२०११ साली मला दुबई, युएई येथे नोकरीची संधी मिळाली आणि मी दुस-यांदा नोकरीसाठी आखातात आलो. सौदीच्या अनुभवाचा मला दुबईत रूळण्यास खूप फायदा झाला. आज मी दुबईत इंजिनिअर या पदावर काम करत आहे.
दुबईतील आणि सौदी अरेबियातील हवामान यात फारसा फरक नव्हता. सात महीने कडक उन्हाळा. पावसाळा हा ॠतूच येथे नाही. हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान थोडाफार पाऊस पडतो. परंतु या दोन देशात महत्वाचा फरक होतो आणि तो म्हणजे दुबईतील मोकळे वातावरण . या देशात लोक आपले उत्सव, सण हे मुक्तपणे साजरे करू शकतात. त्यामुळेच बहुधा येथे मोठ्या संख्येने भारतीय लोक कुटुंबासोबत राहातात. दुबईत भारतीयांची संख्या जवळपास चाळीस टक्के आहे. त्यात मराठी माणसांचा वाटा देखील खूप आहे. एक सामान्य कामगारापासून ते थेट मोठ्या उद्योजकापर्यत येथे मराठी माणसांची वर्गवारी होवू शकते. मराठी उद्योजकांनी दुबईत महाराष्ट्रचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे.
[दुबई म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशातील एक राज्य आणि शहर. आबूधाबी, शारजा, दुबई, रास अल खैमा, अजमान, ऊम अल कुवैन आणि फुजैरा हे राज्य १९७१ पुर्वी वेगवेगळे देश होते. त्यांच्या राज्यप्रमुखांनी आबू धाबीचे शेख झायद यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन युएई ची स्थापना केली. खनिज तेल, नैसर्गिक वायू, पर्यटन, व्यापार याच्या जोरावर युएई ने गेल्या दोन दशकात खूप प्रगती केली आहे.]
दुबईत आल्यावर मी ब-याच सांस्कृतिक समूहांशी जोडला गेलो. मराठी माणूस एकत्र येवून येथे खूप वेगवेगळे उत्सव साजरे करत असतात. जवळपास सगळे सण दुबईत साजरे होतात. होळी वा रंगपंचमीला रंगाची उधळण असो, आषाढी वारीची किंवा तुकाराम बिजेची दिंडी असो, गणेश उत्सव असो, नवरात्रीतला गरभा असो, एकत्र मिळून खाल्लेले दिवाळीचे फराळ असो हे असले सगळे सण आणि उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात. दिवाळीला दुबईतील बर दुबई, करामा या भागात फिरताना आपण भारतात तर नाही ना? असा भास होतो. सगळी घरं, इमारती या रोषणाईने सजलेल्या असतात. दुबईत मराठमोळे "त्रिविक्रम ढोलताशा पथक" देखील आहे. अशा प्रकारचे हे आखातातील पहिले ढोलताशा पथक आहे. वर्षभरात या पथकाच्या माध्यमातून दुबईत ढोलताशाचा आवाज घुमत असतो.
दुबईतील मराठी माणूस हा खूप वाचनवेडा आहे. मराठी वाचकांसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक संचलित "ग्रंथ तुमच्या दारी" या योजनेमुळे शोकडो वाचकांना दर्जेदार मराठी पुस्तकं मोफत वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत. माझ्यासारख्या वाचनाची आवड असणा-या व्यक्तीला दुबईत पुस्तकं घेऊन जाण्यास खूप मर्यादा होत्या. सुट्टीवरून परत जातांना दोन-चार पुस्तकांपेक्षा जास्त नेता येऊ शकत नव्हती. आणि नेलेली पुस्तकं वर्षभर वाचण्यासाठी पुरेशी नसायची. पण जेंव्हापासून मी ग्रंथ तुमच्या दारी या योजनेशी जोडलो गेलो तेंव्हा पासून अनेक दर्जेदार ग्रंथ मला वाचण्यास मिळू लागले. आज ग्रंथ तुमच्या दारी या योजनेच्या अंतर्गत दुबईसह संपूर्ण युएई विविध ठिकाणी २७ ग्रंथ पेट्या आहेत. एक ग्रंथ पेटी म्हणजे त्या भागातील छोटं ग्रंथालयच असतं. या ग्रंथ पेट्या दर तीन महिन्यांनी समन्वयक आपआपसात बदलत असतात. त्यामुळे वाचकांसाठी नेहमीच नवनवीन ग्रंथ उपलब्ध होतात. ग्रंथ तुमच्या दारी च्या माध्यमातून मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृती यावर वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात; यात वाचक मेळावा, मराठी भाषा दिवस, वाचन प्रेरणा दिन, अक्षरबाग, अभिवाचन आणि काव्यसंमेलन आदींचा समावेश असतो.
दुबईत आणि खासकरून परदेशस्थ भारतीयांसाठी (एन आर आय) "विश्व पांथस्थ" नावाचं मासिक देखील सुरू झालं आहे. अशा प्रकारचे हे मराठी भाषेतील पहिलेच मासिक आहे. या मासिकाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोप-यात राहणा-या लोकांचे अनूभव वाचण्यास मिळत आहेत. या मासिकाचे वितरण भारतासह जगाच्या विविध देशात होत आहे.
दुबईत सगळ्या शाळा या इंग्रजी माध्यमातून आहेत. मराठी पालकांच्या लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, त्यांना मराठी लिहीता व वाचता यावी म्हणून विविध संस्था आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून दुबईत आणि आबूधाबी येथे मराठी शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच बाल वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दर आठवड्याला बालसंस्कार वर्गाचे देखील आयोजन करण्यात येते. ग्रंथ तुमच्या दारीच्या माध्यमातून बालवाचकांसाठी खास गोष्टींच्या पुस्तकांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
आमी परिवार नावाचा एक मराठी माणसांसाठी एक आगळावेगळा समूह देखील येथे सक्रिय आहे. हा समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो युएई मध्ये राहणा-या मराठी माणसांना विविध प्रकारची मदत करतो. व्हाट्सअपचा उपयोग फक्त विनोद, हाय-हॅलो न करता एका सामाजिक हेतूने हा समूह कार्य करत आहे. या समूहाच्या माध्यमातून अनेक दुबईकर मराठी लोकांना अडचणीच्या काळात मदत मिळाली आहे.
मराठी माणसांना दुबईचं खूप आकर्षक आहे. इथल्या उंच इमारती, वाळवंट या जगभरातील पर्यटकांना खुणावत असतात. दरवर्षी येथे खूप पर्यटक येतात त्यात मराठी पर्यटकांचाही खूप मोठा वाटा आहे. इथे स्थायिक झालेला मराठी माणूस इथलं वातावरण आपलंस करून आपली भाषा आणि संस्कृती यांना टिकवून ठेवत आहे. दुबई खरोखरच मराठमोळी झाली आहे.