सोमवार, २० जुलै, २०२०

कविता : मी ॲलन कुर्दी बोलतोय



 
आठवतोय का तुम्हाला
भल्या सकाळी तुर्कस्तानातील एका समुद्रकिना-यावर 
पालथा पडलेला तो एक बालक... 
निळी चड्डी आणि लाल शर्ट घातलेला 
होय तोच मी!  
मी ॲलन कुर्दी बोलतोय... 
वय जेमतेम तीन वर्ष 
आता त्याची वाढ कायमची खुंटली आहे 
कारण माझं वय कधीच "सुपूर्द खाक" झालंय 
 
सुरूवात कशी करू?  
हेच कळत नाहीये 
माझा भूतकाळ आठवण्याचा तरी मला हक्क आहे ना
की तोही हिरावून घ्याल माझ्यापासून
जसा माझा कोवळा जीव घेतला तसा
 
माझ्या देशवासीयांना ठार मारण्यात येत होते 
त्यांच्या मृत्यूचा तमाशा पहाण्याशिवाय 
या जगाला काहीच करता आलं नाही 
जगानेही शेवटी पाठ फिरवली आमच्याकडे 
कारण त्यांना आमचे निर्दयी अंत पहावेसे वाटेनात  
 
आमच्याच बापजाद्यांच्या मायभूमीतून 
आम्हाला बेदखल करण्यात आलं 
आमच्याच देशात आम्ही जगण्याचा हक्क गमावून बसलो 
कारण......
कारण आम्ही कुर्दी होतो.....कुर्दी 
"त्यांच्या" नियमानुसार 
कुर्दी लोकांना आता इथं जगण्याचा मुळीच अधिकार नव्हता 
पण मलामाझ्या कुटुंबियांना जगायचं होतं  
मला मोठं व्हायचं होतं 
एक फुल बनून उमलायचं होतं 
म्हणूनच 
आम्ही धावत होतो या शहरातून त्या शहरात 
कधी वेश बदलूनकधी जीव मुठीत धरून 
कारण सतत बाँब कोसळत होते 
सू सू गेळ्या सुटत होत्या 
फक्त आमच्या सारख्यांचाच वेध घेण्यासाठी 
 
आमच्या घराचागावाचा कधीच ढिगारा झाला होता 
आमच्या भूईसपाट झालेल्या घरांचा शहरांचा  
शकडो वर्षांनी शोधही लागेल संशोधकांना 
याठिकाणी ऐके काळी मानवी संस्कृती नांदत होती 
यावर त्यांना विश्वासच बसणार नाही 
आणि ते हर्षभरित होतील मातीखाली गाडलेली घरं पाहुन 
त्यांना सापडतील थोरा मोठ्यांचे सांगाडे 
मस्तकाची चाळनी झालेल्या कवट्या पाहुन तर ते कदाचित निष्कर्ष काढतील  
या काळातील आधुनिक शस्त्रांचा 
पण रासायनिक आणि विषारी वायुने कित्येक ठार झाले 
याचा शोध लागेल का त्यांना
इतिहासाची पानं तोपर्यंत टिकलीतर कदाचित लागेलही 
 
असो... 
आकाश हेच आता आमच्या डोक्यावरलं छप्पर होतं 
स्वतःच्याच देशात निर्वासित होणे फारच वेदनादायी असतं 
माझ्या बाबाला लोक म्हणात होते 
युरोपात चल तिथं चांगलं जगता येईल
तिथलं सरकार मदत करेल 
गोळीची किंवा बाँब कोसळण्याची तिथं भितीतरी नसेल 
माझ्या बाबानं होता नव्हता तो पैसा जमवला 
आणि कसंतरी तुर्कस्तान गाठलं आम्हाला घेऊन  
मीगालीब आणि मामा 
 
तस्कराला पैसा देऊन आम्ही जाणार होतो युरोप खंडात  
तुर्कस्तान म्हणजे युरोपचे प्रवेशद्वार 
फक्त समुद्र ओलांडला की झालं 
मग आम्हाला कुणी निर्दयीपणे ठार करू शकत नव्हतं 
आम्ही निर्वासित म्हणून तिथं जगू शकणार होतो 
किती स्वप्न होती आमची जीवन जगण्याची 
 
अनेक प्रयत्नानंतर आम्हाला युरोपात घेऊन जाण्यास एक तस्कर तयार झाला 
बाबाने जीवन भराची कमाई त्याला दिली 
बोटीने आम्हाला ग्रीसच्या हद्दीत सोडण्यासाठी 
बोटी वाल्याला हवा होता फक्त पैसा 
आम्ही जगावं की मरावं याच्याशी त्याला देणं घेणं नव्हतं 
म्हणूनच तर बोटीत बसल्यावर आम्हाला 
दिखाव्यासाठी का होईना  
परिधान करण्यासाठी दिली गेली 
नकली लाईफ जाकेट  
आठ माणसांच्या बोटीत आम्ही होतो बहुधा दुप्पट 
समुद्र खवळलेला होता 
आणि आम्ही जगायचं की मरायचं याचा सौदा बोटी वाल्याशी करून बसलो होतो 
बोटीने किनारा सोडला 
पाच मिनिटातच बोट पाण्यात बुडायला लागली 
बोटीवाला जीव वाचवून पळला 
आता काय
आम्ही सगळे सैरभैर झालो 
शेवटी आमच्या जगण्याच्या स्वप्नाला घेऊन बोट बुडालीच 
 
माझा बाप धावत होतापोहत होता 
इकडून तिकडे... 
पालथ्या बोटीखाली आम्हाला शोधत होता 
कुणाला वाचवूमामालागालिबलाकी मला
माझा बाप ओक्साबोक्सी रडत होता 
पाण्यात सूर मारत होता 
आम्हाला हाक देत होता 
आम्हा मुलांना छातीजवळ कवटाळून धरण्याचा प्रयत्न करत होता 
उपरवाल्याला भिक मागत होता 
पण त्या काळ्या निर्दयी पाण्याने शेवटी घात केला 
मामा बुडालीगालीबही दिसेनासा झाला 
सर्वात शेवटी माझाही हात निसटला 
आणि मी ही खूप खूप दूर निघून गेलो... 
मामापासूनबाबापासूनमाझ्या मातृभूमीपासून 
 
बहुतेक आमचं मरण आगीच्या भडक्यात लिहीलेलं नसावं 
म्हणूनच आम्हाला थंड पाण्यात नियतीने बुडून मारलं 
माझी मामा किती भाग्यवान निघाली 
त्या क्रूर वासनांध श्वापदांच्या हातातून ती वाचली 
मीगालिब किती भाग्यवान 
गळे कापताही आम्हाला सुखाचं मरण आलं 
पण बाबाचं काय
आयुष्यभर साथ देण्याचे वचन माझ्या मामाने दिले असेल बाबाला 
तिने तो शब्द मोडल्यावर काय वाटलं असेल माझ्या बाबाला
गालिबला बुडतांना पाहुन किती इंगळ्या डसल्याच्या वेदना झाल्या असतील माझ्या बाबाला
माझा हात निसटल्यावर काय परिस्थिती झाली असेल माझ्या बाबाची
बाबा बाबा काय होईल तुझं
 
दुस-या दिवशी मी किना-याला लागलो नसतो तर
मी देखील त्या हजारो सिरीयन मुलांसारखा बेवारशी गणला गेलो असतो 
सिरीयस मुलांचे दुःखवेदना सांगण्यासाठीच 
मला परत देवाने किना-याला पाठवले असावे 
 
मनुष्य प्राण्यांनो  
मी ॲलन कुर्दी बोलतोय 
किडामुंगींसारखं मरत असलेल्या 
सिरीयन मुलांचा प्रतिनिधी म्हणून.... 

●●● 

सोमवार, ६ जुलै, २०२०

साकुळामाई



"संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही"

गदिमांच्या अजरामर गीतातील आणि सुधीर फडके यांच्या सुमधूर आवाजातील ह्या ओळी ऐकल्या की मला आमच्या गावची साकुळामाई आठवते. जशी प्रत्येक गावाला कुठलीतरी एक नदी असते तशीच ही आमच्या गावची नदी. आपली भारतीय संस्कृती आणि नदी यांचे एक अतूट नातं आहे. आपण नदीला माता मानतो, तिला जीवनदायिनी संबोधतो. प्राचीन काळी मानवाने पाण्याच्या सोयीसाठी नदीकाठी वस्त्या केल्या. विहीरी किंवा बंधारे यांचे तंत्रज्ञान विकसित होईपर्यंत नद्या ह्याच एकमेव जलस्त्रोताचे साधन होत्या. म्हणूनच कदाचित आपल्या संस्कृतीत नदीला एवढे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असेल. पुढे याच नदीकाठी निर्माण झालेल्या वस्त्यांचे रुपांतर कायम स्वरुपातील गावात आणि शहरात झाले. शेकडो वर्षांपूर्वी आमच्याही गावच्या पुर्वजांनी पाणवठा बघून या साकुळामाईच्या तीरावर वस्ती केली असेल आणि याच वस्तीचे रूपांतर पुढे आमच्या गावात झाले असेल.

आमची साकुळामाई एरवी कोरडी ठाक असली तरी एखाद्या पावसाळ्यात ती हमखास वाहती होते. अलिकडे आमच्या तालुक्यातील सततचे दुष्काळी वातावरण हे साकुळामाई कोरडी असण्याचे महत्वाचे कारण. त्यात गावोगावी राबवलेल्या 'पाणी आडवा। पाणी जीरवा॥' योजनेमुळे ठिकठिकाणी बंधारे बनवल्याने नदीच्या प्रवाहाला आता खूप मर्यादा आल्या आहेत. आजोबा सांगायचे की, त्यांच्या बालपणी साकुळामाई बारमाही वाहत असे. एखाद्या साली कधी दुष्काळ पडला तर ती उन्हाळ्यात कोरडी पडायची पण संक्रांती पर्यंत तिचे पात्र हमखास वाहत असे. माझ्या बालपणी देखील काही महिन्यांसाठी का असेना पण साकुळामाई वाहत असे. पावसाळ्यात कित्येकदा नदी वाहू लागताच बेडकांडे डराव-डराव गीत हमखास ऐकू येई. नदीला पूर आल्यास आम्ही सगळे पाणी पाहण्यासाठी धाव घेत असू. ते फेसाळणारे गढूळ पाणी आम्ही तासोंतास बघत बसायचो. साकुळामाईच्या पुराचे पाणी गावात घुसून नुकसान झाल्याचे कधी ऐकण्यात नाही.

साकुळामाई ही गोदावरीची लेक. इतर नद्यांच्या तुलनेत ती लांबीने अगदीच छोटी. जेमतेम पंचवीस तीस किलोमीटरचा तिचा एकूण प्रवास. नवनाथांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगेत देवीचे धामणगाव या गावाजवळ ती उगम पावून उत्तरेला गोदीवरीकडे वाहत जाते. विशेष म्हणजे देवीचे धामणगाव हे माझे अजोळ. येथे तिला जमनागिरी या नावाने ओळखतात. धामणगावातून ती पुढे माळी बाभुळगाव, डांगेवाडी, साकेगाव आणि काळेगाव ह्या तिच्या काठी वसलेल्या गावांतून वाहत आमच्या अमरापूरमध्ये प्रवेश करते. अमरापूरला तिचे पात्र थोडेसे रुदांवलेले आहे. अमरापूर नंतर ती शहाजापूर, सुलतानपूर या गावांना तृप्त करून भगूर गावाजवळ नंदिनी नदीस मिळते. नंदिनी पुढे ढोरा नदीस आणि ढोरा गोदावरीत एकरूप होते. 

माझं संपूर्ण बालपण हे साकुळा काठच्या अमरापूर येथे गेले. लहानपणी मी मित्रांसोबत नदीवर गुपचूप पोहायला जात असे. घरचे नदीवर कधी पोहायला जावू देत नसायचे. नदीवर स्मशानभूमी होती. कुणाची भूतबाधा होईल म्हणून आम्हाला घरचे तिकडे जाऊ नका असे बजावून सांगायचे. तरीही मित्रांसोबत गुपचूप पोहायला जाण्यात खूप मज्जा येई. नदीचे पात्र फार खोल नसल्याने पोहण्याऐवजी फक्त पाण्यात मनसोक्त खेळाणे हाच आम्हा मित्रांचा एकमेव उद्देश असायचा. पाण्यात धराधरी खेळणे हा आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ होता. मला त्यावेळी पोहताही येत नव्हते आणि नदीपत्रात पाणी खोल नसल्यामुळे बुडायची भिती देखील नसायची. नदीला पाणी असले की आम्ही दिवाळीच्या सुट्टीत हे पोहण्याचे बेत आखत असू. साकुळामाईच्या काठावर एक भला मोठी जुनी बारव आणि महादेवाचे मंदिर आहे. कधीकधी नदीचे पाणी आटले तरी बारव भरलेली असे. मोठाली मुलं जी पोहण्यात तरबेज होती, ती बारवेत पोहायची. बारव फार खोल होती. माझे कधी त्यात पोहण्याचे धाडस झाले नाही. 

मला अजूनही आठवते गावात नळयोजना झाली नव्हती. त्यावेळी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असे. घरोघरच्या बायकांना पाण्यासाठी नदीकाठच्या विहीरींवर पायपीट करावी लागे. साकुळामाईच्या पात्रात काही बायका झीरा खोदून त्यातून वाटीने पाणी भरायच्या. हे काम फार जिकिरीचे आणि वेळकाढू असायचे. एक हंडा भरायला खूप वेळ लागायचा. बायकांना एका हंड्यासाठी तासभर वाट पहावी लागे. पुढे चालून गावच्या ग्रामपंचायतीने साकुळामाईवर छोटासा बांध घालून पाणी उडवले आणि त्या शेजारी मोठी विहीर खोदली. या पाण्यातून आमची साकुळामाई घरोघरी जाऊन पोहचली.

साकुळामाईचे पात्र एकाठिकाणी खूप रुंद होते. त्या रुंद पात्राच्या एका बाजूच्या काठावर उंच चिंचेच्या झाडांची रांग तर दुसऱ्या बाजूच्या काठावर वेड्या बाभळी आणि बेशरमच्या झाडांची ताटी होती. या दोन्ही काठांच्या मधोमध क्रिकेटच्या मैदानाएवढी मोठी सपाट जागा होती. या मोकळ्या मैदानात मोठी मुलं क्रिकेट खेळायचे. त्यावेळी मी फार लहान असल्याने मला कुणी खेळात घेत नसे. पण साकुळामाईच्या काठावर बसून क्रिकेटचा तो खेळ बघायला खूप मज्जा यायची. काही वर्षांनी या जागेवर सरकाने भलामोठा बंधारा बांधला आणि क्रिकेटचे मैदान त्या बंधाऱ्यात गुडूप झाले. बंधाऱ्यात पाणी साचायला लागल्यावर पोहण्यासाठी गावातील मुलांना हक्काचे ठिकाण मिळाले. क्रिकेट खेळणारी मुलं आता या बंधाऱ्यात पोहू लागली. मी याकाळात पोहायला शिकण्याचा प्रयत्न केला पण मला काय ते जमलेच नाही. 

आम्ही मित्र खूपदा नदीकाठच्या लिंबाच्या झाडावर सुरपारंब्याचा खेळ खेळायला जायचो. या व्यतिरिक्त नदीच्या पत्रातून मित्रांसोबत भटकणे, सागरगोटे, गुंजा आणि खडे जमवणे अशा गोष्टी करायला मला खूप आवडायचे. एकदा नदीपत्रातून भटकत असताना मला चलनातून बाद झालेला एक नया पैसा सापडला. नदीपात्रात नाणी अर्पण करण्याची आपली परंपरा माहीत होती. मी स्वतः चंद्रभागेत आणि गोदावरीत नाणे टाकले आहे. आजही विविध नद्यांच्या पोटात वेगवेगळ्या कालखंडातील कितीतरी नाणी असतील. पण या एका नाण्याच्या कुतूहलाने मला पुढे वेगवेगळ्या देशांची नाणी जमवण्याचा छंद जडला. हा छंद मी आजगायत जोपासला आहे. आमच्या साकुळामाईने मला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. साकुळामाईने जसे माझे जीवन समृद्ध केले तशा तिने अनेक पिढ्यांना आपल्या पाण्याने समृद्ध केले आहेत. आमची साकुळामाई डोंगरदऱ्यात खळखळत, अडखळत जाणाऱ्या नद्यांसारखी नसली तरी ती मला खूप प्रिय आहे.