बुधवार, ४ जून, २०१४

सूर्य मावळला


खिन्न झाल मन
चहूकडे अंधार दाटला
उगवतीचा सूर्य मध्यांनीच
मावळतीला गेला….
ओस पडले रान
कंठ दाटुनिया आला
पाहिलेल्या स्वप्नांचा
सगळा चुराडा झाला
स्वतःच्या तेजाने
उजवळीले आम्हाला
अविरत कष्टाने
दाविल्या वाटा भविष्याच्या
प्रकाशाविना तुझ्या रे !
कोमेजुनी आम्ही जाणार
तुझ्या आठवणी नेहमी
चटका काळजाला देणार
खिन्न झाल मन
चहूकडे अंधार दाटला
उगवतीचा सूर्य मध्यांनीच
मावळतीला गेला…. 

मंगळवार, ३ जून, २०१४

गोपीनाथ मुंढे साहेबांच्या आठवणी



सुषमा मुंढे आणि एकाच हश्या......
गोपीनाथ मुंढे हे राजकीय विनोद करण्यात आणि आपल्या खास शैलीत चिमटे काढण्यासाठी प्रसिद्ध होते. एकदा असाच एक विनोद मुंढे साहेबांच्याच अंगलट आला. १९९८ सालातील घटना आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री होते. त्यावेळी राज्यात युतीचे राज्य होते आणि गोपीनाथ मुंढे उप मुख्यमंत्री तर शिवसेनेचे प्रमोद नवलकर सांस्कृतिक कार्य मंत्री होते. दूरदर्शनच्या एका छोटेखानी कार्यक्रमात मुंढे साहेबांना आमंत्रित केले होते तर प्रमुख पाहुणे हे अर्थातच केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रमोद महाजन हे होते.
   
मुंढे साहेबांनी भाषणाला सुरुवात चिमटा काढूनच केली.
"मला असे वाटते आहे कि मी पण माझे नाव बदलून प्रमोद मुंढे ठेवू. कारण दूरदर्शन वाल्यांना प्रमोद नावाच्या लोकांशिवाय दुसरे कोणी दिसताच नाही"
सभागृहात एकच हश्या पिकला. प्रमोद महाजन काय चिमटे काढण्यात कमी नव्हते. जेव्हा महाजन साहेबांची बारी आली त्यावेळी त्यांनीही स्वतःच्या शैलीत मुंढे यांना उत्तर दिले.
"जर केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्र्याचे नाव स्वतः पुढे लावल्याने दूरदर्शन वर प्रसिद्धी मिळणार असेल, असे मुंढे साहेबांना वाटत असेल तर ते एक गोष्ट विसरत आहेत कि मी आत्ताच काही दिवसापूर्वी या मंत्रालयाचा पदभार स्वकारला आहे. माझ्या आधी या मंत्रालयाच्या सुषमा जी मंत्री होत्या. मुंढे साहेबांनी स्वतःचे नामकरण प्रमोद मुंढे न करता सुषमा मुंढे केल्यास दूरदर्शन नक्कीच प्रसिद्धी देईल"

आणि सभागृहात परत जोरदार हश्या पिकला .......
- गणेश पोटफोडे

शुक्रवार, ३० मे, २०१४

हरवलेले बालपण

बालपण किती गमतीशीर असते नाही का? म्हणूनच कोणी तरी म्हटले आहे कि "बालपण देगा देवा ". आयुष्य हे वाहत्या नदी सारखे आहे, वाहत असतांना किनाऱ्यावर आलेली ठिकाणे परत आयुष्यात येत नाहीत तसेच गेलेला काळ आणि बालपण आपल्या जीवनात येणार नाही. बालपण तर आता निघून गेले आपण कधी मोठे झालो हे कळलेच नाही. आजही एखाद्या लहान मुलांना खेळतांना पहिले कि मनात बालपणाच्या आठवणी जाग्या होतात. भूतकाळातील गोष्टी आठवतात तेंव्हा ओठांवर अलगद हास्याची लकेर उमटते.

घरच्यांना सांगता पोहायला जाणे किंवा रात्री मित्रां बरोबर दुसऱ्याच्या बागेलीत फळे चोरून खाणे अश्या अनेक गोष्टी आपण केल्या. जी मजा तासंतास गावाच्या नदीत किंवा विहिरीत पोहण्याची होती ती मजा आजच्या नितळ पाण्याने भरलेल्या स्विमिंग पूल मध्ये मिळणार नाही. जी मजा दुसऱ्यांच्या चिंचा - बोरे चुरून खाण्यात होती ती आजच्या स्ट्रॉबेरी - सफरचंद खाण्यात नाही.

लहान असतांना आपण किती खोड्या केल्या हे आपल्याला माहित आहे तरीही आपण चांगले शिक्षण घेवून मोठे झालोत. आजच्या लहान मुलांनाही स्वातंत्र्य देवून त्यांना खूप खेळू दिले पाहिजे कारण अभ्यासाच्या धाकात ते कधी मोठे होतील हे त्यांनाही कळणार नाही आणि आपल्यालाही. त्यांचे बालपण आपण हिरावून तर घेत नाहीत ना? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.


शेवटी चांगले बालपण हाच चांगल्या आयुष्याचा पाया असतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त अभ्यासाचा धाक दाखवून मुलांचे बालपण हिरावून घेवू नका.

सोमवार, १९ मे, २०१४

चटके

उन्हाचे चटके
भेगाडले रान
पाण्याच्या आवाजाला
आतुरले कान

आटली विहीर
करपले पिक
पोटाला कोणी
घालेना भिक

लाचार नजर
आभाळी भिडली
कधी येईल
ढगांची सावली

थकले  सर्वांग
उपाशी पोट
कधी रे देशी
पाण्याचा घोट