मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

शरद पवार : राजकारणातील तेल लावलेला पैलवान



शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेले एक अजब रसायन म्हणावे लागेल. गेल्या जवळपास पन्नास वर्षापासून शरद पवार यांचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वावर आणि दबदबा राहिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात विविध खात्याचे मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा झाली पण संख्याबळाच्या अभावी त्यांना हे पद भुषविता आले नाही. शरद पवार यांचे राजकारण मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शैक्षणिक संस्था, विविध क्रीडा संस्था तसेच सहकारी संस्था यामध्येही शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे. असा हा अष्टपैलू नेता २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खरा महानायक ठरला.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिखर बँकेतील अयोग्य कर्जवाटपाप्रकरणी शरद पवारांसह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाने आदेश दिला. संबंध नसतानाही शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात आल्याने केंद्र सरकार सुडाचे राजकारण करते की काय? असा प्रश्न उपस्थित केला गेला. ईडी कडून गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर राज्यभरात शरद पवार यांच्या समर्थनात ठिकठिकाणी मोर्चे निघाले. केंद्र सरकार दबावतंत्राचे राजकारण करण्यासाठी ईडी आणि सीबीआय चा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आपण स्वतः चौकशीला सामोरे जाण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करून पवारांनी एकच खळबळ उडवून दिली. २७ सप्टेंबरला राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमू लागले. अनेक ठिकाणी मोर्चे निघू लागले. राज्यात विषेशतः मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उद्भवू नये म्हणून पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचा आपला निर्णय शेवटच्या क्षणी मागे घेतला. शेवटी व्हायचे तेच झाले या साऱ्या घटनाक्रमाचा शरद पवारांनी फायदा उचलून स्वतःविषयी सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले. ईडी सारखे संकट डोळ्यासमोर असतांनाही शरद पवार यांनी आपल्या राजकीय चातुर्याने त्याला संधीत रुपांतरीत केले.



निवडणुका लागायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मधुकरराव पिचड, विजयसिंह मोहीते पाटील, उदयनराजे भोसले यासारखे पवारांच्या तालमित वाढलेले दिग्गज नेते त्यांना सोडून गेले. ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आमदार, खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सोयीनुसार भाजप अथवा शिवसेनेत डेरे दाखल होत होते. एव्हढी पक्षाला गळती लागूनही शरद पवार खचले नाहीत. ८० वर्षाचे वय, कर्करोगासारखा झालेला गंभीर आजार यांच्यापुढे हात न टेकता शरद पवारांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेतली आणि पायाला भिंगरी लागल्यागत त्यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करून चाळीसहून अधिक प्रचारसभा घेतल्या. एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल या उत्साहात शरद पवार ठिकठिकाणी सभांना संबोधित करत होते. काँग्रेस हायकमांडने तर महाराष्ट्राच्या निवडणूकीकडे संपूर्णपणे पाठ फिरवल्याचे याठिकाणी नमूद करावे लागेल. जणूकाही निवडणुकीच्या आधीच त्यांनी हार पत्करली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, स्टार प्रचारक प्रियंका गांधी या महाराष्ट्रात फिरकल्या देखील नाहीत. राहूल गांधी यांच्या जेमतेम पाच सभा या निवडणूकी दरम्यान महाराष्ट्रात झाल्या. याचा फायदा काँग्रेसला कीतपत झाला असेल हे सांगणे कठीणच आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे स्वतःच्याच मतदार संघात अडकवून पडल्याने आघाडीच्या वतीने एकटे शरद पवारच प्रचाराचा किल्ला लढवत असल्याचे जाणवले.

२०१९ ची विधानसभा निवडणूक शरद पवार विरूद्ध भाजप अशीच झाली. भाजपाचे दिल्लीतील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात सभा घेत होते. कलम ३७० सारख्या मुद्द्यांवर भाषण देत होते. त्यांच्या भाषणात स्थानिक मुद्द्यांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. मोदी-शाह शरद पवार यांच्या जोरदार टिकेची संधी देखील सोडत नव्हते. दुसरीकडे शरद पवार शेतकरी आत्महत्या, बंद पडणारे उद्योगधंदे, वाढती बेरोजगारी, पूर परिस्थिती, दुष्काळ, शेतीमालाला भाव अशा स्थानिक व जनतेसाठी तितक्याच जिव्हाळ्याच्या असणाऱ्या प्रश्नांवर सरकारवर टीकास्त्र सोडत होते. सरकारला मतं मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही ते ठामपणे सांगत होते. शरद पवारांच्या या सभांना तरुण मतदार मोठी गर्दी करत असल्याचे चित्र यावेळी पहायला मिळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुस्ती करण्यासाठी विरोधात कुणीच पैलवान नाही म्हणत ही निवडणूक खूप सोपी असल्याचे सभांमधून सांगत होते. कुस्ती पैलवानाशी होते 'इतरांशी' नाही या शब्दात शरद पवार मुख्यमंत्र्याना जोरदार प्रतिकार करत होते.



या सगळ्या रणधुमाळीत साताऱ्याची सभा निर्णायक ठरली. चार महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन परत साताऱ्यातूनच भाजपाच्या तिकिटावर पोट निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले होते. प्रचार संपायच्या एक दिवस आधी ही सभा साताऱ्यात पार पडली. सभा चालू असताना जोरदार पाऊस आला तरीही शरद पवारांनी भर पावसात भाषण केले. उदयनराजे भोसले यांना गेल्यावेळी तिकीट देऊन खूप मोठी चूक केली असून यावेळी ती चूक दुरुस्त करायला मी येथे आलो आहे. मतदानातून यावेळी जनता नक्कीच चमत्कार घडवेल असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला. दुसऱ्या दिवशी शरद पवारांचे पावसात भाषण देतानाचे फोटो समाज माध्यमातून खूप व्हायरल झाले. सगळीकडे शरद पवारांच्या लढवय्या वृत्तीची प्रशंसा झाली. तरूणांनी शरद पवारांना अगदी डोक्यावर घेतले. काठावर असलेले असंख्य मतदार शरद पवारांनी या एका सभेतून लीलया खेचून आणले. यासभेचा राष्ट्रवादीला साताऱ्यातच नव्हे तर राज्यभरातील निकालावर मोठा फायदा झाल्याचे निकालातील आकड्यांवरून दिसले.

२०१९ निवडणुकीचा निकाल लागला. युतीच्या २२० जागा निवडून येतील, कदाचित भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल ही सगळी स्वप्नं निकालानंतर फोल ठरली. यावेळी बहुजन विकास आघाडीचा विरोधीपक्ष नेता असेल असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजून जीवंत आहे याची जाणीव शरद पवारांनी करुन दिली. अपेक्षेप्रमाणे युतीला या निवडणूकीत यश मिळले पण एकट्या शरद पवार या नावावर राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले. यावेळी आघाडीचे अस्तित्व संपेल असे अनेक राजकीय विश्लेषक म्हणत होते, पण शरद पवारांनी एक हाती लढा देत निवडणुकीचा निकाल फिरवला. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले नसले तरी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात २०१९ ची निवडणूक ही शदर पवारांच्या 'फायटींग स्पिरीट'साठी नेहमीच स्मरणात राहील.







टीप : बातम्यांची कात्रणे हि सकाळ आणि पुढारी वृत्तपत्रांतून संकलित करण्यात आली आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा