गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
बुधवार, ११ डिसेंबर, २०२४
Comrades Marathon 2025 | Charity Fundraising
रविवार, २३ जून, २०२४
शनिवार, २२ जून, २०२४
माझी पहिली कॉम्रेड्स मॅरेथॉन २०२४ (Comrades Marathon 2024)
२०२२ च्या डिसेंबर महिन्यात मी माझी पहिली मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. अबुधाबी शहरात झालेली ही स्पर्धा पूर्ण कारण्यासाठी मला जवळपास साडे पाच तासांचा अवधी लागला होता. माझ्या पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी मी दुबईतील 'दुबई क्रीक स्ट्रायडर्स (Dubai Creek Striders)' या रनिंग क्लब मध्ये सहभागी झालो होतो. याचा मला खूपच फायदा झाला. विविध अनुभवी प्रशिक्षक आणि धावपटू यांच्या मार्गदर्शामुळे माझ्या धावण्याच्या कैशल्यात आमूलाग्र बदल होत गेला. या रनिंग क्लब च्या माध्यमातून अनेक मित्र मिळत गेले. या बळावर मी पुढे एका मागून एक अशा अजून चार मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या. पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेनंतर येणारी प्रत्येक स्पर्धा माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणारी ठरली.
पात्रता:
२०२३ च्या अबुधाबी मॅरेथॉन स्पर्धेच्या प्रशिक्षणा दरम्यान माझा मित्र ऋषभ कोचर मला २०२४ मध्ये होणाऱ्या कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी कर म्हणून हट्ट करू लागला. कॉम्रेड्स ही अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा असते आणि तिचे अंतर जवळपास ९० किलोमीटर असते याची मला कल्पना होती. कारण आमच्या क्लब मधून दर वर्षी या स्पर्धेसाठी अनेकजण सहभागी होत असत आणि त्यांच्या ट्रेनिंगच्या आणि स्पर्धेच्या सुरस कथा मी नेहमी ऐकत असे. ऋषभच्या हट्टामुळे मी या स्पर्धेसाठी नोंदणी केली खरी पण त्यासाठी मला पात्रता पूर्ण करावी लागणार होती. कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी चार तास पन्नास मिनिटात (४:५०) एक पात्रता मॅरेथॉन पूर्ण करणे गरजेचे असते. अबुधाबी मॅरेथॉन साठी आम्ही ट्रेनिंग करत होतो आणि अबुधाबी मॅरेथॉन ही सगळी सपाटीला असल्यामुळे तिथे चार तास पन्नास मिनिटाच्या आत धावणे खूपच शक्य आणि सोपे होते. अबुधाबी मॅरेथॉन स्पर्धेच्या अर्ध्याहून अधिक अंतर मी जवळपास साडेचार तासात पूर्ण कारेन या गतीने मी धावत होतो. पण शेवटच्या १५ किलोमीटर मध्ये माझ्या पायाला वाताचा त्रास झाल्याने माझी गती खूप मंदावली. तरीही मला अशा होती की, मी चार तास पन्नास मिनिटाच्या आत ही स्पर्धा पूर्ण करेल आणि कॉम्रेड्स साठी पात्र होईल. शेवटच्या एक दोन किलिमीटर मध्ये माझा अतिआत्मविश्वास नाडला. मी फिनिश लाईन पार झाल्यानंतर माझी वेळ हे चार तास पन्नास मिनिटे आणि चार सेकंद अशी होती. म्हणजे मी फक्त ५ सेकंदमुळे कॉम्रेड्ससाठी पात्र ठरू शकलो नाही. जर मी लघवीला ब्रेक घेतला नसता किंवा पाणी पिण्यासाठी जास्त वेळ थांबलो नसतो तर मी आरामात चार तास पन्नास मिनिटांच्या आत धावू शकलो असतो. याचे मला खूप वाईट वाटले. मी टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये देखील सहभाग नोंदवला होता. आता मला मुंबईत कुठल्याही परिस्थितीत कॉम्रेड्ससाठी पात्र व्हायचे होते. मुंबई मॅरेथॉनसाठी दुबई क्रीक स्ट्रायडर्स चा मोठा चमू दुबईतून मुंबईला गेला. त्यात मी आणि ऋषभ देखील बरोबर होतो. अबूधाबीत केलेल्या चुका मुंबईत करायच्या नाहीत हे मी मनाशी पक्के ठरवले होते. खरंतर मुंबई मॅरेथॉनचा मार्ग हा अबूधाबीपेक्षा खूप कठीण आणि चड-उताराचा होता. तरीही मी खूप काळजीने आणि आत्मविश्वासाने मुंबईत धावलो आणि ही मॅरेथॉन मी चार तास पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करून कॉम्रेड्स २०२४ साठी पात्र ठरलो.
(मुंबई मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर मी आणि ऋषभ)
प्रशिक्षण:
मुंबईतील यशामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. आता कॉम्रेड्सच्या ट्रेनिंगला सुरुवात करायची होती. रनिंग क्लब मधील ऋषभ कोचर, डॉ. राहूल देशमुख, लोकेश शेट्टी आणि मी एकत्र येऊन कॉम्रेड्सच्या ट्रेनिंगला सुरुवात करण्याचे ठरवले. पुढील चार पाच महिने खूप कष्टाचे होते. माझी पात्रता वेळ अगदीच काठावरची असल्यामुळे आमच्या क्लब मधील अनेकजणांना माझ्या कॉम्रेड्स बाबत शंका वाटत होती. मलादेखील मी कॉम्रेड्स पूर्ण करू शकेन का? याबाबत शंका वाटायची. माझ्या मनस्थिबाबत मी आमच्या क्लब मधील मित्र दिनेश सोमानी यांच्याशी बोललो. दिनेशभाईंनी गेल्यावर्षी कॉम्रेड्स पूर्ण केलेली होती. मला दिनेशभाई नेहमीच चांगले मार्गदर्शन करत असत. माझा कॉम्रेड्स बाबत आत्मविशास वाढवण्यास त्यांनी माझी खूप मदत केली. माझ्या ट्रेनिंग पासून ते आहार, व्यायाम यागोष्टींवर त्यांनी मला मोलाचे सहकार्य केले. पुढे काय होईल ते होईल आपण ट्रेनिंग मात्र मन लावून करायचे असे मी पक्के ठरवले. ट्रेनिंगसाठी आम्ही गेल्यावेळी सहभागी स्पर्धकांशी चर्चा केली. अनेकांचे अनुभव ऐकले. शेवटी कॉम्रेड्स मॅरेथॉनचे अधिकृत प्रशिक्षक कोच पॅरी यांच्या प्लॅननुसार जाण्याचे ठरले. कॉम्रेड्सचा मार्ग हा चड उताराचा आणि अतिशय कठीण असा होता. त्यामुळे ट्रेनिंग मध्ये चड उतारावर धावणे गरजेचे होते. त्यात ही अल्ट्रा मॅरेथॉन असल्यामुळे शरीरातील ऊर्जेची बचत करत धावणे देखील महत्वाचे होते. म्हणून आम्ही सुरुवातीपासून हार्ट रेट झोन २ (HR Zone 2) नुसार ट्रेनिंगला सुरुवात केली. कमी गतीने धावणे अगदीच रटाळवाणे वाटत होते. तरीही आम्ही आमची प्रॅक्टिस चालूच ठेवली.
आम्ही आमच्या ट्रेनिंगला अधिकृतपणे १ फेब्रुवारी पासून सुरुवात केली. म्हणजे कॉम्रेड्सच्या आधी चार महिने. कोच पॅरी यांच्या ट्रेनिंग प्लॅन नुसार आम्ही आठवड्याला एकूण ४० किलोमीटर धावू लागलो. एका आठवड्यात किमान तीन वेळेस आम्ही धावत होतोत. त्यापैकी शनिवारी आमचा लॉन्ग रन असे. मार्च महिन्यात आठवड्याचे अंतर वाढवून आम्ही ५० किलिमीटर केले तर एप्रिल महिन्यात आठवड्याचे अंतर ६० ते ७० किलोमीटर एवढे केले. रनिंग मध्ये चढ उताराचे वैविध्य यावे यासाठी आम्ही यूएई मधील डोंगराळ भागात जाऊन ट्रेनिंग घेवू लागलो. यूएई मधील रास अल खैमा आणि हत्ता या ठिकाणी आम्ही जात असू. तेथील डोंगरातील चढ उताराचा आम्हाला खूप फायदा झाला. तसेच दुबईतील गरहूद ब्रिजचा देखील आम्हाला ट्रेनिंग मध्ये खूप फायदा झाला. नियमित ट्रेनिंग ही कॉम्रेड्सची गुरुकिल्ली होती. त्यामुळे आमच्यातील सगळे जण ट्रेनिंगला हमखास हजर राहत असत.
धावण्याच्या ट्रेनिंग बरोबरच स्ट्रेंग्थ ट्रेनिंग हे सुद्धा खूप गरजेचे होते. तेंव्हा आठवड्यातील दोन तीन दिवस मी जिम मध्ये जाऊन थोडीशी स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करत असे. त्याच बरोबर घरी योगासने, स्ट्रेचिंग, पुशअप असले व्यायाम करायचो. आठवाड्यतून एकदा मी आमच्या बिल्डिंगचे माळे देखील चढत असे. एप्रिल महिन्यात मी कॉम्रेड्सच्या ट्रेनिंग दरम्यान दोन लॉन्ग रन पूर्ण केले. पहिला लॉन्ग रन हा ४२ किलोमीटरचा तर दुसरा हा ५० किलोमीटरचा होता. डॉ. राहूल आणि ऋषभ या दोघांनी दक्षिण आफ्रिकेतील टू ओशन्स स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यातच त्यांच्या लॉन्ग रन ची प्रॅक्टिस झाली. मे महिन्याच्या सुरुवातीला आमच्या क्लब ने यूएईच्या खोरफक्कन शहरात कॉम्रेड्स साठी तीन दिवसांचे ट्रेनिंग कॅम्प आयोजित केले. या कॅम्पचा आम्हाला खूप फायदा झाला. मे अखेरीस ट्रेनिंग दरम्यानचे माझे एकूण मायलेज जवळपास १२०० किलोमीटर झाले होते. याचा मला मानसिक दृष्ट्या खूप फायदा झाला. या ट्रेनिंगने माझा आत्मविश्वासात नक्कीच वाढ झाली. कोच पॅरी देखील त्याच्या पॉडकास्ट मध्ये म्हणाला होता की, जर तुम्ही कॉम्रेड्सच्या ट्रेनिंगमध्ये १००० किलोमीटर धावलात तर तुमचे कॉम्रेड्स पूर्ण करण्याचे चान्सेस खूप वाढतात. आता ट्रेनिंग जवळपास पूर्ण झाले होते. शरीराची तयारी पूर्ण झाली होती. पण कॉम्रेड्स धावण्यासाठी मनाची तयारी करायची होती. ट्रेनिंगच्या दरम्यान लोकेशला काही वैयक्तिक कारणामुळे माघार घ्यावी लागली, याचे आम्हाला खूप वाईट वाटले.
(ट्रेनींग दरम्यान आमचा चमू डावीकडून डॉ. राहूल, ऋषभ, मी आणि लोकेश)
कॉम्रेड्स पूर्वीचे चार आठवडे:
गेली साडेतीन महिने खूप कठीण ट्रेनिंग केले होते. आता उरलेले ती चार आठवडे ट्रेनिंग मध्ये सातत्य राखून मायलेज कमी करायचे होते, जेणे करून स्पर्धेला आपले पाय थकलेले न राहाता ताजेतवाने राहतील . म्हणून स्पर्धे आधीचे चार आठवडे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. शेवटच्या क्षणी दुखापत होता काम नये, थंडी ताप यासारखे शरीराला थकवा देणारे आजारपण येता काम नये याची मी खूप काळजी घेत होतो. शेवटच्या चार आठवडे मायलेज ३० ते ३५ किलोमीटर एवढेच ठेवले. खाण्यापिण्याचे ध्यान ठेवले. फळे, सुकामेवा, संतुलित आहार यावर मी लक्ष केंद्रित केले. त्याच बरोबर मी भरपूर पाणी प्यायलो. व्हिटॅमिनच्या काही सप्लिमेंट तसेच इलेकट्रोलाईट यांचे नियमित सेवन केले. जसजशी स्पर्धा जवळ येत होती, तसतशी मनात खूप भावनिक घालमेल होत होती. कधी कधी वाईट विचार देखील येत असत, पण मग मी मनाला दुसऱ्याच विचारात गुरफटत असे. कॉम्रेड्स मॅरेथॉन ही शारीरिक कमी आणि मानसिक कसोटीची स्पर्धा आहे. स्पर्धेला ज्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत, त्याचे मी बारकाईने नियोजन केले. सामानाची यादी बनवली आणि तिचे तंतोतंत पालन केले.
दक्षिण आफ्रिकेत उतरल्या पासून ते परत विमान बसे पर्यंतचे सगळे नियोजन आमच्या रनिंग क्लबचे सहकारी आणि ग्रीन नंबर मिळालेले निकोलस रू यांनी केले होते. त्यामुळे माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीला कसलाच त्रास झाला नाही. स्पर्धा रविवारी ९ जूनला होती. आम्ही सगळे दुबईतून ६ जूनला निघालोत. दुबई विमानतळावर भारतातून कॉम्रेड्स मॅरेथानला जाणारे अनेक धावपटू भेटले. त्यातील बहुसंख्य हे महाराष्ट्रातील होते. अहमदनगचे धावपटू योगेश खरपुडे, जगदीप मकर याची भेट देखील विमानतळावर झाली. योगेश आणि जगदीप यांची व माझी अगोदरच समाज माध्यमावर ओळख होती. ६ जूनला संध्याकाळी डर्बन शहरात पोहचलोत. अंधार पडून गेला होता. विमानतळाहून आम्ही थेट हॉटेल मध्ये पोहचलोत. शुक्रवारी सकाळी आमच्या चमूने सकाळी शेकआऊट रन केला. निकोलस आम्हाला सुंदर समुद्रकिनारी घेऊन गेला. सकाळी धावताना सगळीकडे देशविदेशातील धावपटू नजरेस पडत होते. खरोखरच कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगभरातील धावपटूंसाठी पंढरीच. पंढरीला गावगावच्या दिंड्या जमाव्यात अगदी तसाच मेळा डर्बनच्या समुद्रकिनारी भरला होता. अगदी आनंदी आणि प्रसन्न वाटत होते. आपण देखील या सोहळ्यात सहभागी होत आहोत याचा मनाला अभिमान वाटत होता. शुक्रवारी आम्ही एक्स्पोला जाऊन रेस नंबर /बीब घेतले. एक्स्पो मध्ये अनेक भारतीय धावपटू भेटले. अमरावती रोड रनर्स संघाच्या दीपमाला साळूंखे यांची देखील भेट एक्स्पो मध्येच झाली. एक्स्पो मध्ये खूप काही गोष्टी होत्या. मी चॅरीटीसाठी फंड जमा केला होता, त्या चॅरिटीचे स्टॉल देखील तेथे होते. एक्स्पो मध्ये खूप काही खरेदी केली.
९ जून कॉम्रेड्स:
अधल्या रात्री ८ जूनला संध्याकाळी साडेसात वाजताच आमची पाष्टा पार्टी झाली आणि आम्ही लवकरच झोपायला गेलोत. पहाटे मी तीन वाजताच उठून तयार झालो होतो. पहाटे तीन नंतर हॉटेलच्या लॉबीमध्ये स्पर्धकांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती. निघताना सगळे सामान घेतल्याची खात्री केली. काल संध्याकाळीच बीब लावलेला टॉप सह सगळे घालायचे कपडे आणि साहित्य तयार करून ठेवले होते. नाश्ता झाल्यानंतर सगळ्या चमूचा एक समूह फोटो काढण्यात आला. त्यानंतर बरोबर सकाळी चार वाजता आम्ही डर्बनच्या सिटी हॉल कडे निघालोत. इथेच उप रन ची स्टार्ट लाईन होती.
(रेसला निघण्यापूर्वी डॉ राहूल, मी आणि ऋषभ)
स्टार्ट लाईनला आल्यावर मनात खूप संमिश्र भावना होत्या. केल्या चार पाच महिन्यापासून ज्या दिवसासाठी आपण परिश्रम घेत होतोत तो क्षण आला होता. मी, डॉ. राहूल देशमुख, सचिन गिहानी, चिराग शाहा आणि नेल्सन मचाडो असे पाच जण C बॅच मध्ये होतोत. आम्ही पाचही जणांनी ठरवले होते की, शक्य होईल तोपर्यंत बरोबरच धावायचे. तासी आठ किलिमीटर अंतर पार करून ११ तासाच्या आसपास रेस पूर्ण करायची. स्टार्ट लाईन वर विविध देशांचे धावपटू जमले होते. वातावरण अवर्णनीय होते. जवळपास २० हजार धावपटूनमधून बहुतांश हे दक्षिण आफ्रिकेतील होते. भारतातून जवळपास ३५० स्पर्धक कॉम्रेड्स मध्ये सहभागी होत होते. रेस चालू होण्या आधी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रगीत झाले, त्यानंतर शोशोलोझा आणि चॅरिओट ऑफ फायर ही धून वाजवली गेली. ही गाणी वाजत असताना अनेकांच्या भावनांचा बांध तुटत होता. कोंबड्याची बांग दोनदा ऐकल्यावर रेस चालू झाल्याची गोळी झाडली गेली, आणि कॉम्रेड्स २०२४ ला अधिकृत सुरुवात झाली. स्टार्ट लाईनवर खूप गर्दी असते त्यामुळे स्टार्ट रेषा पार करण्यास आम्हाला साधारपणे दीड मिनिटांचा अवधी लागला.
रेस चालू झाली. आम्ही सगळे बरोबरच धावत होतोत. दर्बन शहराच्या दोन्ही बाजूंना अफाट जनसमुदाय स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी जमला होता. सुरुवातीच्या दोन किलोमीटर मध्येच माझ्या पोटरीमध्ये थोडा ताण जाणवू लागला. मी बहुतेक खूपच घट्ट सॉक्स वापरले होते. त्यावर पोटरीला सपोर्ट म्हणून काल्फ स्लीव्ह घातलेले होते. कदाचित यामुळे माझ्या पोटऱ्या खूप घट्ट वाटत असाव्यात. यामुळे मला दोन तीनदा थांबावे लागले. या गरबडीत गर्दीत बाकीचे चार जण गायब झाले. मला विश्वास होता कि मी त्यांना पुढे नक्कीच पकडू शकेल. पोटरीला आराम पडेपर्यंत मी आरामातच धावलो. सॉक्स थोडे ढिले केल्यानंतर मला जरा बरे वाटले. त्यानंतर मी ठरल्याप्रमाणे धावू लागलो. कोच पॅरी म्हणाल्या प्रमाणे सुरुवातीला खूप चढाई असल्यामुळे मी आरामात धावत होतो. आरामात धावत असल्यामुळे अर्ध्याहून अधिक धावपटू माझ्या पुढे निघून गेले. या स्पर्धेत एकूण तीन मोठाले डोंगर होते. काविज, फिल्ड, बोथास, इंचांगा आणि पॉली शॉर्ट. या बरोबर अनेक नाव नसलेले डोंगर मार्गात होते. सुरुवातीला काविज हिल्स कधी येऊन गेले हे समजले देखील नाही. परंतू फिल्ड्स हिल्स खूपच कठीण होते. तिथे जवळपास सगळेच धावपटू चालत तो डोंगर चढत होते. फिल्ड्स हिल्स मी आरामात सर केले. पण मी वेळेकडे नजर ठेवून होतो. कुठेच विनाकारण वेळ घालवायचा नाही हे मी मनाशी पक्के केले होते. बाकीचे सहकारी पुढे निघून गेल्यामुळे मला सुरुवातीला थोडे मानसिक दडपण आल्यासारखे वाटले. ही स्पर्धा मानसिक जास्त असल्यामुळे मनाची लवकरच समजूत काढावी लागली. त्यासाठी मी शेजारी माझ्यासोबत धावत असणाऱ्या धावपटूंशी थोडे बोलू लागलो.
पाईन टाऊनचा पहिला कटऑफ मी वेळेआधी पार केला. पाईन टाऊन नंतर ११ तासाच्या दोन बस माझ्या पुढे निघून गेल्या. ठरल्या प्रमाणे ११ तास किंवा ११ तास ३० मिनिटे हे दोन प्लॅन मी तयार ठेवलेले होते. ११ तासाच्या दोन बस पुढे निघून केल्यामुळे थोडे दडपण नक्कीच जाणवले. ३० किलिमीटर अंतरावर दुबई क्रीक स्ट्रायडर्सचे पहिले सपोर्ट स्टेशन आले. तिथे मी अगोदरच दिलेले जेल, चॉकोलेट, खजूर असे साहित्य ठेवले होते. ते साहित्य मी पटकन खिशात भरले. १० ते १२ सेकंदात मी हे काम पूर्ण केले आणि पुढे धावू लागलो. सपोर्ट स्टेशन नंतर लगेचच विन्स्टन पार्कचा दुसरा कटऑफ मी पार केला. या दरम्यान माझे इतर सहकारी माझ्या पुढे जात होते. कुमार ब्रिजवानी आणि ऋषभ कोचर मला जवळपास ४० किमी अंतरावर भेटले. त्या दोघांना पाहून मला खूप आनंद झाला. या दरम्यान ११ तास ३० मिनिटाच्या दोन बस पुढे निघून गेल्या. भारताचा झेंडा घेऊन भारतीय धावपटूंबरोबर धावणारे आणि ग्रीन नंबरचा मान मिळवलेले सतीश गुजरान वाटेत भेटले. मी ऋषभ आणि कुमार त्यांच्या बरोबर धावू लागलेत. या नंतर बोथास हिल्स देखील मी आरामात पार केली. बोथास पार केल्यानंतर ड्रमंड येथील तिसरा कटऑफ देखील वेळे आधीच पार केला. ड्रमंड हे अर्धे अंतर होते. डर्बनच्या भारतीय दूतावासाने भारतीय धावपटूंसाठी ड्रमंडच्या जवळपास एक सपोर्ट स्टेशन ठेवले होते. तिथे आम्ही सगळ्या भारतीय धावपटूंनी थोडा विसावा घेत भारतीय दूतावासाच्या आदर आतिथ्याचा लाभ घेतला. आम्ही तिथे जोरदार घोषणा देखील दिल्या. पुढचे अंतर आता पहिल्यापेक्षा थोडे सोपे होते. इंचांगा हा सगळ्यात उंच पॉईंट पार केल्यानंतर कॅटो रिज चा कटऑफ देखील आरामात पार झाला.
(३० किमीच्या सपोर्ट स्टेशनवर मी आणि इतर सहकारी)
कॅटो रिज पार केल्यानंतर ६० किमी अंतरावर दुबई क्रीक स्ट्रायडर्सचे दुसरे सपोर्ट स्टेशन आले. इथेपण मी जास्त वेळ न दवडता पटकन हव्या असलेल्या गोष्टी घेतल्या आणि मार्गस्त झालो. ७० किमीच्या जवळपास असणारा उमलास रोडचा कटऑफ देखील आरामात पार केला. आता रेस माझ्या हातात असल्याची भावना निर्माण झाली. साधारण १६ किमीचे अंतर बाकी होते आणि माझ्याकडे जवळपास ३ तास शिल्लक होते. पॉली शॉर्टच्या अवघड चढाईत थोडा वेळ गेला. पॉली शॉर्ट खरोखरच खूप कठीण होते. सगळे जण येथे चालत होते. मी जितके जमेल तितके जोराने चालत होतो. याच ठिकाणी माझी आणि ऋषभची ताटातूट झाली. भारतीय धावपटूंचा चमू देखील मागेपुढे झाला. पॉली शॉर्टच्या माथ्यावरचा शेवटचा कटऑफ मकोंडेनी हा देखील आरामात पार केला. आता शेवटचे फक्त ७ किमी अंतर बाकी होते. माझ्या उजव्या पायाच्या तळव्याला फोड येऊन ते फुटले. त्यामुळे शेवटचे १० किमी चे अंतर माझ्यासाठी खूप कठीण केले. थांबून चालणार नव्हते. दुखण्याकडे दुर्लक्ष करून मी पुढे जात राहिलो. शेवटच्या ७ किमी अंतरात माझ्या संघातील सहकारी इलारिया भेटली. आम्ही दोघांनी हे शेवटचे अंतर बरोबर पूर्ण केले. जसजसे पीटरमारित्झबर्ग जवळ येत होते तशी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी वाढत होती. गर्दीतील लोक धावपटूंचा उत्साह वाढवत होते. कॉम्रेड्सच्या मार्गातील काही डोंगर चढाईचे अंतर सोडल्यास, सगळीकडेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जणूकाही या मार्गावर जत्राच भरली होती. दार दोन किलोमीटर अंतरावर कॉम्रेड्स ने पिण्याचे पाणी, कोकोकोला आणि खाद्य पदार्थांची व्यवस्था केलेली होती. तसेच वाटेत अनेक लोक धावकांना खाण्यापिण्याचे साहित्य वाटत होते.
शेवटचे काही किलोमीटरवर मी खूप भावनिक झालो. गेली चार पाच महिने मी ज्याची आतुरतेने वाट पाहिली होती, तो क्षण आला होता. मी कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करणार होतो. माझे डोळे भरून आले. शेवटचा एक किलोमीटर मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. फिनिश लाईन साधारणपणे २०० मी असताना आमच्या चमूतील स्पर्धा पूर्ण केलेले धावपटू प्रेक्षक गॅरेलीत उभे होते. त्यांनी आम्हाला बघितल्यावर खूप आरडाओरडा केला. मी अजूनच भावनिक झालो. फिनिश लाईन पार केल्यानंतर माझा माझ्यावरच विश्वास नव्हता कि मी आज ८६ किमीचे अंतर ११ तास ४० मिनिटे आणि ३८ सेकंदात पूर्ण केले होते. कॉम्रेड्स चे ते छोटेसे मेडल गळ्यात घालताना जो काही आनंद झाला त्याचे वर्णन करू शकत नाही. फिनिश लाईनवर माझे इतर सहकारी भेटले. ज्यांनी मला या स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले होते ते दिनेश भाई देखील भेटले. मला त्यांना बघून रडूच कोसळले. त्यांनी मला आनंदाने मिठी मारली. आज मी आयुष्यातील सगळ्यात कठीण गोष्ट पूर्ण केली होती.
(कॉम्रेड्स फिनिश लाईन वर मी आणि ऋषभ)
(आम्ही कॉम्रेड्स फिनिशर)
(हिंद महासागराच्या किनाऱ्यावर दुबई क्रीक स्ट्रायडरचा संघ)
कॉम्रेड्स मॅरेथॉनने काय शिकवले?
१. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर जी गोष्ट मी साध्य करण्याचे ठरवली आहे ती नक्कीच साध्य होणार.
२. कॉम्रेड्स मॅरेथॉन खूप कठीण, थकवणारी परंतू तितकीच आनंददायी आहे.
३. कॉम्रेड्स मॅरेथॉन तुम्हाला नम्र, विनयशील आणि सकारात्मक बनवते.
४. कॉम्रेड्स मॅरेथॉन तुम्हाला वेळेचे नियोजन, शिस्त, वचनबद्धता याची शिकवण देते. या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर कमी येतात.
५. तुमचे मन तुम्हाला रोखू शकते किंवा ते तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. तेव्हा नेहमी चांगला विचार करा.
६. तुमचे रनिंग मित्र तुमचं कुटुंबाचा भाग बनतात.
अनेक परिश्रम घेऊन कॉम्रेड्सचे स्वप्न साकार झाले होते. आता २०२५च्या कॉम्रेड्सच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करावी लागणार होती. पुढच्या वर्षी या पेक्षा चांगल्या वेळेत कॉम्रेड्स पूर्ण करण्याचा मानस आहे. :)
