भल्या पहाटे शुक्राची
चांदणी उगवते
तांड्या वरल्या
चुल्हीच्या धुराड्यात
परत ती लपून जाते
अन लगबग सुरु होते
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी!
कोपीतल्या मंद कंदिलाच्या
प्रकाशात
भाजतात भाकरी दिवसभराच्या
मळकटलेल्या गोधडीवर
निजलेली लेकरं
उठतात तांड्यावरल्या कलम्ह्यानं
अन न सांगताच जावून
झोपतात गाडीत
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी!
जुंपल्या बैलगाड्या
निघाल्या फडाकडे
न सांगताच बैलही धावले रोजच्याच वाटानं
एका हातात 'कोयता' अन दुसऱ्या हातात?
'तान्ह लेकरू'
गारठ्यानं कुडकुडनारं
उराशी बिलगलेलं अन शांत
झोपलेलं
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी!
चालत्या गाडीतच होते
सकाळची न्याहारी
भाकरीच्या सोबतीला असते
मीठ मिरची
उजाडायच्या आधीच होते
कामाला सुरुवात
लेकरं खेळती पाचरटात
आम्ही असतो फडात
गारठ्यातही फुटतो आम्हाला
दरादरा घाम
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी!
सपासपा चालतो जीवलग आमचा 'कोयता'
मग जमवतो मागे कष्टाच्या
मोळ्या
दिवस चढताच भरायची असते
गाडी
फॅक्टरीच्या प्रवासात
उरलेली चटणी भाकरी
रोजच्या दिवसाचा असाच
आमचा पाढा
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी!