बुधवार, ७ जून, २०१७

शेतक-यांचा पहिला संप आणि सदाशिव पेठेतील टोमणे

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतक-यांनी १ जून २०१७ ला संप पुकारला. न भूतो न भविष्यती असा हा संप म्हणजे वर्षानुवर्षे शेतक-यांच्या मनात खदखदणारा ज्वालामुखीच होता; त्याचा उद्रेक हेऊन संपाच्या रूपाने असंतोषाचा जणू लाव्हारसच बाहेर पडला. या संपाची कारण मीमांसा करतांना असे प्रकर्षाने जानवते की, राज्यकर्त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नाकडे केलेली डोळेझाक, घाम गाळून आणि कष्ट करून पिकवलेल्या मालाला मिळणारा कवडी रेवडीचा भाव. दुष्काळ-गारपीटीमुळे होणारे नुकसान, नुकसानभरपाईच्या नावाने होणारी बोळवन, अर्थात कधी आस्मानी तर कधी सुलतानीत भरडल्यामुळे शेतकरी आता पूरा वैतागला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्या एवढाही बाजार भाव त्याला मिळत नाही. शेतक-यांची एकच किमान अपेक्षा असते की, त्याने पिकवलेल्या मालाला पिकवण्यासाठी केलेल्या खर्चापेक्षा अधिक दाम मिळावा. व्यापारी रक्तपिपासू आणि बाजार समित्यातील पुढारी यामुळे ते अद्यापही शक्य होत नाही. तेंव्हा घेतलेल्या कर्जाचे हप्ते कशाच्या जीवावर फेडायचे या विवंचनेत त्यांला जगण्यापेक्षा आत्महत्या करणे सोईचे वाटत आहे. शेतक-यांच्या आत्महत्या आणि त्यांचे केलेले राजकारण यापेक्षा राज्यकर्त्यांनी वा विरोधकांनी त्या रोखण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना केलेली नाही. तेव्हा आत्महत्यांचे सत्र आजगायत चालूच आहे आणि भविष्यातही चालूच राहील.

सत्ता मिळल्यावर राज्यकर्त्यांना चढणारी मस्ती आणि विरोधकांचे मते मिळवण्यासाठी शेतकरी प्रश्नाला दाखवलेली सहानुभूती यापलीकडे काहीच होत नाही. निवडणुका आल्या म्हणजे शेतक-यांना काहीतरी योजनेचे गाजर दाखवले जाते. कर्जमाफी, शेतीमालाला भाव, अनुदान वगैरे. परंतु निवडणूका झाल्या म्हणजे हेच शेतकु-यांच्या जीवावर निवडून आलेले  राज्यकर्ते गेंड्याचे कातडे परीधान करतात.

विविध पक्षांचे सरकारे आली गेली. पक्ष व नेते मालामाल झाले पण शेतक-यांचे प्रश्न जसेच्या तसे आ वासून उभे राहिले. कुणीच ते सोडवण्याचा कधीही प्रामाणिक प्रयत्न केला नाही. शेतक-यांच्या हातात नेहमी कसा कटोरा राहील व तो भिका-यासारखा आपल्या दारात कसा उभा राहील यासाठीच राजकारण्यांनी पडद्याआडून नेहमीच प्रयत्न केले आहेत. सहकारी साखर कारखाने व त्यांच्या मार्फत चालणा-या सहकारी संस्था ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत. वर्तमानात कुठलाच पक्ष वा नेता याला आता अपवाद राहीला नाही. या वर्षानुवर्षे खदखदीचा १ जून २०१७ ला उद्रेक होऊन महाराष्ट्रातील शेतक-यांनी संप पुकारला.

शेतक-यांनी कुठलाच भाजीपाला, फळे, अन्नधान्य आणि दुध बाजारात विकायचे नाही असा शेतकरी संघटनांनी निर्णय घेतला. आंदोलनकारी शेतक-यांनी रस्त्यावर येत शेतीमालाची वाहतुक करणा-या वाहणांना आडवून त्यातील भाजीपाला, दुध यांची नासधूस करण्यास सुरूवात केली. ज्या मालाला असाही काही भाव भेटत नाही तेंव्हा त्याची नासधुस झाल्याचे कसले दुःख शेतक-यांना वाटणार होते? शेतकरी आंदोलनाचे लोन नाशिक, नगरहून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले गेले. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर आडवून ते रस्त्यावर रिचवले गेले. या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी भाजीपाला व दुध शहरांकडे वा बाजार समित्यांकडे घेऊन जाणरी वाहतूक मंदावली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. व्यापा-यांना गंगेत हात धुवून घेण्यासाठी आयती संधी मिळाली. शहरात दुध व भाजीपाला महागला.

शासनाच्या वतीने सुरूवातीला या संपाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना वाटले असावे की कुठेतरी शेतकरी काहीवेळ रस्ते आडवून लाक्षणिक संप करतील आणि मोकळे होतील. पण शेतक-यांच्या संपाने संपुर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहुण फडणविस सरकार हादरले.

संपाला विरोध करण्यासाठी भाजप समर्थक मोठ्या प्रमाणात सरसावले. त्यात एका जाती विशिष्ट शहरी बांडगूळांचा समावेश लक्षणीय होता. कधीही शेतीचा बांध न ओलांडलेले, कांदा जमिनीच्या वर येतो की खाली हे ही ज्ञान नसणारे फेसबुकी व सोशल मिडीयावर लिहीत असणारे तथाकथित बुद्धिजीवी शेतक-यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करत होते. जणू अर्जुनाने श्रीकृष्णाला गीता शिकवावी असे ते सल्ले होते. संपाची थेरं बंद करा, आम्ही उपाशी मरणार नाही, शेतकरी म्हणजे करबुडवे, भिकारडे अशा शेलक्या सदाशिव पेठेतील भाषेत या जमातीने अन्नदात्या शेतक-यांना नावे ठेवून संपाचा विरोध केला. ही जमात कुठली हे न सांगताही लक्षात येण्यासारखे आहे.

महाराष्ट्रात फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून लोक ही असली संपाची थेरं, मोर्चे काढत असून मुख्यमंत्री बदलला तर सगळे पुर्वीसारखे सुरळीत होईल असे आरोपही करण्यात आले. मग यापूर्वीच्या सरकारच्या काळातही शेतक-यांची आंदोलने झाली त्यावेळेस ते ब्राह्मण समाजाला विरोध करण्यासाठीच होती का? स्वजातीच्या मुख्यमंत्र्याचे समर्थन करण्यासाठी काही लोक शेतक-यांना किती खालच्या पातळीला जावून हिणवत आहेत, त्यांच्या समस्येवर हसू करत आहेत हे पाहून फार वेदना होतात.

जरी शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी नाही दिली तरी चालेल परंतु त्याने कष्टाने कमवलेल्या मालाला पिकवण्यासाठी केलेल्या खर्चापेक्षा जास्त "हमीभाव" मिळावा ही महत्वाची मागणी आहे. आणि ती पुर्ण व्हायलाच हवी.

दुष्काळ, अवकाळी, गारपीट यातून वाचून कधीतरीच एखाद्या वर्षी चांगले उत्पन्न होते तेंव्हा शेक-याचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकत नाही. पुढारी (सत्ताधारी व विरोधक सर्वच) आणि व्यापारी त्यांना भावात लुटून देशोधडीला लावतात. हा अन्याय कुठवर सोसायचा? शेतक-यांच्या हिताचा विचार करणारे सरकार कधी येणार आहे का?

© गणेश भाऊसाहेब पोटफोडे
(पुर्व परवानगी शिवाय कुठेही शेअर करू नये)

शनिवार, ३ जून, २०१७

पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर

ओवीची शाळा फार दूर आहे. सकाळी तिला शाळेत जाण्यासाठी पहाटे पाचलाच उठवावे लागते कारण पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी तिची बस येते. आम्हाला तिच्या शाळेत जायचं म्हटलं तरी मेट्रो स्टेशनवर उतरून टॅक्सीने जावे लागते. मेट्रोपासून तिची शाळा फार लांब आहे आणि तिथं बसही जात नाही. त्यामुळे तिथं पोहचवण्यासाठी गाडी नसल्याने टॅक्सी हा एकमेव पर्याय आमच्याकडे आहे. मेट्रो स्टेशनच्या बाहेर टॅक्सी ब-याचवेळा पटकन मिळते पण येतांना टॅक्सी मिळत नाही. काॅल टॅक्सी बोलावून घ्यावी लागते.

असच एकदा काही कामानिमित्त मला तिच्या शाळेत जावे लागले. कडक उन्हाळ्यामुळे सकाळी सकाळीच तापमानाचा पारा चढायला लागतो. मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर मला पटकन टॅक्सी मिळाली. या ड्रायव्हरला शाळा कुठे आहे हे सुदैवाने माहिती होते. नाहीतर ब-याचवेळा टॅक्सी ड्रायव्हरनाही रस्ता दाखवत तेथे न्यावे लागते अशी ही शाळा आडवळणी आहे. त्याने मला बरोबर ठीकाणावर पोहचवले. पण मला परत कसं जायचं याची काळजी वाटत होती. मी टॅक्सीच्या बाहेर पडतांना टॅक्सी ड्रायव्हरला म्हणलो की,
"तुम्ही कृपया दहा पंधरा मिनीटं माझ्यासाठी थांबाल का? जर तुम्हाला भाडं मिळाले तर तुम्ही जा."
तो बिचारा थोडावेळ थांबण्यास तयार झाला.

मी शाळेच्या कार्यालयात जावून माझे काम मी करून आलो. पण माझ्या कामाला मला अर्धा तास लागला. मी विचार केला की टॅक्सीवाला तो माणूस गेला असेल. आता उगाचच उन्हात उभा राहुण काॅल टॅक्सी येईल पर्यंत थांबावे लागेल. मी शाळेच्या गेटबाहेर पडलो. शाळा अगदी वाळवंटात बांधली आहे. इकडचा भाग आता विकसीत होत आहे पण तरीही तापलेल्या वाळवंटाचा दाह अंगाची लाही लाही करत होता. घड्याळात पाहिलं तर जेमतेम सकाळचे दहाच वाजलेले होते. भर दुपारी बारा नंतर इथं काय परीस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा.

बाहेर मोघाची पिवळ्या रंगाची नॅशनल टॅक्सी पाहून माझ्या जीवात जीव आला. मी टॅक्सीत बसलो. त्या ड्रायव्हरचे मी धन्यवाद मानले. तो ही मला म्हणाला की "तुम्ही मला थांबवले नसते तर मलाही परत रिकामेच जावे लागले असते. तेंव्हा मी ही तुमचा आभारी आहे."
टॅक्सीवाला बोलता झालेला पाहुण मी ही त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरूवात केली. त्याचे उर्दूचे अस्खलित उच्चार ऐकून हा पाकिस्तानी आहे, असा मला अंदाज लावायला वेळ लागला नाही. नाहीतरी बहुतांश टॅक्सी ड्रायव्हर हे पाकिस्तानीच असतात.
"तुम्ही जर इथं रोज येत असाल तर माझा नंबर घेऊन ठेवा, मी येत जाईन तुमच्यासाठी" तो फार प्रेमाने म्हणाला.
"मी काय रोज येत नाही, परंतू कधीतरी यावे लागते. तरीही मी तुमचा नंबर ठेवतो."
त्याच्याकडून नंबर घेतल्यानंतर मी तो माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करतांना ड्रायव्हरला त्याचे नाव विचारले. त्याने एजाज असे नाव सांगितले.
मी माझे नाव गणेश सांगितल्यावर तो लगेच म्हणाला "तुमच्या नावाचा मला अर्थ माहित आहे, हत्ती..... बरोबर ना"
मी हो म्हटल्यावर तो पुढे बोलू लागला.
"मी सौदीत पुर्वी कामाला होतो. तिथं माझ्या बरोबर गणेश नावाचा मित्र होता. मी सौदीत जेद्दाला एका चांगल्या कंपनीत परचेस काॅर्डीनेटर या पोस्टवर होतो. साडेनऊ वर्षे मी तिथं काम केलं. पण काही कारणांमुळे मला राजीनामा देऊन परत जावे लागले. नंतर मला चांगला व्हिजा मिळाला नाही. ब-याच प्रयत्नानंतर दुबईत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून व्हिजा मिळाला. माझी मजबूरी होती म्हणून मला आता टॅक्सी चालवावी लागते. मी अजून नवीनच आहे येथे. मला जास्त दुबईतील ठिकाणेही माहीत नाहीत. एक महिनादेखील झाला नाही मला येऊन." तो सांगत होता.

मी विचारले "मग पगार पाणी कसं असते तुमचे?"
"आम्हाला असा ठरावीक पगार नसतो. दोन ड्रायव्हरमध्ये मिळून एक टॅक्सी असते. बारा बारा तासाच्या अंतराने आमची ड्यूटी बदलते. आम्ही जेवढे बारा तासात कमवू त्याच्यावर ठराविक प्रमाणात आम्हाला पैसा मिळतो. कधी दिवसाला ८० ते १०० दिरहम्स होतात. जर काम नाही केले तर काहीच मिळत नाही. तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर कधी सुट्टीच घेत नाहीत. अगदी आजारी असला तरीही नाही." मला त्यांच ते बोलणं ऐकून फार कसंतरी वाटलं. टॅक्सी ड्रायव्हरला किती कष्ट करावे लागत असतील याचा मला जरा अंदाज आला.

"मग आर टी ए (दुबईतील पब्लिक ट्रान्स्पोर्ट चालणारी सरकारी संस्था) काय मिळते यातून?" मी सहजच विचारले
"आर टी ए ची फार दादागिरी आहे. त्यांच्या नावाने सा-या कंपन्या काम करतात. त्यांना वर्षाचे ठरावीक आणि रोजच्या एकून भाड्याची ठरलेली टक्केवारी आयती द्यावी लागते. जर कंपनीने काही नियम मोडल्यास कंपनी दंड भरते नाही तर ड्रायव्हरने काही अपघात केल्यास ड्रायव्हरच्या डोक्यावर तो खर्च येतो. आता मला अजून पहिला पगार झाला नाहीपण माझ्या नावावर पंधराशे दिरहम्स अलरेडी दंड जमा झालाय. ट्रॅफिक अॅक्सिडेंटमध्ये आमची चुक जरी नसली तरी कंपनी आम्हाला दंड करते. तेंव्हा आम्हाला फार काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. टॅक्सी ड्रायव्हर हमेशा असल्या दंडाच्या कर्जातच जगतो."

"तुम्ही दिवसाला ८०० ते १००० भाडे जमवत असाल ना?" मी प्रश्न केला.
"नाही आमचे जास्तीत जास्त फक्त २०० ते २५० होतात. जे सिनीयर ड्रायव्हर आहेत त्यांचे होतात ८०० ते १०००"

एवढ्या गप्पा मारल्यानंतर माझं मेट्रो स्टेशन आले.  येतांनाचे साडे वीस दिरहम भाडे झाले. मी त्या ड्रायव्हरला पंचवीस दिसहम दिले, तो मला उरलेले पैसे देत होता. मी त्याला वरचे साडेचार दिरहम टिप म्हणून देऊन टाकले. मला त्याची फार दया आली. आभार मानून मी मेट्रोच्या दिशेने चालत निघालो.

दुबईत प्रत्येकाला किती जीव तोडून मेहनत करावी लाजते ना? पण आपल्या देशाततील लोकांना का वाटते की दुबईत गेल्यावर फार पैसा आहे. का तो झाडाचा लागतो काय? हा टॅक्सीवाला किती मेहनत घेतोय बिचारा. असच इतर क्षेत्रातील कामगारही पोटाला चिमटे घेत आपल्या परिवारासाठी जगत असतील. त्यांचीही या टॅक्सी ड्रायव्हर सारखी काही मजबुरी असेल?

~ गणेश

मंगळवार, २ मे, २०१७

मराठी साहित्य (Marathi Sahitya) : नवीन यु ट्यूब चॅनेल

नमस्कार मित्रहो! 
वाचनाची आवड आहे? 
पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी वेळ काढू शकत नाहीत? तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय यु ट्यूबचे नवे चॅनेल, *मराठी साहित्य (Marathi Sahitya)*. या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील कथा, कादंबरी, कविता, ललित, बाल वाङमय, वैचारिक, चरित्र, वर्णन, समीक्षा, नाटक, अध्यात्म, इतिहास आणि संशोधन या सारख्या विविध साहित्य प्रकारातील दर्जेदार ग्रंथांवर चर्चा करून त्यावरील माहिती प्रसारीत करणार आहोत.
विविध मान्यवर साहित्यिक, ब्लॉगर यांच्याशीही आपण गप्पा मारणार आहोत. त्याच बरोबर वाचन संस्कृती वाढवण्यात हातभार लावणा-या  व्यक्ती, संस्था आणि वाचनालये यांचीही माहिती वेळोवेळी तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून देणार आहोत.
तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. *मराठी साहित्य*
सबस्क्राईब बटणाशेजारील घंटीवर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल.
(सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून *SUBSCRIBE* हे बटण दाबा)


आम्ही आपल्या सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत. चला तर मग, वाचन संस्कृती वाढवण्यात आपणही आपल्या परीने हातभार लावूयात.
धन्यवाद
_ *मराठी साहित्य Marathi Sahitya*
(मित्रहो आपल्याला विनंती आहे की, हा संदेश आपल्या सर्व मित्र, नातेवाईकांना आणि सर्व ग्रूपवर अवश्य पाठवा)

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

ऑफशोअर रीग पर्यंतही पोहचला ग्रंथ तुमच्या दारीचा विस्तार



दुबई/अजमान (२१.०४.२०१७)

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे पण भारता व्यतिरिक्त जगाच्या विविध देशातही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केले आहे. युएई तील मराठी माणसांत ही योजना फार लोकप्रिय झाली असून दुबई, शारजा, अजमान, आबू धाबी, फुजैरा आणि रास अल खैमा या महत्त्वाच्या अमिरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी वाचक वर्ग निर्माण झाला आहे. आता तर या योजनेचा विस्तार आखाती समुद्रात जिथं तेलाचे उत्पादन होते अशा ऑफशोअर प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचला आहे. ग्रंथ तुमच्या दारी शारजा येथील समन्वयिका सौ. नंदा शारंगपाणी याचे पती श्री जगदीश शारंगपाणी हे ऑफशोअर कंपनीत कार्यरत असून या कंपनीत अनेक मराठी भाषक इंजिनियर  व टेक्निशियन काम करतात. एकदा ऑफशोअर गेल्यावर साधारणपणे दोन तीन महिने सुट्टी नसते अशा वेळी हे लोक विरंगुळा व ज्ञानवर्धनाचे साधन म्हणून मराठी ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेतात. वाचन झाल्यावर ग्रंथ आपापसात बदलतात, दोन महिन्यांनी परत नवीन ग्रंथ प्लॅटफॉर्मवर घेऊन जातात. यातील एक वाचक तर अझरबेजान या देशात ही असून दर महिन्याला ते नवनवीन ग्रंथ वाचण्यासाठी नेतात. असे सौ. नंदा शारंगपाणी यांनी सांगितले. निमित्त होते ग्रंथ तुमच्या दारी युएई ची त्रैमासिक बैठक. ही बैठक आजमान येथे दिनांक २१ एप्रिलला मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

बैठकीच्या सुरूवातीला समन्वयिका विशाखा पंडित यांचे वडील वि. भा. देशपांडे यांना एक मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी नाट्यकोशकार व प्रसिद्ध नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र  तथा वि. भा. देशपांडे यांचे गेल्या महिन्यात ९ मार्चला पुण्यात निधन झाले होते. यावेळी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

बैठकीस मुख्य समन्वयिका सौ. सुजाता भिंगे यांनी प्रारंभ करून प्रत्येक ग्रंथ पेटी मागे किती वाचक आहेत याचा आढावा घेतला व अजून नवीन वाचक कसे या योजनेत जोडले जातील यासाठी सर्व समन्वयकांनी प्रयत्न करावेत यावर त्यांनी भर दिला. दुबई विभागात आता एकुण २८ पेट्या आणि १९ समन्वयकांचे मिळून जवळपास २०० वाचक झाले आहेत. ग्रंथ परिवारात दाखल झालेल्या समन्वयिका श्वेता पोरवाळ आणि प्रचिती तलाठी गांधी यांनी आपला परिचय करून दिला.

आबू धाबी या राजधानीच्या शहरात मराठी माणसांची संख्या भरपूर असूनही दुबई सारखा तिथं ग्रंथचा प्रसार झाला नाही अशी खंत आबू धाबीच्या समन्वयिका नीलिमा वाडेकर यांनी व्यक्त केली. तिथं ग्रंथचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन समन्वयक शोधने आणि जमल्यास गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दुबईत झालेल्या वाचक मेळाव्याच्या धर्तीवर असाच एखाद्या मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे; जेणेकरून आबू धाबीतील वाचक वर्गापर्यंत ग्रंथची ओळख पोहचेल. सध्या आबू धाबीत केवळ एकच ग्रंथ पेटी आहे.

बाल ग्रंथ पेट्या फार लोकप्रिय होत असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्यात यावे जेणेकरुन विविध उपनगरातील बाल वाचकांना या बाल साहित्याचा आस्वाद घेता येईल. द गार्डन्स विभागात नेहा अग्निहोत्री यांच्याकडे देण्यात आलेल्या ग्रंथ पेटीच्या महिला वाचक आठवड्यातून एकदा एकत्र जमून ग्रंथ अभिवाचन सारखा स्तुत्य उपक्रम राबवतात. तसेच भारतातून सुट्टीवर आलेले काही जेष्ठ नागरिकही ग्रंथचे वाचक होत आहेत असे नेहा आग्नीहोत्री म्हणाल्या.  

ग्रंथ तुमच्या दारी, दुबई विभाग सोशल मिडीयाच्या वापरात जरा मागे पडला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवीन वाचकापर्यंत पोहचणे शक्य आहे त्यामुळे ग्रंथचे फेसबुक पेज नियमित अपडेट करण्यात यावे असाही ठराव संमत करण्यात आला. समन्वयिका विशाखा पंडित व प्रचिती गांधी मिळून ग्रंथ तुमच्या दारी युएई ची नवीन वेबसाईट तयार करत असून, त्यात ग्रंथची सर्व माहिती अपलोड करण्यात येईल. सर्व समन्वयकांची माहिती, उपलब्ध ग्रंथ, आत्तापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती यासारख्या गोष्टी अपलोड करण्यात येणार आहेत. वेगवेगळे समन्वयक यात लेख लिहीणार आहेत. समन्वयक गणेश पोटफोडे हे युट्यूबवर नवीन वाहिनी चालू करत असून त्यासाठी लागणार्या गोष्टीसाठी स्वप्निल जावळे यांचे सहकार्य लाभत आहे. या वाहिनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथचे परीक्षण, ओळख व चर्चा करण्यात येणार आहे.

प्रत्येक समन्वयकाने आपापल्या वाचकांसाठी काव्यसंमेलने, ग्रंथ अभिवाचन असे कार्यक्रम आयोजित करावेत अशी सूचना किशोर मुंढे यांनी मांडली.

आजमानचे समन्वयक वीरभद्र कारेगांवकर आणि मनिषा कारेगांवकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले.

कार्यक्रमाला सुजाता व घनःशाम भिंगे, नीलिमा वाडेकर, समिश्का व स्वप्निल जावळे, धनश्री व कमलेश पाटील, विशाखा पंडित, नेमिका जोशी, प्रचिती तलाठी गांधी, नंदा शारंगपाणी, अपर्णा पैठणकर, श्वेता व इंद्रनील करंदीकर, किशोर मुंढे, मनिषा व वीरभद्र कारेगांवकर, नेहा व हरी अग्नीहोत्री, श्वेता व सचिन पोरवाळ आणि गणेश पोटफोडे हे उपस्थित होते.

ग्रंथची पुढील बैठक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर थेट सप्टेंबर महिन्यात होईल अशी माहिती विशाखा पंडित व सुजाता भिंगे यांनी दिली.

~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे (दुबई)