मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

कविता : मरण

स्वप्नात देवदूतांचा दृष्टांत झाला आहे
समय 'तो' माझाही समीप आला आहे

सांज झाली तरी अजून गोठा रिकामा का?
रेड्याच्या आवाजाची हुरहुर मनाला आहे

उगाचच ढाळू नका आश्रू मगरीचे कुणी
हितशत्रूंचा गराडा माझ्या उशाला आहे

वीष्ठेत माझ्याच लोळण्याच्या यातना किती?
ठेवा नरकासाठी थोड्या... परवा कुणाला आहे?

मरू द्यारे मला माझ्या सुखाने आता तरी
मरणाच्या स्वप्नावर तुम्ही... घातला घाला आहे

छातीत आहे धडधड अजूनही यार हो
तिरडी बांधण्याची घाई कशाला आहे?

खंगलेल्या देहाचा उडाला भडका शेवटी
सुटलो बुवा एकदाचे!... जो तो म्हणाला आहे

~ गणेश

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

बालकवी : श्रावणमासी हर्ष मानसी

आजपासून श्रावणमास सुरू झालाय. या विषयी बालकवी रचित नितांत सुंदर कविता पोस्ट करून सर्वाना श्रावणाच्या शुभेच्छा देतो

श्रावणमासी हर्ष मानसी

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे

देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

– बालकवी

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

कविता : आई


या वाळवंटात तुझी आठवण येते खूप आई
वाळूच्या कणाकणात दिसते तुझेच रूप आई

तुझ्या पुरण पोळीचा दरवळ आठवतो तेंव्हा
स्वप्नातही दोन चमचे जास्त वाढतेस तूप आई

दिवाळीचे खमंग फराळ संपून जायचे तेंव्हा
लपवून ठेवलेले लाडू द्यायचीस गुपचूप आई

खोड्यांना वैतागून शेजारी तक्रारीला यायचे तेंव्हा
माहित असुनही तोंडाला लावायचीस कुलूप आई

पावसात खेळून खेळून आजारी पडायचो तेंव्हा
हुरड्याच्या पीठाचे बनवून द्यायचीस सूप आई

बुधवार, २७ जुलै, २०१६

कविता : शाळेचं दप्तर

माझं शाळेचं दप्तर
होतं फार मजेशीर
पांढर्‍या खताच्या गोणीला
दोन बंध लावून शिवलेलं

त्यातच कोंबलेली असत
वह्या, पुस्तकं, लाकडी पट्टी
कोरे कागद, पॅड, रंगपेटी
आणि जेवणाचा डब्बा

ओमेगाच्या कंपास पेटीला
शिवलेला होता एक खिसा
कारण कंपास पेटीत
माझा फार जीव होता

वर्षात वह्या पुस्तकं बदलायची
पण कंपासपेटी तीच असायची
कंपास पेटीला आतून चिकटवलेली होती
दरवर्षीच्या ध्वज दिनाची तिकीटं

दप्तरात होती अजुन एक
खताची मोकळी पांढरी गोणी
स्वच्छ धुतलेली आणि
दाबून घडी करून ठेवलेली

वर्गात नव्हती बाकं तेंव्हा
आम्ही गोणी अंथरूणच बसायचो
पावसाळ्यात हीच गोणी
घोंगता करून वापरायचो

स्वतःला पावसात भिजायला
फार फार आवडायचं
पण दप्तर भिजल्यावर
फार वाईट वाटायचं

दप्तर जरी मळकटलेलं होतं
पण मला ते प्रिय होतं
कितीतरी वस्तूंनी भरलेल आसलं
तरी त्याचं कधी ओझं नाही वाटलं

एक दिवस शाळा संपली
ते कुठेतरी अडगळीत पडलं
पण मला अजूनही आठवतं
माझं 'शाळेचं दप्तर'