नव्वदचे दशक नुकतेच सुरू झाले होते. जागतिकीकरण अजून भारतात दाखल झाले नसल्याने, त्याचे दुष्परिणाम समाजात कुठेच दिसत नव्हते. सामाजिक मूल्ये आणि आत्मीयता जपणारा तो काळ होता. मी तेव्हा अमरापूरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होतो. शाळेत जातांना आम्ही अमरापूर हायस्कूलमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थी आणि एकूणच हायस्कूल विषयी अतिशय कुतूहल वाटायचे. कुतूहलाचे मुख्य कारण म्हणजे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बेंच असत, तर प्राथमिक शाळेत त्यावेळी शेणाने सारवलेल्या वर्गातच बसावे लागे. दुसरे कारण म्हणजे हायस्कूल गावाबाहेर असल्याने तिथे चालत जायला खूपच मज्जा वाटे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला आम्ही प्राथमिक शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर हायस्कूलवर धावत जात असू. हायस्कूलवर त्यावेळी मिळणाऱ्या विविधरंगी गोळ्यांचे आम्हाला फार अप्रूप वाटे.
१९९२ साली मी अमरापूर हायस्कूलला इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी हायस्कूलला पश्चिमाभिमुखी पत्र्याच्या खोल्यांचे वर्ग आणि तीन उत्तराभिमुखी स्लॅबचे अपुर्ण बांधलेले वर्ग होते. शाळेला बोर्डिंग देखील होते. एका ग्रामीण भागातील शाळेत ज्या सुविधा असाव्यात त्या सगळ्या सुविधा आम्हाला हायस्कूलमध्ये मिळत असत. शाळेला प्रशस्त मैदान होते. प्रयोगशाळेचे साहित्य होते तसेच ग्रंथालय देखील होते. त्याकाळी शिक्षकांविषयी सगळ्यांनाच आदरयुक्त भीतीचे वातावरण असे. गृहपाठ न करणार्या विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद खावा लागत असे. लवांडे सर, गरड सर, पुजारी सर, खोले सर, बेहळे सर, भिसे सर, वावरे सर असे आदर्श शिक्षक आम्हाला लाभले. त्याच बरोबर वांद्रे सर आणि कांबळे सर यांच्यासारखे आदर्श आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापकही लाभले. तुपे सर क्लार्क म्हणून काम बघत असत. आराख मामा, औतडे मामा, लवांडे मामा आणि वांढेकर मामा या सारखे प्रेमळ शिपाई त्यावेळेस हायस्कूलवर कार्यरत होते.
सगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी होती. पुजारी सर आणि बेहळे सर शिकवताना खूप विनोद करत आणि संपूर्ण वर्गाला नेहमीच हसवत असत. बेहळे सर आम्हाला विज्ञान विषय शिकवायचे. बेहळे सरांना आध्यात्माची खूप आवड होती. ते स्वतः एक उत्तम कीर्तनकार देखील होते. लवांडे सर आम्हाला समाज अभ्यास शिकवायचे. ते पाचवी ते सातवीपर्यंत माझे वर्गशिक्षक होते. आम्हाला खोले सरांची अतिशय भीती वाटत असे, कारण ते इंग्रजी विषय शिकवायचे. वावरे सर हिंदी आणि खेळाचे शिक्षक होते. वावरे सरांनी शाळेत अनेक खेळाडू घडवले. खो-खो आणि कबड्डी या मैदानी खेळाकडे आमचा फार ओढा असायचा. भिसे सर माझे आठवी ते दहावीपर्यंत वर्ग शिक्षक होते. ते आम्हाला गणित विषय शिकवायचे.
स्वर्गीय आबासाहेब काकडे यांचा एफ. डी. एल. संस्था स्थापन करण्या मागचा हेतू खूप व्यापक होता. गोरगरीब आणि सामान्य माणसांची मुलं शिक्षणापासून वंचित राहाता कामा नये, त्यांना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी शेवगाव सारख्या मागास आणि दुष्काळी तालुक्यात शिक्षण संस्था चालू केली. अमरापूर हे अनेक खोट्या मोठ्या खेड्यांना जोडणारे गाव होते. तेथील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी शेवगावला जावे लागत असे. अमरापूरला हायस्कूल स्तरावरची शाळा चालू करणे खूप सोईचे होते, म्हणूनच आबासाहेबांनी अमरापूर गावाची हायस्कूल उभारण्यासाठी निवड केली असावी. हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारी सगळीच मुले ही शेतकरी आणि शेतमजूरांची होती. तेव्हा सगळेच विद्यार्थी गरीब आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असणारे होते. शिक्षण घेण्यासाठी अनेकजण सुट्टीच्या दिवशी शेतात रोजंदारीवर कामाला जात असत. त्याकाळी फार काही आधुनिक शालेय साहित्य उपलब्ध नसे. खताच्या गोण्यांचा सर्रास दप्तराच्या पिशवीसाठी वापर केला जायचा तर उरलेल्या जुन्या वह्यांची पाने एकत्र शिवून नवी वही तयार करण्याची तेव्हा प्रथा होती. नवीन पुस्तकं विकत न घेता जुनीच पुस्तकं वापरली जात असत. एकच गणवेश धुवून वापरला जायचा.
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट व्यतिरिक्त शाळेत विविध सण आणि उत्सव साजरे केले जात असत, त्याच प्रमाणे विविध स्पर्धा आणि शैक्षणिक सहली देखील आयोजित केल्या जात. शाळेत दहा दिवसाचा गणपती बसवला जायचा. सकाळी प्रार्थनेच्या वेळी आरती केली जाई. रोज एक वर्ग आरतीसाठी प्रसाद म्हणून घरून मोदक बनवून आणायचे. रोज सकाळी मोदक खायला मिळायचे. काही विद्यार्थी मुद्दाम साखरे ऐवजी मोदकात मीठ किंवा मिरचीचा ठेचा घालत असत. हायस्कूलमध्ये रक्षाबंधन साजरा करण्याची देखील त्यावेळी प्रथा होती. प्रत्येक वर्गात त्यावेळी दत्ताचा फोटो असे. दर गुरूवारी पहिल्या तासाला दत्ताची आरती केली जात असे. क्रमाक्रमाने प्रत्येकाला आरतीसाठी प्रसाद आणावा लागे. याशिवाय विविध राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात असत. त्याच आमचा नेहमीच सक्रिय सहभाग असे.
आयुष्यातील यशात अमरापूर हायस्कूल मधील शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे. हायस्कूलमध्ये दाखल झालो तेव्हा बॅकबेंचर आणि ढ विद्यार्थी म्हणून माझी गणती होत असे. कालांतराने आमच्या आदर्श शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने मी १९९७ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालो. त्यावर्षी मी शाळेत पहिला येण्याचा मान पटकावला. आज मागे वळून बघतांना ज्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतले ती परिस्थितीच आमच्या यशासाठी कारणीभूत ठरली असे म्हणावे लागेल. आज शाळेला सुसज्ज इमारत आहे. शाळा ज्ञान दानाचे आणि विद्यार्थी घडवण्याचे काम अखंडपणे करते आहे याचे कौतुक वाटते. भविष्यातही अमरापूर हायस्कूलने खूप प्रगती करेल आणि येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करत राहतील.