गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

जाॅर्जिया भ्रमंती : भाग १

२५ डिसेंबर २०१८ : जाॅर्जियात आगमन
दुबईहून तीन तासांच्या प्रवासानंतर आमचे विमान तिब्लिसी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानाची उंची जशी कमी होऊ लागली तशी आम्हाला हिमाच्छादित पर्वतशिखरं दिसू लागली आणि माझी उत्सूकताही वाढू लागली. मी अजून हिमवृष्टी कधी अनूवली नव्हती म्हणूनच आम्ही हिवाळ्यात खास हिमवृष्टी अनूभवण्यासाठी जाॅर्जियात फिरायला येत होतो. तसे पाहिले तर जाॅर्जियामध्ये फिरण्यासाठी उन्हाळा हा योग्य ॠतू आहे (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर). या काळात जगभरातील असंख्य पर्यटक जाॅर्जियाचे निसर्गसौंदर्य अनूभवण्यासाठी येतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर हा छोटासा देश एखाद्या नवरीसारखा सौंदर्याने नटून जातो.
तिब्लिसी ही जाॅर्जियाची राजधानी आणि या देशातील सर्वात मोठे आणि महत्वाचे शहर आहे. तिब्लिसी चा स्थानिक भाषेत अर्थ 'उबदार शहर' असा होतो. हे शहर एका खोऱ्यात वसलेले आहे. दोन बाजूंनी डोंगर रांग आणि शहराच्या मधोमध वाहणारी कुरा नदी, शहरात असणारे गरम पाण्याचे झरे यामुळे या शहराची ओळख ही उबदार शहर म्हणून प्रसिद्ध असावी. या शहराची स्थापना पहिल्या वख्तांग राजाने इ. स. पचव्या शतकात केली होती. तेंव्हापासून तिब्लिसी हे जाॅर्जियाच्या विविध राजघराण्याची राजधानी राहीली होती.
विमानतळच्या बाहेर पडल्याबरोबर आम्ही बॅगेत इतक्यावेळ ठेवलेली स्वेटर मफलर बाहेर काढले. पारा चार अंशावर होता आणि वाऱ्यामुळे थंडी अंगाला झोंबत होती. मला तर हुडहुडीच भरली. थंडीने अंग लटलट कापू लागले. ज्याचा अनूभव घ्यायचा होता त्याची सुरुवात विमानतळावरूनच झाली.
स्थानिक लोक बऱ्यापैकी इंग्रजी बोलत होते त्यामुळे भाषेची काही अडचण येणार नव्हती. आम्हाला विमानतळावर घेण्यासाठी आलेला ड्रायव्हर डेव्हिड हा सुद्धा चांगल्याप्रकारे इंग्रजी बोलत होता. विमानतळ ते हाॅटेल हे अंतर अर्ध्या तासाचे होते. रस्त्याच्या दुतर्फा खरीखुरी ख्रिसमसट्री पाहुन ओवीला फार आनंद झाला. आम्ही हाॅटेलवर पोहचलो तेव्हा अंधार पडू लागला होता. हिवाळ्यात जाॅर्जियात सुर्योदय सकाळी साधारण साडेआठला तर सुर्यास्त संध्याकाळी पावणे सहाच्या आसपास होतो. आमचे हाॅटेल छोटेखानीच होते आणि ते कुरा नदीच्या शेजारीच असल्याने खूप आनंद झाला. हाॅटेलच्या बाल्कनीतून तिब्लिसी शहर आणि बारमाही वाहणाऱ्या कुरा नदीचे विहंगम दृश्य नजरेस पडले.
सामान ठेवून आम्ही बाहेर फेरफटका मारायला निघालो. बाहेर खरोखरच खूप थंडी होती. शहरात रस्त्याच्या दुतर्फा लावलेली मॅपलची झाडं शोभून दिसत होती. थंडीमुळे मॅपलची पानं पिवळी पडली होती. वाऱ्याने वाळलेली पानं रस्त्यावर पडत होती. चौका चौकात काही दुकाणे नजरेस पडली. बेकरी हा तिथला महत्वाचा व्यवसाय असावा कारण ठिकठिकाणी आम्हाला बेकरीची दुकाणे दिसली. हाॅटेलमध्ये आम्हाला पाणी विकत घ्यावे लागणार होते म्हणून आम्ही कॅरीफोर सुपरमार्केट मध्ये जाऊन स्वस्तातील पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या.
प्रवासाने आम्ही दमलो होतो त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही लवकरच झोपी गेलो. दुबई आणि जाॅर्जियाची प्रमाणवेळ सारखीच असल्याने काही त्रास झाला नाही.

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

दुबईतील अनुभव

२०११ साली मला दुबई, युएई येथे नोकरीची संधी मिळाली आणि मी दुस-यांदा नोकरीसाठी आखातात आलो. सौदीच्या अनुभवाचा मला दुबईत रूळण्यास खूप फायदा झाला. आज मी दुबईत इंजिनिअर या पदावर काम करत आहे.

दुबईतील आणि सौदी अरेबियातील हवामान यात फारसा फरक नव्हता. सात महीने कडक उन्हाळा. पावसाळा हा ॠतूच येथे नाही. हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान थोडाफार पाऊस पडतो. परंतु या दोन देशात महत्वाचा फरक होतो आणि तो म्हणजे दुबईतील मोकळे वातावरण . या देशात लोक आपले उत्सव, सण हे मुक्तपणे साजरे करू शकतात. त्यामुळेच बहुधा येथे मोठ्या संख्येने भारतीय लोक कुटुंबासोबत राहातात. दुबईत भारतीयांची संख्या जवळपास चाळीस टक्के आहे. त्यात मराठी माणसांचा वाटा देखील खूप आहे. एक सामान्य कामगारापासून ते थेट मोठ्या उद्योजकापर्यत येथे मराठी माणसांची वर्गवारी होवू शकते. मराठी उद्योजकांनी दुबईत महाराष्ट्रचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे.

[दुबई म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशातील एक राज्य आणि शहर. आबूधाबी, शारजा, दुबई, रास अल खैमा, अजमान, ऊम अल कुवैन आणि फुजैरा हे राज्य १९७१ पुर्वी वेगवेगळे देश होते. त्यांच्या राज्यप्रमुखांनी आबू धाबीचे शेख झायद यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन युएई ची स्थापना केली. खनिज तेल, नैसर्गिक वायू, पर्यटन, व्यापार याच्या जोरावर युएई ने गेल्या दोन दशकात खूप प्रगती केली आहे.]

दुबईत आल्यावर मी ब-याच सांस्कृतिक समूहांशी जोडला गेलो. मराठी माणूस एकत्र येवून येथे खूप वेगवेगळे उत्सव साजरे करत असतात. जवळपास सगळे सण दुबईत साजरे होतात. होळी वा रंगपंचमीला रंगाची उधळण असो, आषाढी वारीची किंवा तुकाराम बिजेची दिंडी असो, गणेश उत्सव असो, नवरात्रीतला गरभा असो, एकत्र मिळून खाल्लेले दिवाळीचे फराळ असो हे असले सगळे सण आणि उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात. दिवाळीला दुबईतील बर दुबई, करामा या भागात फिरताना आपण भारतात तर नाही ना? असा भास होतो. सगळी घरं, इमारती या रोषणाईने सजलेल्या असतात. दुबईत मराठमोळे "त्रिविक्रम ढोलताशा पथक" देखील आहे. अशा प्रकारचे हे आखातातील पहिले ढोलताशा पथक आहे. वर्षभरात या पथकाच्या माध्यमातून दुबईत ढोलताशाचा आवाज घुमत असतो.

दुबईतील मराठी माणूस हा खूप वाचनवेडा आहे. मराठी वाचकांसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक संचलित "ग्रंथ तुमच्या दारी" या योजनेमुळे शोकडो वाचकांना दर्जेदार मराठी पुस्तकं मोफत वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत. माझ्यासारख्या वाचनाची आवड असणा-या व्यक्तीला दुबईत पुस्तकं घेऊन जाण्यास खूप मर्यादा होत्या. सुट्टीवरून परत जातांना दोन-चार पुस्तकांपेक्षा जास्त नेता येऊ शकत नव्हती. आणि नेलेली पुस्तकं वर्षभर वाचण्यासाठी पुरेशी नसायची. पण जेंव्हापासून मी ग्रंथ तुमच्या दारी या योजनेशी जोडलो गेलो तेंव्हा पासून अनेक दर्जेदार ग्रंथ मला वाचण्यास मिळू लागले. आज ग्रंथ तुमच्या दारी या योजनेच्या अंतर्गत दुबईसह संपूर्ण युएई विविध ठिकाणी २७ ग्रंथ पेट्या आहेत. एक ग्रंथ पेटी म्हणजे त्या भागातील छोटं ग्रंथालयच असतं. या ग्रंथ पेट्या दर तीन महिन्यांनी समन्वयक आपआपसात बदलत असतात. त्यामुळे वाचकांसाठी नेहमीच नवनवीन ग्रंथ उपलब्ध होतात. ग्रंथ तुमच्या दारी च्या माध्यमातून मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृती यावर वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात; यात वाचक मेळावा, मराठी भाषा दिवस, वाचन प्रेरणा दिन, अक्षरबाग, अभिवाचन आणि काव्यसंमेलन आदींचा समावेश असतो.

दुबईत आणि खासकरून परदेशस्थ भारतीयांसाठी (एन आर आय) "विश्व पांथस्थ" नावाचं मासिक देखील सुरू झालं आहे. अशा प्रकारचे हे मराठी भाषेतील पहिलेच मासिक आहे. या मासिकाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोप-यात राहणा-या लोकांचे अनूभव वाचण्यास मिळत आहेत. या मासिकाचे वितरण भारतासह जगाच्या विविध देशात होत आहे.

दुबईत सगळ्या शाळा या इंग्रजी माध्यमातून आहेत. मराठी पालकांच्या लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, त्यांना मराठी लिहीता व वाचता यावी म्हणून विविध संस्था आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून दुबईत आणि आबूधाबी येथे मराठी शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच बाल वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दर आठवड्याला बालसंस्कार वर्गाचे देखील आयोजन करण्यात येते. ग्रंथ तुमच्या दारीच्या माध्यमातून बालवाचकांसाठी खास गोष्टींच्या पुस्तकांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

आमी परिवार नावाचा एक मराठी माणसांसाठी एक आगळावेगळा समूह देखील येथे सक्रिय आहे. हा समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो युएई मध्ये राहणा-या मराठी माणसांना विविध प्रकारची मदत करतो. व्हाट्सअपचा उपयोग फक्त विनोद, हाय-हॅलो न करता एका सामाजिक हेतूने हा समूह कार्य करत आहे. या समूहाच्या माध्यमातून अनेक दुबईकर मराठी लोकांना अडचणीच्या काळात मदत मिळाली आहे.

मराठी माणसांना दुबईचं खूप आकर्षक आहे. इथल्या उंच इमारती, वाळवंट या जगभरातील पर्यटकांना खुणावत असतात. दरवर्षी येथे खूप पर्यटक येतात त्यात मराठी पर्यटकांचाही खूप मोठा वाटा आहे. इथे स्थायिक झालेला मराठी माणूस इथलं वातावरण आपलंस करून आपली भाषा आणि संस्कृती यांना टिकवून ठेवत आहे. दुबई खरोखरच मराठमोळी झाली आहे.

बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

मला आखातात नोकरी मिळाली!

आखातात येऊन आता एका दशकाहून अधिक काळ लोटला आहे. माझं बालपण, शिक्षण हे भारतात जरी गेलं असलं तरी अख्खं तरूणपण आखातात गेलं. वयाच्या अगदी चोवीसाव्या वर्षात हातात मुठभर स्वप्न घेऊन मी इथं आलो होतो. इथल्या वाळूने कधी आपलंसं केलं हे कळले देखील नाही. सुरुवातीचा काळ वगळता नंतर मी देखील इथल्या वातावरणात रमून गेलो. एका दशकानंतर मी आज जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा मला जाणीव होते की ज्या स्वप्नासाठी एवढा खटाटोप केलो होता त्याचं फळ मला मिळाले आहे. पाहिलेली स्वप्न सत्यात उतरली आहेत. माझ्या कष्टाला आणि त्यागाला आखाताने भरभरून दिले.

परिस्थिती माणसाला विचार करण्यास आणि त्यागास प्रवृत्त करत असते. माझ्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तरूणापुढं भविष्याची चिंता होती. परिस्थितीमुळे शिक्षण पुर्ण होऊ शकलं नाही. केवळ आयटीआय आरेखक यांत्रिकी एवढीच पात्रता मिळवून मी बाहेर पडलो. आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतरचा काळ माझ्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होता. सतत काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पन्न फक्त खाण्यापूरतं व्हायचे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे हाच एकमेव पर्याय मला दिसत होता. कधी कधी वाटायचं की आरेखक यांत्रिकी हा ट्रेड करून चूक केलीये का? कारण या ट्रेडला नोकरी शिवाय दुसरा पर्याय नव्हता. शिक्षण घेत असतांना याची मला सतत जाणीव होत होती. माझ्या आधीच्या काही बॅचमधील ठराविक दोनचार मुलांनाच नोकरी मिळाली होती. आपल्याला नोकरी मिळते की नाही याबाबत माझ्या मनात खूप भिती वाटायची. उत्तीर्ण झाल्यावर नोकरीसाठी संघर्ष करावाच लागणार होता हे उघड होते. 'शिक्षण कधीच वाया जात नाही!' या म्हणीने मला नेहमी प्रेरणा दिली. जेंव्हा मी उत्तीर्ण झालो त्यावेळी नोकरी मिळवण्यासाठी अनेक पुढारी व ओळखीच्या नातेवाइकांकडे गेलो पण अश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. मग मी स्वतःहून नोकरी शोधायला लागलो. त्याकाळी सकाळ पेपरात नोकरीच्या संदर्भात एक पुरवणी यायची, त्यातूनच मी एल अॅण्ड टी मुंबई येथे अॅप्रेंटीससाठी अर्ज केला आणि योगायोगाने माझी निवड देखील झाली. अॅप्रेंटीस पूर्ण झाल्यानंतर मी मुंबई-पुण्यात काही काळ नोकरी केली. नोकरी मिळाली तरी घरातील परिस्थिती सुधारत नव्हती कारण मला मिळणारा पगार पुरेसा नव्हता.

२००५ ला मी एका कंपनीत कामाला असतांना तेथील माझे काही मित्र हे आखातात नोकरी करून आलेले होते. त्यांचे राहणीमान हे खूप सुधारलेले होते. मला वाटायला लागले की, आपणही आखातात घाऊन नशीब का आजमावू नये? त्यावेळी मी मनाशी पक्के केले की आपणही आखातात जायचेच. त्यानंतर मला आखातात नोकरी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आखातात नोकरी मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. पासपोर्ट कसा असतो? तो कसा मिळवायचा? कुठे अर्ज करायचा? हे देखील मला माहीत नव्हते. माझ्या बरोबर काम करणा-या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. त्यानंतर जवळपास एक वर्ष मला पुणे मुंबई इंटरव्ह्यूसाठी फे-या मारव्या लागल्या. मुंबईतील काही एजंट नोकरी मिळवून देतो म्हणून फसवणूक देखील करतात. ब-याच ठिकाणी मला याचे खूप वाईट अनुभव आले. आखातात आधी जाऊन आलेल्या माझ्या मित्रांनी मला एजंटच्या हातात पासपोर्ट कधीच द्यायचा नाही असा सल्ला दिला होता आणि तो मी पाळला. कामगारांना घेऊन जाण्याचा सगळा खर्च ही तेथील कंपनी करत असते तरीही हे एजंट आपल्याकडून खर्चाच्या नावाखाली खूप पैसे मागायचे म्हणून पैसे मागणा-या कंपनी वा एजंटकडे मी जाणे टाळले.

एजंटला एक पैसाही न देता २००६ साली मला पहील्यांदा सौदी अरेबिया येथे नोकरी मिळाली. नोकरी मिळाली पण पगार होता जेमतेम १७०० रियाल (त्यावेळचे २०,००० रूपये). भारतात मिळत होता त्यापेक्षा काही हजार जास्त. तरीही एक नवीन संधी आणि अनूभवासाठी मी ही नोकरी पत्करली आणि आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली.

नवीन देशात चाललो होतो त्यामुळे मनात एक भिती होती. मी या अधी कधीच विमानात प्रवास केला नव्हता. पहिला विमान प्रवास हा माझ्या अविस्मरणीय अनुभव होता. सौदीमध्ये पहिल्यांदाच पाउल ठेवल्यानंतर माझ्या मनात शंका होती की मला कोणी मराठी बोलणारा मित्र भेटेल की नाही. आमच्या कंपनीतील नवीन १४ लोकांच्या ग्रुप मध्ये मी एकटाच मराठी भाषक होतो तर इतर बहुतेक दक्षिणात्य होते. येथे आल्यावर जवळपास दोन आठवडे मला मराठी बोलायला मिळालेच नाही. काही दिवसांनी येथे दोन-तीन मराठी माणसं आहेत असं समजल्यावर मला फार आनंद झाला.

सौदी मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे केरळी लोकांची संख्या आणि त्यांनी येथे प्रत्येक व्यवसायात घेतलेली गरुड झेप. येथे केरळी लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांचा प्रत्येक व्यवसायात बोलबाला आहे. मुंबईमध्ये जसे भैय्या लोक कुठलाही व्यवसाय करतात त्याप्रमाणे येथेही केरळी लोक सर्व प्रकारच्या व्यवसायात दिसतात. किराणा दुकान, खानावळी, चहाची दुकानं, शॉपिंग सेन्टर्स, नाव्ही, टेलर, गाडी चालक, लाँड्री वाले, भाजीपाला विक्रेते असे जवळपास सर्व व्यवसाय केरळी लोकांचेच आहेत. येथे असलेले बहुतेक डॉक्टर आणि नर्स हे देखील केरळीच आहेत.

सौदी अरेबियातील नियम हे भारतापेक्षा खूपच वेगळे होते. तिथे राजेशाही राज्यपद्धती चालते. इस्लाम धर्म आणि इस्लामीक कायदे तिथे काटेकोरपणे पाळले जातात. याचा अनूभव तिथं गेल्यागेल्या आला. रमजानच्या महीन्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा उघडपणे काही खाता-पिता मनायी असते. गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शिक्षा दिली जाते मग ते चाबकाने फटके मारणे असो नाहीतर फाशी किंवा शिरच्छेद असो.

माझी कंपनी ही सौदी अरेबियाच्या दम्माम या शहरात होती. आमची राहण्याची व्यवस्था कंपनीने जरी केली असली तरी खाण्यापिण्याचा खर्च ज्याला त्यालाच करावा लागणार होता. म्हणजे १७०० रियाल पगारामधून जवळपास २०० रियाल खर्च व्हायचा आणि उरलेले पैसे घरी पाठवावे लागचे. सुरुवातीचे दोन महिने खूप वाईट गेले. मी जन्मापासून शुद्ध शाकाहारी माणूस असल्यामुळे माझे खाण्यापिण्याचे थोडे हालच झाले. सौदी मध्ये शुद्ध शाकाहारी अश्या खानावळीच नाहीत. रेस्टॉरंटमध्ये फक्त मौंसाहारी पदार्थ मिळायचे. क्वचितच एखाद्या ठिकाणी शाकाहारी जेवण मिळायचे. दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये इडली, डोसा आणि परोठा खाऊन थोडे दिवस काढले. स्वयंपाकाचे माझे ज्ञान शुन्य होते तरीही काही दिवसांनी कसेतरी जेवण बनवायला लागलो.

कुठल्याही नवीन प्रदेशात जाण्या अगोदर आपल्या मनात अनेक शंका येतात जसे की, त्या देशाची भाषा आपल्याला येत नाही मग कसे होणार? वगैरे, पण माझ्या बाबतीत हा अनुभव थोडा भिन्न होता. मी सौदी मध्ये येण्या अगोदर अरबी भाषेचे थोडे ज्ञान संपादन केले होते. माझ्या गावातील एक टेलर काम करणारा मित्र पाच वर्ष सौदीत काम करून परतला होता त्यामुळे तो खूपच छान अरबी बोलत असे. मी त्याच्याकडून अरबी भाषेचे थोडे शब्द आणि वाक्य शिकून घेतले त्यामुळे येथे आल्यावर मी नवीन असून सुध्दा भाषेचा फारसा त्रास झाला नाही. माझ्या एका मुस्लिम मित्राकडून उर्दू अक्षरे शिकलो होतो. अरबी आणि उर्दू लिपीत बरेच साधर्म्य असल्यामुळे मला अरबी लिहिण्यास व वाचण्यास काहीच अडचण आली नाही. अरबी भाषा चांगली शिकण्यासाठी मी जोमाने प्रयत्न केले. कंपनी मध्ये जुन्या सहकाऱ्याकडून मी वेगवेगळे नवीन शब्द आणि वाक्य शिकून ते एका वहीत व्यवस्थित लिहून घेतले. अरबी भाषेचा अभ्यास करताना मला आढळून आले की अरबी मधील कित्येक शब्द आपण मराठी मध्ये जाशेच्या तशे वापरतो. नंतर मी माझ्या वहीत अरबी आणि मराठीत वापरत येणाऱ्या सारख्या शब्दांची यादीहीच करून ठेवली. सौदी मध्ये दाखल झाल्यानंतर काही महिन्यातच मी अरबी छान बोलू लागलो होतो.

मिळणारा पगार खरोखरच तुटपुंजा होता. गावाकडच्या लोकांना आणि मित्रांना असे वाटायचे की मी लाखात कमावतो आहे. अजूनही गावाकडच्या लोकांची हीच धारणा असते की दुबईत काम करणा-या व्यक्तीस लोखो रूपये पगार असतो आणि तो सहजासहजी मिळतो. एक प्रकारे गावी गेल्यावर त्यांची नेहमी याबाबत कुचेष्टा केली जाते. पण आखाती देशात ज्या परिस्थितीत कामगारांना काम करावे लागते त्याची विचारपूस किंवा चर्चा कोणी करत नाही. मी आरेखक असल्यामुळे मला बाहेर (आऊट डोअर) काम नसायचे. पण बाहेर काम करणा-या लोकांचे काम खरोखरच फार कठीण होते हे मी पाहिले आहे. सौदी अरेबिया म्हणजे वाळवंटी देश. इथला उन्हाळा खूपच कडक असतो. उन्हाळ्यात तापमान जवळपास ५५° सेल्सिअस पर्यंत जाते. त्यात भयंकर आर्द्रता, वाळूचे वादळ असल्या गोष्टींचा सामना करावा लागतो. कंस्ट्रक्शन साईटवर काम करणा-या लोकांचे खूप हाल होतात. तरीही आपली स्वप्न आणि घरच्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी हा कामगार एवढ्या उष्ण परिस्थितीतही काम करत रहातो. आखातात काम करणा-या कामगारांचे जीवन मी जवळून अनूभवले आहे. काही ठिकाणी लेबर कॅम्पमध्ये कामगारांना खूप वाईट परिस्थितीत रहावे लागते. आखातात बराच काळ राहिल्या नंतर त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. एवढं सगळं होऊनही भारतात त्यांची नातेवाईक आणि सरकारकडून उपेक्षाच होते. सरकार अनिवासी भारतीयांना केवळ विदेशी मुद्रा कमावून देणारी मशीनच समजते. या अनिवासी भारतीय कामगारांसाठी सरकारकडे काही ठोस उपाययोजनाच नाही. त्यांना साधे आधार कार्ड देखील काढता येत नाही. मतदानासारखा घटनेने दिलेला अधिकार निभावता येत नाही.

२००६-२००९ या तीन वर्षाच्या कालखंडात मी सौदी अरेबियामध्ये नोकरी केली. सौदी अरेबियात अनेक निर्बंधामुळे विदेशी नागरिकांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर खूप मर्यादा होत्या. त्यामुळे सौदी अरेबियात विदेशी लोक आपले उत्सव, सण मोकळेपणाने साजरे करू शकत नाहीत. अनेक निर्बंध असूनही मी या देशात मनाने काम केले. पुढे माझी कामगिरी पाहून कंपनीने पगार एका चांगल्या पातळीवर नेला. सौदीत खूप वेगवेगळे अनूभव मिळाले त्यात विविध देशातील लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीशी ओळख झाली.

२००९ साली मी नोकरीचा राजीनामा देऊन भारतात परतलो.

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

कविता संग्रह : मनाच्या झरोक्यातून



पुस्तकाचे नाव : मनाच्या झरोक्यातून
प्रकार : काव्यसंग्रह
कवी/लेखक : गणेश भाऊसाहेब पोटफोडे
प्रकाशक : मीरा बुक्स, औरंगाबाद
किमंत : १00 रुपये (पोस्टाचे चार्ज धारून)
संपर्क : gbp125@gmail.com