दुबई डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुबई डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

दुबईतील वाचन चळवळ भाग १

युएईत येऊन मला आता जवळपास सहा वर्ष झाली. पहिल्यांदा आल्यावर मला येथील हवामाना व्यतिरिक्त  भारतापेक्षा काही वेगळेपण जाणवले नाही. याचे महत्वाचे कारण दुबईत मोठ्या प्रमाणात असणारी मराठी माणसांची संख्या असू शकेल. दुबईला प्रती मुंबई म्हटले जाते ते बहुतेक यामुळेच. मराठी माणूस म्हणला तर आपली संस्कृती, साहित्य आणि कला जोपासणारा समुह. त्यामुळे दुबई कलागुण जोपासणाऱ्या अनेक संघटना होत्या. येथे आल्यावर मराठी माणसांनी सुरू केलेल्या विविध क्षेत्रातील संघटनांशी माझा परिचय होत गेला.

साधारणपणे दिडएक वर्षापूर्वी उमानंद बागडे नावाच्या एका सदगृहस्थशी माझी ओळख फेसबूकच्या माध्यमातून झाली. मैत्री होण्याचे कारण म्हणजे मी एकदा फेसबुकवरील कुठल्यातरी समुहावर "दुबईत कुणाकडे मराठी पुस्तकं वाचण्यासाठी मिळतील का?" असा संदेश पोस्ट केला होता. मला शालेय जीवनापासून वाचन, लेखन करण्याची आवड होती. मी भारतात सुट्टीवर गेल्यावर पुस्तकं खरेदी करून परत येतांना ती दुबईत घेऊन यायचो. प्रत्येक सुट्टीत मी वाचलेली पुस्तकं परत भारतात नेत असे व येतांना नवी पुस्तकं अनत असे. हा क्रम सुरूवातीला बरीच वर्ष चालू होता. यामुळे व्हायचे काय की, विमान प्रवासातील सामानाच्या बंधनामुळे मला जास्त पुस्तकं आणता येत नसत. आणि आणलेली पुस्तकं दोन तीन महीन्यातच वाचून संपायची. मग परत तिच तिच पुस्तकं कितीदा वाचायची? नंतर मी ऑनलाईन किंवा डिजिटल पुस्तकंही वाचायला लागलो. सतत मोबाईल व लॅपटॉपच्या स्क्रीनच्या प्रकाशाने डोळ्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे पारंपरिक छापील पुस्तकं वाचण्यासाठी योग्य वाटल्याने मला दुबईत एखाद्या मराठी लायब्ररीची गरज भासू लागली. अशातच बागडे यांच्या माध्यमातून ग्रंथ तुमच्या दारी चळवळीशी माझा जवळचा संबंध आला.

ग्रंथ तुमच्या दारी ही संकल्पना भारतात प्रथमतः राबवली ती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे श्री विनायक रानडे यांनी. आजकालच्या धावत्या युगात वेळेच्या कमतरतेमुळे बर्‍याच वाचकांना आवड असूनदेखील ग्रंथालयात जाण्यास जमत नाही. वाचकांची ही गरज ओळखून विनायक रानडे यांनी ग्रंथच आपल्या दाराशी आणून ठेवले. भारताबाहेर प्रथम ही संकल्पना दुबईतून सूरू झाली. प्रसिद्ध उद्योजक डाॅक्टर संदिप कडवे यांनी विनायक रानडे यांच्या मदतीने २०१४ ला या योजनेचा दुबईत शुभारंभ केला. प्रत्येकी २५ पुस्तकांच्या पेट्या वेगवेगळ्या विभागातल्या समन्वयकांना देण्यात आल्या. त्यामुळे दर्जेदार मराठी पुस्तकं वाचकांना मोफत उपलब्ध होऊ लागली. दर तीन महिन्यांनी समन्वयक आपापसात ग्रंथ पेटी बदलत असल्यामुळे वाचकांना सतत नवनवीन पुस्तकं वाचायला मिळू लागली. भारताबाहेर प्रथमच अशी मराठी वाचन चळवळ उभी राहिली याचा आम्हा सर्व वाचकांना अभिमान वाटतो. कालांतराने पेट्यांची संख्या वाढत जावून वाचकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील पुस्तकं दुबईत येऊ लागली.

डाॅक्टर संदिप कडवे यांच्याशी माझी ओळख देखील उमानंद बागडे यांच्यामुळेच झाली. ते आखाती देशातील मराठी वाचकांसाठी विश्व पांथस्थ नावाचे नवीन मासिक सुरू करणार असल्याचे मला उमानंद बागडे यांनी सांगितले होते आणि डाॅक्टर कडवे दुबईतील स्थायिक मराठी, कवी यांचा शोध घेत होते. तत्पूर्वी मी बरेचदा फेसबुकवर वेगवेगळे लेख लिहीत होतोच. माझे लेख आवडल्याने उमानंद बागडे यांनी डॉक्टर कडवे यांना माझे नाव सुचवले. विश्व पांथस्थच्या लिखाणासाठी मी डॉक्टर कडवे यांना अनेकदा भेटलो. त्याच्याकडून मला ग्रंथ तुमच्या दारी ची अजून माहिती होत गेली. वेगवेगळ्या ग्रंथच्या समन्वयकांचाही परिचय होत गेला.

ग्रंथ तुमच्या दारीचे सर्व समन्वयक आणि वाचक हे एक भले मोठे कुटुंब बनले. या सर्वांचा व्हाट्सअप ग्रुप बनवला गेला. विविध वाचक व समन्वयक यांच्यात साहित्याशी संबंधित वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. मला चर्चा करण्यासाठी एक हक्काचे आणि आवडीचे व्यासपीठ उपलब्ध झाले. तुमच्या पेटीत अमूक अमूक पुस्तकं आहे का? किंवा दुबईतील सर्व ग्रंथ पेट्यात अमूक एखादे पुस्तक आहे का? असले प्रश्न वाचक विचारू लागले. त्यांनी व्हाट्सअप वर विचारलेल्या प्रश्नची तात्काळ उत्तर मिळू लागली. विनायकजी भारतातून संदेश पाठवत की हवे असणारे अमूक एक पुस्तक पेटी क्रमांक अमूक अमूक मध्ये उपलब्ध आहे. वाचकांच्या शंकांचे निरसन तर व्हायचेच शिवाय त्यांना हवे असलेले विशिष्ट पुस्तक मिळायचे. आपले आवडते पुस्तक दुबईत वाचण्यास उपलब्ध आहे हाच मुळी अद्भुत आणि आनंदित करणारा अनुभव असायचा.

ग्रंथमुळे माझे आयुष्य पार बदलून गेले. अनेक नवे मित्र मिळाले, अनेक जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले त्याच बरोबर पुस्तकरूपी जीवलग सवंगडी मिळाले.
*****

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा, शारजा (UAE)





पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा, शारजा (UAE)
दिनांक : १६ सप्टेंबर २०१६

ग्रंथ तुमच्या दारी, दुबई आणि आमी परिवार (Akhil Amirati Marathi Indians) यांच्या संयुक्त विद्यमाने शारजा युनिव्हर्सिटी सभागृहात पहिल्या आंतरराष्ट्रीय वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रवीण दवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त व उद्योजक श्री विश्वास ठाकुर,  दुबईत ग्रंथ तुमच्या दारीला सुरुवात करून देणारे व प्रसिद्ध उद्योजक डाॅक्टर संदिप कडवे, आमी परिवाराचे संस्थापक संतोष कारंडे, आमीचे मुख्य कार्यकारी आधिकारी नितीन साडेकर, प्रसिद्ध अनुवादक आणि लेखक श्री रवींद्र गुर्जर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वालिशा किरपेकर ,सानवी सावंत ,स्वरदा पाटील ,अवनीं रिसबुड या चिमुकल्या मुलींनी गायलेल्या सरस्वती वंदनाने झाली. युएईच्या विविध भागातून आलेले जवळपास ४००—५०० वाचक प्रेमी मराठी बांधव या मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी डाॅक्टर संदिप कडवे यांनी संपादित केलेल्या 'विश्व पांथस्थ' या पहिल्या आखाती मराठी मासिकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रवीण दवणे यांच्या 'एक कोरी सांज' या नव्या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आमी परिवाराचे कार्य व उद्देश यावर श्री संतोष कारंडे आणि श्री नितीन साडेकर यांनी माहिती दिली. सोशल नेटवर्किंगचा सदुपयोग करून श्री कारंडे यांनी गेल्या पाच महिन्यात युएईतील जवळपास अडीच हजार मराठी माणसांचे संघटन केले आहे. त्याचा पुढील उद्देश हा युएईतील सर्व दीड लाख मराठी बांधवा पर्यंत पोहचण्याचा असून आमीच्या माध्यमातून चालवलेल्या सामाजिक उपक्रमाची त्याच बरोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या उद्योग जत्रेची माहिती त्यांनी यावेळी दिली. डाॅक्टर संदिप कडवे यांनी विश्व पांथस्थ मासिक बाबत माहिती देऊन सर्व वाचकांना आपले अनुभव, लेख आणि कविता या मासिकात छापण्यासाठी पाठवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते श्री प्रवीण दवणे यांनी सादर केलेली दोन विषयांवरील व्याख्याने. पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात 'माझ्या लेखनाची आनंदयात्रा' आणि दुसऱ्या सत्रातील 'सावर रे' सादर करून रसिक प्रेक्षकांना मोहित केले. माझ्या लेखनाची आनंदयात्रा मध्ये श्री दवणे यांनी आपल्या जीवनातील साहित्यिक प्रवासाचे अत्यंत सुंदर वर्णन केले. आपले बालपणीचे विविध अनुभव सांगून त्यांनी श्रोत्यांना कधी हसवले तर कधी भावनिक बनवले. आजच्या आधुनिक काळात तरूण पिढी मोबाईल सारख्या उपकरणांच्या आहारी जावून वाचन संस्कृती विसरत चालली आहे. पैश्याच्या मागे न धावता खऱ्या बौद्धिक श्रीमंतीच्या मागे लागा, मातृभाषेवर प्रेम करा आणि वर्तमानात जगा असा संदेश त्यांनी दिला. दवणे सरांनी आपल्या आयुष्यात पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या सहवासात अनुभवलेल्या अनेक आठवणी ताज्या केल्या. सावर रे या शेवटच्या सत्रात दवणे सरांनी विविध विषयांवर चर्चा करून आपल्या ओजस्वी वाणीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध कले.

ग्रंथ तुमच्या दारी तर्फे युएई वाचकांसाठी नवीन चार ग्रंथ पेट्या श्रीकांत पैठणकर आणि राकेश पंडित यांच्या हस्ते श्री गणेश पोटफोडे (देअरा, दुबई), समिश्का जावळे (इंटरनॅशनल सिटी, दुबई) आणि वीरभद्र कारेगावकर  यांना प्रदान करण्यात आल्या.
डॉ सुप्रिया सुधाळकर यांनी ६— १२ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट नाट्य वाचन करवून घेतले. आखाती देशात जन्मलेल्या/ वाढलेल्या मुलांचे मराठी वाचन ऐकून श्री प्रवीण दवणे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले. पार्थ जोशी, आहान सुधाळकर, शुभ्रा सप्रे, वेदांत खाचणे, साकेत पलांडे , संकेत दिक्षीत, मिहिका भोळे , अवनी गोडबोले, हिमानीश चोथे या मुलांनी आपल्या वाचनाने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ग्रंथ तुमच्या दारी  तर्फे घेण्यात आलेल्या 'ग्रंथ पेटीने मला काय दिले' आणि 'मला भावलेले पुस्तक' या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेते दिव्या करमरकर, गुरूदेव माने, रश्मी निसाळ, योगिता रिसबूड आणि गणेश पोटफोडे यांना प्रवीण दवणे यांच्या स्वाक्षरीतील ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. तर आमी परिवारातर्फे आयोजित गणपती सजावट स्पर्धेतील विजेते सागर कोकणे, बाल चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्वरदा पाटील, झोया करंदीकर आणि अवनी रिसबूड यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री व प्रसिद्ध निवेदिका अनुजा पडसलगीकर यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
वाचकांना सहजपणे प्रश्नोत्तरांमधे गुंगवून प्रचिती तलाठी यांनी त्यांना  सहभागी करुन घेतले.
या मेळाव्याला ग्रंथ तुमच्या दारीचे समन्वयक निखिल व नेमिका जोशी,  श्रीकांत व अपर्णा पैठणकर , तसेच आमी परिवार स्वयंसेवक टीमचे रघुनाथ सगळे, संदिप पंडीत यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
ग्रंथ तुमच्या दारी समन्वयकांच्या वतीने धनश्री वाघ-पाटील आणि किशोर मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
मेळाव्याच्या प्रमुख संयोजिका विशाखा पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता अभिलाषा देसाई या चिमूकलीने गायलेल्या पसायदानाने झाली.

-    गणेश पोटफोडे (दुबई)

सोमवार, ७ मार्च, २०१६

मध्यपूर्वेची बदलती अर्थव्यवस्था

सध्या जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. ग्रीस सारखा देश दिवाळखोरीत निघता निघता वाचला. जर्मनी सारख्या मजबूत अर्थव्यवस्थेने त्याला तारले. पोर्तुगाल आणि स्पेन ही युरोपियन युनियनची महत्वाची राष्ट्रेही संकटात आहेत. एकूणच या क्षेत्रातील जवळपास सर्वच देशांचे चलन युरो असल्याने एखाद्या सदस्य देशात निर्माण झालेल्या समस्येच्या झळा बाकी सभासदांना बसल्या शिवाय राहात नाहीत. युरोपातील संकट जरी अजून पूर्णपणे टळले नसले तरी काही उपाययोजना करून ते पुढे ढकलण्यात यश आले आहे. भविष्यात त्या उपाययोजनांचा अर्थव्यवस्थावर किती गुण येतो हे काळच ठरवेल किंबहुना सध्या आजचे मरण उद्यावर ही स्थिती येते की काय ही चिंता आहे.

अमेरिकेची कच्च्या तेलाबाबत निर्माण झालेली स्वयंपूर्णता हा खनिज तेलाच्या व्यापारात मंदी येण्यास कारणीभूत ठरलेला सध्याचा सर्वात मोठा घटक आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी घटल्याने किंमती 35 डॉलर प्रति पिंप पर्यंत कोसळल्या. मध्यपूर्वेतील खनिज तेलाचे मुख्य उत्पादक देश सौदी अरेबिया, कुवैत, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि ओमान या देशातील अर्थव्यवस्थेवर याचा फार मोठा परिणाम झाला. या बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्था ह्या खनिज तेलावर अवलंबून असल्याने या देशांमध्ये प्रथमच वित्तीय तूट निर्माण होऊ लागली आहे. इराणने आपला आण्विक कार्यक्रम थांबविल्याने त्यावर असलेले निर्बंध अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांने उठवल्याने इराणी खनिज तेल बाजारपेठ दाखल झाले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत कच्च्या तेलाच्या किंमती 50 - 60 डॉलरच्या पुढे जाणार नाहीत.

GCC (आखाती सहकार्य परिषद) या सहा राजेशाही देशांच्या समुहाने तेलाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून न राहाता इतर उत्पन्नाचे साधने शोधण्यास सुरूवात केली आहे. या देशांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या खनिज तेलाच्या किंमतीवरील अनुदान बंद करून त्यांच्या किंमती जागतिक तेलाच्या किंमतीशी संलग्न केल्या आहेत. त्यामुळे सरकारी खर्चावरील ताण अंशतः कमी होत आहे. GCC च्या सर्व देशांनी मुल्य वर्धित कर (VAT) प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2018 पासुन या सर्व देशात याची अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. सुरुवातीला हा कर 5% राहिल. यातुन वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा तसेच नियमीत वापराचे खाद्य पदार्थ यांना वगळण्यात आले आहे.

या नवीन कर प्रणालीमुळे आखाती दैनंदिन जीवनमान निश्चितच महागणार आहे. आधिच कमालीची महागाईमुळे येथील नोकरदार वर्ग मोठ्या दबावाच्या मनस्थितीत जगत आहे. आखातात काम करणाऱ्या एकूण कुशल व अकुशल कामगारच्या तुलनेत भारतीय कामगार हे जवळपास चाळीस टक्के आहेत. महागडे घरभाडे, शैक्षणिक सेवा यामुळे येथील भारतीय कामगारांचा मोठा खर्च होत आहे. एकेकाळी दुबई म्हणजे जनूकाही पैशाची खाणच असे संबोधले जाई. परंतु परिस्थितीत फार बदल झाला आहे. वाढत्या खर्चामुळे येथील लोकांचे बचतीचे प्रमाण घटले आहे. येत्या काही वर्षांत बदलत्या अर्थव्यवस्थेचा अजून काय परिणाम येथील कामगारांवर होईल हे सांगता येत नाही.

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

आखाती मोत्यांचा व्यवसाय (Gulf Pearling Industry)

संपूर्ण अरब खंड हा वाळवंटाने व्यापला आहे. अरब खंडाचा मध्य भाग तर प्रखर आणि अती उष्ण वातावरणामुळे निर्मनुष्य आहे. त्यामुळे येथील प्राचीन काळापासून लोकवस्ती ही सागर किनार्‍याच्या आवती भोवती व वाळवंटातील नैसर्गिक जलस्रोताच्या ठिकाणी असायची. या नैसर्गिक जलस्रोतांना मरूद्यान (Oasis) असे म्हणतात. इथली जमीन ही रेतीची आणि नापीक असल्याने शेती करण्यायोग्य नव्हती आणि लोक पाण्याच्या स्त्रोताबाबत नेहमीच चिंतेत असायचे. एकूणच शेती करण्याच्या संधी फारच कमी होत्या. वाळवंटात आणि कमी पाण्यात वाढणारे खजुराचे पिक हाच अरबांचा मुख्य शेती व्यवसाय होता. खजुराच्या झाडाच्या सावलीत खोडाशेजारी हे लोक काही प्रमाणात भाजीपाला आणि धान्य पिकवायचे. पण हे पिकवलेले अन्न सर्व जमातीच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते त्यामुळे येथील मुख्य आहार हा उंटाचे मांस आणि मासे हाच होता. अरब हे प्राचीन काळापासून भटकणाऱ्या टोळ्यात रहायचे. पाण्याच्या स्त्रोतानुसार व हवामानानुसार त्यांच्या जमाती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थानांतरीत व्हायच्या. खजुराचे पिक उन्हाळ्यात येत असल्याने आणि समुद्र किनार्‍याचे भीषण दमट वातावरण टाळण्यासाठी अरबांच्या टोळ्या उन्हाळ्यात वाळवंटातील जलस्रोताच्या आसपास लोकवस्ती करायच्या. खजुराचा मोसम संपल्यावर अरब टोळ्या हिवाळ्यात मासेमारी करण्यासाठी परत समुद्र किनारी परतायच्या. कालांतराने काही कुटुंब ही मासेमारी करण्यासाठी समुद्र किनारीच स्थायिक झाले. मासेमारी करत असताना आखाताच्या उथळ पाण्यात अरबांना मोती शिंपल्यांचा शोध लागला. मासेमारी दरम्यान सापडलेले मोती हे अरब जमवून ते व्यापारी लोकांना विकत.

स्थानिक भाषेत 'लूलू' म्हणजे मोती हे मध्यपूर्वेतील खनिज तेलाचा शोध लागण्या आधी उत्पन्नाचे मुख्य साधन होते. मोती शिंपल्यांचे नैसर्गिकरीत्या आखाताच्या उथळ पाण्यात रोपन होत असे. मोती व्यवसाय ह्या भागाच्या संस्कृतीचा किती जुना भाग आहे हे सांगणे कठीण आहे, पण संयुक्त अरब अमिरात आणि आखाती देशातील विविध पुरातत्व उत्खनना वरून येथील जमाती अंदाजे 5000 वर्षापासुन हा व्यवसाय करत असावेत हे याठिकाणी सापडलेल्या मोत्यावरून स्पष्ट होते. मोत्यांचा व्यापार हा प्राचीन रोमन साम्राज्यातही चालत होता. रास अल खैमाह हे प्राचीन मोती व्यापाराचे केंद्र होते.

समुद्रकिनारी खेड्यात हळूहळू बंदरे विकसित होऊ लागली. आबू धाबी, दुबई, शारजा, रास अल खैमाह ही खेडी व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला येऊ लागली. वेगवेगळ्या अरब जमाती व्यवसायात उतरल्याने या खेड्यात लोकवस्ती वाढत गेली. या छोट्या छोट्या बंदरातून भारतीय उपखंडात आणि युरोप मध्ये व्यापार होऊ लागला. उद्योगधंदे करण्यासाठी पोषक वातावरण आणि साधन संपत्तीचा अभाव यामुळे विनियोगाचे एकच माध्यम होते ते म्हणजे जलमार्गे होणारी वाहतूक. अरब हे मोती, खजूर, उंट, घोडे यांच्या बदल्यात मसाले, चहा, कॉफी, तंबाखू, खाद्यान्न, कापड विकत घेत. पुढे आठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात आखातातील नैसर्गिक मोत्यांची मागणी विशेषतः भारतीय उपखंडातील राजे राजवाडे याच्याकडून वाढत गेली. मंबई हे त्या काळी आखाती मोत्यांची मोठी बाजारपेठ होती.

मोती शिंपल्यांचा शोध घेण्यासाठी 18 ते 20 लोक एका मध्यम आकाराच्या बोटीवर निघत. ही बोट साधारणे मे ते सप्टेंबर अशी चार पाच महिने समुद्रात मोती शोध करायची. या प्रवासात खाण्यासाठी लागणार्‍या वस्तू जसे तांदुळ, पीठ, काॅफी, तंबाखू, खजूर व इतर किराणा सामानाबरोबर मांसाहार करता यावा यासाठी काही वेळा शेळ्या मेंढ्याही बोटीत नेत. बहुधा ते कामगार समुद्रात पकडलेले ताजे मासे आणि भात असा आहार घेत. शरीराला पुरेशी ऊर्जा व जीवनसत्त्व मिळण्यासाठी हे कामगार खजुराचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असत. किनार्‍यावरूनच गोड्या पाण्यानी भरलेले लाकडी पिंप बोटीत असत. पाणी व खाद्य पदार्थ संपल्यावर बोटी जवळपासच्या बेटावर किंवा किनार्‍याच्या गावात जाऊन जरूरी सामानाचा भरणा करत. बोटीत कमीत कमी आठ पानबुडे (Divers), बुड्यांना ओढणारे काही ताकतीचे लोक (Haulers), स्वयंपाकी, बोटीतील कामगारांचा उत्साह वाढवण्यासाठी एक गायक आणि या सर्वावर देखरेख ठेवणारा व काळजी घेणारा नायक ( Captain) असे. एकोणिसाव्या शतकाच्या प्ररंभी उपलब्ध माहितीनुसार जवळपास 1200 बोटी आणि 22000 कामगार या व्यवसायात सामील होते.

खोल समुद्रात बुडी घेणे हे फार कठीण व जोखमीचे काम होते. बरेचदा बुडी घेणार्‍याच्या हे काम जीवावर बेतायचे. बुड्याचे काम सकाळी सूर्योदया पासून ते सुर्यास्त होई पर्यंत चालायचे. बुडी मारणारे दिवसातून किमान 50 बुड्या घेत. बुडी साधारणपणे 40 मीटर खोल व जास्तीत जास्त दोन मिनिटे चालायची. जेवण करणे, काॅफी पिणे किंवा प्रार्थना करणे या कामासाठी पानबुडे यांना सुट्टी मिळायची. बुडी घेणार्‍याच्या पायाला दावे बांधलेले असत. पाण्यात लवकर बुडावे यासाठी त्यांच्या पायाला वजनी दगड बांधलेला असे. नाकात समुद्राचे पाणी जावू नये यासाठी नाक छोट्या चिमट्याने बंद केलेले असे. कानात विशिष्ट प्रकारच्या मेणाचे बोळे घालून बंद केलेले असत. हाताची बोटे चामड्याचे मोजे वापरून सुरक्षित केली जात. बुडी घेतल्या नंतर तळाला शक्य तेव्हढे शिंपले जमा करून पानबुडे त्यांच्या गळ्यात बांधलेल्या पिशवीत टाकत. काम संपल्यावर बोटीवरच्या ओढणार्‍यास इशारा केल्या नंतर तो संपूर्ण ताकदीनिशी पानबुड्याला वर ओढुन काढे. पानबुड्या पाण्यातून वर आल्यावर त्याच्या गळ्यातील पिशवी तत्काळ रिकामी करण्यात येई तोपर्यंत तो दम घेऊन पुढच्या बुडीसाठी तयार होत असे. दिवसभराच्या परिश्रमानंतर सर्व कामगारांना जेवण मिळायचे. थोड्या विश्रांती नंतर नायकाच्या कडक देखरेखी खाली दिवसभर जमलेले शिंपले फोडण्यात येत. अंदाजे 50 ते 200 शिंपल्यात एखाद दुसराच मोती मिळायचा. या शिंपल्यातून विविध आकाराचे लहान मोठे मोती मिळत. त्यांच्या आकारानुसार त्यांची वर्गवारी करण्यात येत. मोठ्या आकाराच्या मोत्यांना जास्त मागणी व भाव असे.

जमवलेले मोती व्यापाऱ्यांना विकण्यात येत. मोत्यांचा व्यवसायाच्या अर्थकारणाचे बरेच प्रकार होते. जर नायकाची स्वतःची बोट असल्यास त्याला सर्व मोती व्यापाऱ्याला विकण्याचा अधिकार असे. अन्यथा पतपुरवठा करणारे सावकार मंडळी हे सर्व मोती घेऊन कामगारांना त्याचा ठरलेला हिस्सा देत. कामगार हे रोजंदारीवर काम न करता उत्पन्नातून मिळणाऱ्या नफ्यात वाटा घेत. पानबुड्यांना ओढणार्‍या कामगारापेक्षा दुप्पट पैसे मिळत. या व्यवसायात रोजंदारीवर काम नसल्याने फार धोके होते. एकतर जीवावर बेतुन समुद्रात बुड्या मारायच्या आणि त्यात जर मोसम चांगला गेला नाहीतर कामगारचे मोठे आर्थिक नुकसान व्हायचे. हे कामगार पतपुरवठा करणाऱ्या सावकाराकडून आगाऊ उचल घ्यायचे त्यामुळे वाईट मोसमात मोती कमी मिळाल्यास त्यांना कर्ज बाजारीही व्हावे लागायचे. पण बरेचदा त्यांना मनाजोगती कमाई व्हायची. अशा वेळी हे कामगार त्या पैशातून उंट आणि खजुराच्या बागात गुंतवणूक करून वर्षभर आरामात जीवन जगायचे.

1920 नंतरचे दशक या व्यवसायासाठी काळ म्हणून सामोरे आले. जपानमध्ये कृत्रिमरीत्या मोत्याची लागवड सुरू झाली. हे मोती अतिशय कमी किंमतीत उपलब्ध होऊ लागल्याने आखाती मोत्याची मागणी घटत जावुन पुढे ती बंदच झाली. 1930 च्या दशकात खनिज तेलाचा शोध लागण्यापर्यंत येथील अर्थव्यवस्था कोलमडून पडली. या व्यवसाशी संबंधित सर्व कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आणि प्राचीन अशा मोती व्यवसायाची अखेर झाली.

_गणेश पोटफोडे (दुबई)

संदर्भ 
1. Abu Dhabi Authority for Culture & Heritage
2. Records of Dubai 1761-1960 (Volume 3)

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

अरबी वेशभूषा

एखाद्या देशाच्या वेशभूषेवर तेथील संस्कृती, चालीरीती, धर्म याच बरोबर हवामान यांचा प्रभाव पडलेला असतो. धर्म-संस्कृती हा दुय्यम घटक झाला पण स्थानिक हवामान हा वेशभूषा रचनेतील महत्वाचा घटक मनाला गेलेला आहे. धर्म एक असूनही वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांच्या वेशभूषा ह्या वेगवेगळ्या असू शकतात. भारताचेच उदाहरण घ्याचे झाले तर उत्तर भारतातील वेशभूषा हि पश्चिम भारत, मध्य भारत, पूर्व भारत, तसेच दक्षिण भारत यांच्यापेक्षा भिन्न आहे. थोडक्यात भारतातील वेगवेगळ्या प्रदेशाच्या वेशभूषा ह्या त्या त्या प्रदेशाच्या हवामानाशी निगडीत आहेत.

अरब खंडातील वेशभूषा हि येथील अतिउष्ण वातावरण, वाळवंट यापासून संरक्षण व्हावे अशी बनली आहे. अरब खंडातील सर्व देशात सारखीच वेशभूषा वापरली जाते. अलीकडच्या काळात ज्या त्या देशाच्या परंपरेची कमी अधिक प्रमाणात छाप वेशभूषेवर पडलेली आहे. अमिराती, ओमानी, सौदी, बहारेनी हे लोक त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या वेशभूषेवरून चटकन ओळखता येवू शकतात.

अरब खंडातील वेशभूषा हि बेडोईन संस्कृतीचा वारसा आहे. अरबी भाषेत बेडू म्हणजे उघड्या वाळवंटात वसती करून राहणारे समूह. बेडू लोकांच्या अनेक वेगवेगळ्या जमाती आहेत. बेडू शब्दाचा अपभ्रंश होऊन इंग्रजीत या संस्कृतीसाठी बेडोईन (Bedouin Culture) हा शब्द बनला आहे. जेंव्हा बेडू लोक वाळवंटात वसती करून राहायचे अर्थातच वाळवंटातील उष्णता, वाळूचे वादळ व धूळ यासून स्वतःचे संरक्षण व्हावे अशीच वेशभूषा ते परिधान करायचे. सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी पूर्ण भयाचे व सर्वांग झाकले जाईल असा पोशाख ते वापरत. तर वाळूच्या वादळापासून संरक्षण होण्यासाठी स्त्री व पुरुष हे विशिष्ट कापड डोक्यावर किंवा चेहऱ्या भोवती गुंडाळायचे. हि शेकडो वर्षाची परंपरा आजच्या अरब वेशभूषेतही पाहण्यास मिळते. जगात आधुनिकीकरण झाले. जुन्याच्या जागी अनेक आधुनिक वस्तू आल्या परंतु अरब खंडातील अरबी लोक अजूनही आपल्या संस्कृतीशी घट्ट बांधलेले आहेत हे त्यांच्या वेशभूषेवरून प्रकर्षाने जाणवते.

पुरषांची वेशभूषा :
अमिराती पुरुषांच्या वेशभूषेत मुख्यत्वे कंदुरा किंवा तोब, केफिया, टाकिया, इगाल, आणि इजार या गोष्टींचा समावेश असतो. कंदुरा (Kandura) किंवा तोब (Thobe) हे पायापर्यंत अंग झाकेल असे व लांब भायाचे वस्त्र आहे. या पेहरावाला वेगवेगळ्या अरबी बोलीभाषेत वेगवेगळी नावे आहेत. ओमानी लोक याला दिशदशा (Dishdasha), सिरियात याला जलाबिया (Jalabiyyah), मोरोक्कोत गन्दुरा (Gandora) तर अमिरात मध्ये याला कंदुरा म्हणतात. तोब हा शब्द सर्वाधिक प्रचलित असून सौदी लोक याच नावाचा जास्त वापर करतात. कंदुरा हे सर्वसाधारणपणे सुती कापडापासून बनवलेले असतात. थंडीच्या दिवसात वापण्यात येणारा कंदुरा हा मेंढीच्या लोकरीपासून बनवलेला असतात. मुख्यत्वे सिरीया, इराक व सौदी अरेबियाच्या काही भागात जेथे थंडी जास्त पडते त्या भागात हिवाळ्यात लोकरीचे कंदुरा वापरतात. अमिराती आणि ओमानी लोक शक्यतो उघड्या गळ्याचे कॉलर नसलेले कंदुरा वापरतात. त्यामानाने सौदी किंवा कतारी लोक जड कॉलर व भयाचे फॅशनेबल कंदुरा वापरतात.

कंदुऱ्याचा रंग बहुधा पांढरा असतो. सूर्य किरणे परावर्तीत व्हावीत असा यामागचा उद्देश असावा. उन्हाळ्यात पांढरा रंग सर्वाधिक वापरला जातो. जशी थंडीची चाहूल लागते तसे वेगवेगळ्या रंगाचे कंदुरा परिधान केलेले लोक पाहण्यास मिळतात. सोनेरी किंवा बदामी, ब्राऊन, आकाशी निळा व राखाडी रंगाचे कंदुरा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरेले जातात. अरबी माणूस दिवसातून कामाच्या स्वरूपानुसार अनेकवेळा कंदुरा बदलू शकतात. महत्वाच्या कामाला वेगळा, नामजा साठी वेगळा किंवा संध्याकाळी घालण्याचा वेगळा. एका अमिराती माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कंदुरे असतात.

अमिराती आणि ओमानी लोक गळ्याभोवती कापडाची सुंदर कलाकुसरीची वेणी परिधान करतात. हि वेणी पाश्चात्य टाय प्रमाणे गळ्यात लटकलेली असते. याला केरकुशा (Kerkusha) म्हणतात. केरकुशा असलेला कंदुरा अमिरातीत फार प्रसिध्द आहे.

कंदुऱ्याच्या आत अरबी लोक पायाच्या घोट्यापर्यंत पायजमा किंवा लुंगी नेसतात घालतात त्याला इजार (Izaar) म्हणतात. इजार कंदुऱ्यात झाकून केल्यामुळे दिसत नाही.

संपूर्ण कंदुऱ्याच्या मापाचा कोट किंवा जाकेट सारखा वापरण्यात येणाऱ्या पोशाखाला बिश्त (Bisht) म्हणतात. हा पोशाख फक्त महत्वाच्या कार्यक्रमाला, सणासुदीला, उत्सव वा विवाह समारंभास परिधान करतात. बिश्त जाकेट सारखे वापरले जात असल्याने याचे रंग फार उठावदार असतात. काळा, बदामी, राखाडी, ब्राउन रंगांचे बिश्त प्रसिद्ध आहेत. बिश्तचे काठ सोनेरी धाग्यांनी विणलेले असल्यामुळे ते फार आकर्षक दिसतात. सौदी अरेबियामध्ये काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने उंटाच्या केसापासून बनवलेली बिश्त वापरतात. बिश्त परिधान करणे हे समृद्धीचे प्रतिक मानले जाते. बिश्त केवळ राज परिवारातील सदस्य, मंत्री, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, मशिदीचे इमाम, जमातीचे प्रमुख असे लोकच वापरतात.

पुरुष डोक्यात जाळीदार टोपी घालतात त्याला येथे टाकिया (Takiya) किंवा घाफिया (Ghafiya) म्हणतात. या टोपीच्या वर अरबी लोक एक प्रकारचा हेडस्कार्फ वापरतात त्याला केफिया (Keffiyeh) किंवा घीत्रा (Ghitra) म्हणतात. केफियाचे अरब खंडात अनन्यसाधारण महत्व आहे. येथील उष्णतेच्या तीव्रतेपासून, धूळ व वाळूपासून डोक्याचे व चेहऱ्याचे संरक्षण व्हावे यासाठी हा बेडोईन पोशाखाचा महत्वाचा भाग आहे. अमिराती मध्ये पांढऱ्या रंगाचा केफिया वापरतात. केफिया हे चौरसाकृती सुती कापड असते. त्याची त्रिकोणी घडी घालून डोक्यावर ठेवतात. केफियाला पकडून ठेवण्यासाठी काळ्या रंगाची गोलाकार नळी वापरतात. त्याला इगल (Egal / Igal) म्हणतात. डोक्यात घातलेली जाळीदार टोपी टाकिया व इगल यांच्यामध्ये केफिया घट्ट बसवण्यात येतो.

केफिया हा लोकरी पासूनही बनवतात. हिवाळ्यात लोकरीच्या केफियाचा वापर जास्त होतो. केफियाच्या रंगावरून त्या माणसाचा हुद्दा, राष्ट्रीयत्व ओळखता येवू शकते. लाल व पांढऱ्या रंगाचे केफिया अरब खंडात फार प्रचलित आहेत. लाल पांढऱ्या रंगाच्या चौकड्या असणाऱ्या केफियाला शिमाघ (Shimagh) असेही म्हणतात. शिमाघचा वापर सौदी अरेबिया आणि जॉर्डन याठिकाणी जास्त होतो. १९६० च्या दशकात पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफात यांनी काळ्या पांढऱ्या चौकड्या असलेल्या केफियाला पॅलेस्टाईनचे प्रतिक बनवून एक मोठी राष्ट्रीयत्वाची चळवळ उभी केली. यासर अराफात यांचा पेहराव हा नेहमी सैनिकी अथवा पाश्चात्य असायचा तरी ते केफिया व इगल परिधान करायचे. काळ्या पांढऱ्या रंगाचा केफिया आता पॅलेस्टाईनची ओळख बनला आहे. वेगवेगळ्या बेडोईन जमातीचे वेगवेगळे केफिया असू शकतात. त्यांच्या रंगावरून तो माणूस कोणत्या जमातीचा आहे हे समजते. ओमानी लोक डोक्यात भरतकाम केलेली टोपी घालतात तिला कुमा (Kuma) असे म्हणतात. ओमानी लोकांचा केफिया थोडासा भिन्न असून त्याला ते मस्सार (Massar) म्हणतात.

तरुण अमिराती युवा वर्ग आजकाल इगल न वापरता केफिया डोक्याभोवती गुंडाळतात. या विशिष्ट प्रकारच्या बांधलेल्या केफियाला हमदानिया (Hamadaniya) म्हणतात. केफिया हे कंदुऱ्याच्या रंगाशी मेळ खाणारे असतात. केफियाचे प्रकार हे प्रसंग, हवामान व माणसाचा हुद्द यावरून बदलत राहतात. केफिया बांधण्याच्या वेगवेगळ्या शैली आहेत. या शैली वेगवेगळ्या देश्याच्या वेगवेगळ्या आहेत.

अरबी लोक पायात नाआल (Na-aal) घालतात. नाआल एक प्रकारची चप्पल असून हि वेगवेगळ्या रंगत उपलब्ध असते. कंदुऱ्याच्या रंगाशी जुळणारी नाआलचा रंग असतो. आजकाल अरबी लोक नाआलच्या ऐवजी सामान्य बूटही वापरतात.
(क्रमशः)

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

दुबईतील गुलाबी थंडी

ऑक्टोबर सरता सरता दुबईतील तापमानाचा पारा खाली उतरू लागतो. जीव नकोसा करणारा, अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा संपतो आणि चाहूल लागते ती हिवाळ्याची. नोव्हेंबर महिन्यात तापमान सामान्य होत जाते. बहुतेक घरातील ए सी बंद राहतात. भर दुपारी बाहेर फिरताना उन्हाची रखरख जाणवत नाही.

डिसेंबर महिन्यात बहुतेक वेळा आकाश काळ्या ढगांनी व्यापून जाते. या महिन्यात बरेचदा पाऊल अनुभवायला मिळतो. पाऊस आणि उत्तर पश्चिम दिशेकडून वाहणारा वारा यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. सलग आठ नऊ महिने अडगळीत पडलेली स्वेटर, मफलर बाहेर पडू लागतात. पावसाचे ठराविक प्रसंग सोडल्यास आकाश मोकळे असते. उबदार कोवळे उन अंगाखांद्यावर घ्यावेसे वाटते. दुबईतील बाग बगीचे, रस्ते मनमोहक सुगंधी फुलांनी सजवले जातात. स्वतःला वातानुकूलित घरात, गाडीत बंद करून ठेवणारे दुबईकर मुक्तपणे उघड्या गाडीतून फिरू लागतात.

दुबईतील रस्ते पर्यटकांनी भरून जातात. दुबईतील गुलाबी थंडी अनुभवायला देशविदेशातील पाहुणे डेरेदाखल होतात. परदेशी पाहुण्यात पक्षांचाही समावेश असतो. दुबई क्रिकवर परदेशी पक्षी मनमोकळेपणे वातावरणाचा आनंद लुटतात. आपल्या देशात अंग गोठणाऱ्या कडाक्याच्या थंडीपेक्षा इथले वातावरण त्यांना स्वर्गा सारखे भासू लागते.

नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबई आता जागतिक केंद्र बनले आहे. येथली आतिषबाजी पाहण्यास लाखो पर्यटक येतात. बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब, पाम आयलंड वरील नयनरम्य आतिषबाजी अनुभवायला प्रचंड गर्दी होते. नाताळ व नवीन वर्षाची येथे सरकारी सुट्टी असल्याने डिसेंबरचा शेवटचा आठवडा उत्साहात सरून जातो.

जानेवारी महिन्यात दुबई शॉपिंग फेस्टिवलची सुरूवात होते. दुबईतील हाॅटेल व पर्यटन व्यावसायिकांसाठी हा सुवर्ण काळ असतो. विविध ऑफर्स आणि योजना घेऊन दुबईतील दुकाने व माॅल्स तयार होतात. सोने खरेदीला उधाण येते. सोन्याची या दिवसात एवढी मोठी खरेदी होते की दर दिवशी एका भाग्यवान विजेत्याला चक्क एक किलो सोने बक्षिस म्हणून दिले जाते.

ग्लोबल व्हिलेज, समुद्र किनारे, माॅल्स अक्षरश: भरून जातात. या दिवसात लोक डेझर्ट सफारीचा आनंद घेतात. थंड वातावरणात वाळवंट अनुभवायला मिळतो. बरेच लोक वाळवंटात कॅम्प करून राहतात. फेब्रुवारी सरता सरता दुबईतील पर्यटक मायदेशी निघतात.

मार्च सुरू झाल्यावर तापमानाचा पारा परत चढू लागतो. हवा हवासा वाटणारा हिवाळा संपलेला असतो. पूढील आठ महिने हिवाळ्याची वाट पाहण्यात कंठावे लागतात.