेल्या 'विश्व पांथस्थ' या पहिल्या आखाती मराठी मासिकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रवीण दवणे यांच्या 'एक कोरी सांज' या नव्या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आमी परिवाराचे कार्य व उद्देश यावर श्री संतोष कारंडे आणि श्री नितीन साडेकर यांनी माहिती दिली. सोशल नेटवर्किंगचा सदुपयोग करून श्री कारंडे यांनी गेल्या पाच महिन्यात युएईतील जवळपास अडीच हजार मराठी माणसांचे संघटन केले आहे. त्याचा पुढील उद्देश हा युएईतील सर्व दीड लाख मराठी बांधवा पर्यंत पोहचण्याचा असून आमीच्या माध्यमातून चालवलेल्या सामाजिक उपक्रमाची त्याच बरोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या उद्योग जत्रेची माहिती त्यांनी यावेळी दिली. डाॅक्टर संदिप कडवे यांनी विश्व पांथस्थ मासिक बाबत माहिती देऊन सर्व वाचकांना आपले अनुभव, लेख आणि कविता या मासिकात छापण्यासाठी पाठवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते श्री प्रवीण दवणे यांनी सादर केलेली दोन विषयांवरील व्याख्याने. पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात 'माझ्या लेखनाची आनंदयात्रा' आणि दुसऱ्या सत्रातील 'सावर रे' सादर करून रसिक प्रेक्षकांना मोहित केले. माझ्या लेखनाची आनंदयात्रा मध्ये श्री दवणे यांनी आपल्या जीवनातील साहित्यिक प्रवासाचे अत्यंत सुंदर वर्णन केले. आपले बालपणीचे विविध अनुभव सांगून त्यांनी श्रोत्यांना कधी हसवले तर कधी भावनिक बनवले. आजच्या आधुनिक काळात तरूण पिढी मोबाईल सारख्या उपकरणांच्या आहारी जावून वाचन संस्कृती विसरत चालली आहे. पैश्याच्या मागे न धावता खऱ्या बौद्धिक श्रीमंतीच्या मागे लागा, मातृभाषेवर प्रेम करा आणि वर्तमानात जगा असा संदेश त्यांनी दिला. दवणे सरांनी आपल्या आयुष्यात पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या सहवासात अनुभवलेल्या अनेक आठवणी ताज्या केल्या. सावर रे या शेवटच्या सत्रात दवणे सरांनी विविध विषयांवर चर्चा करून आपल्या ओजस्वी वाणीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध कले.

ग्रंथ तुमच्या दारी तर्फे युएई वाचकांसाठी नवीन चार ग्रंथ पेट्या श्रीकांत पैठणकर आणि राकेश पंडित यांच्या हस्ते श्री गणेश पोटफोडे (देअरा, दुबई), समिश्का जावळे (इंटरनॅशनल सिटी, दुबई) आणि वीरभद्र कारेगावकर  यांना प्रदान करण्यात आल्या.
डॉ सुप्रिया सुधाळकर यांनी ६— १२ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट नाट्य वाचन करवून घेतले. आखाती देशात जन्मलेल्या/ वाढलेल्या मुलांचे मराठी वाचन ऐकून श्री प्रवीण दवणे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले. पार्थ जोशी, आहान सुधाळकर, शुभ्रा सप्रे, वेदांत खाचणे, साकेत पलांडे , संकेत दिक्षीत, मिहिका भोळे , अवनी गोडबोले, हिमानीश चोथे या मुलांनी आपल्या वाचनाने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ग्रंथ तुमच्या दारी  तर्फे घेण्यात आलेल्या 'ग्रंथ पेटीने मला काय दिले' आणि 'मला भावलेले पुस्तक' या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेते दिव्या करमरकर, गुरूदेव माने, रश्मी निसाळ, योगिता रिसबूड आणि गणेश पोटफोडे यांना प्रवीण दवणे यांच्या स्वाक्षरीतील ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. तर आमी परिवारातर्फे आयोजित गणपती सजावट स्पर्धेतील विजेते सागर कोकणे, बाल चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्वरदा पाटील, झोया करंदीकर आणि अवनी रिसबूड यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री व प्रसिद्ध निवेदिका अनुजा पडसलगीकर यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
वाचकांना सहजपणे प्रश्नोत्तरांमधे गुंगवून प्रचिती तलाठी यांनी त्यांना  सहभागी करुन घेतले.
या मेळाव्याला ग्रंथ तुमच्या दारीचे समन्वयक निखिल व नेमिका जोशी,  श्रीकांत व अपर्णा पैठणकर , तसेच आमी परिवार स्वयंसेवक टीमचे रघुनाथ सगळे, संदिप पंडीत यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
ग्रंथ तुमच्या दारी समन्वयकांच्या वतीने धनश्री वाघ-पाटील आणि किशोर मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
मेळाव्याच्या प्रमुख संयोजिका विशाखा पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता अभिलाषा देसाई या चिमूकलीने गायलेल्या पसायदानाने झाली.

-    गणेश पोटफोडे (दुबई)