बुधवार, २ एप्रिल, २०१४

गायीची आर्त हाक

कारे आटली ममता कुणब्या
मज विकिशी तू कसाया
 
भरभरून चऱ्या दुधाच्या
आर्पिल्या तुझ्याच घराला
माझ्या वासरांना ठेवूनी उपाशी
पोशिले तुझ्याच लेकरांना 

आडीनडीच्या काळामध्ये
मीच तुजला तारीत आले
दुधातुपाच्या पैश्यामाधुनी
दसरा दिवाळी सण तू केलेस 

तेहतीस कोटी देव समजुनी
माझे तू पूजन केलेस
पवित्र होण्यास मूत्र माझे
कितीदा तू घरात शिंपलेस 

माझ्या वासरांचे बैल झाले
शेती कसायला कामं आले
माझ्या शेणखताच्या जीवावर
हिरवेगार शेत तू पिकविलेस 

एका पेंढीच्या चाऱ्यासाठी
तुझी माणुसकी कशी संपली
विसरुनी उपकार आयुष्याचे
तू मजला कापाया देशी 

कारे आटली ममता कुणब्या
मज विकिशी तू कसाया 

- ©गणेश पोटफोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा