रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

दुबईतील वाचन चळवळ भाग २

युएईत यंदाचे वर्ष वाचक वर्ष (रीडिंग ईयर) म्हणून घोषित करण्यात आले होते त्यात ग्रंथ तुमच्या दारीला दुबईत दोन वर्ष पूर्ण होत होती. या दोन्ही सुवर्णसंधीचा फायदा घेऊन ग्रंथ तुमच्या दारीच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त एक वाचक मेळावा आयोजित करावा अशी कल्पना ग्रंथ तुमच्या दारीचे दुबईतील मुख्य समन्वयक डाॅ. संदिप कडवे याच्या मनात आली. या मेळाव्यात सर्व वाचक, समन्वयक, आणि भारतातून एखाद्या साहित्यिकाला आमंत्रित करायचे असे ठरले. या मेळाव्याचा उद्देश म्हणजे अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचून ग्रंथचा विस्तार करणे हा होता. ज्यावेळी वाचक मेळाव्याची तयारी चालू झाली तेंव्हा कळले की मेळावा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार असून यात मुख्य वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि गीतकार प्रवीण दवणे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. खरतर प्रवीण दवणे सारखे मराठी साहित्य विश्वातील वरिष्ठ साहित्यिक येणार हीच माझ्यासाठी आणि दुबईतील समस्त वाचकांसाठी आनंदाची मोठी गोष्ट होती. मेळावा आयोजित करण्याचे ठरल्यापासून मी अगदी चातकासारखी या सोहळ्याची वाट पाहू लागलो.

ग्रंथ तुमच्या दारी व आमी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात येणार होता. आमी परिवार अर्थात अखिल अमिराती मराठी इंडियन (AAMI) या संघटनेने अल्पावधीतच दुबईत मोठी लोकप्रियता मिळवली होती. सामाजिक व सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसांचे एक मोठे संघटन केले होते. आमी परिवाराने वाचक मेळाव्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पेलवत ग्रंथ च्या मदतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी करून कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले. स्थळ ठरले शारजा विद्यापीठाचे सभागृह.

जेंव्हा मेळाव्याला मी शारजा विद्यापीठतील सभागृहाबाहेर पोहचलो तेंव्हा मला विश्वासच बसत नव्हता एवढी गर्दी होती. सभागृह खचाखच भरून गेले होते. हा सर्व समन्वयक आणि आमी परिवार यांच्या मेळाव्यासाठी घेतलेल्या अखंड मेहनतीचा परिणाम होता. मेळाव्यास कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विनायक रानडे, विश्वास ठाकुर उपस्थित होते. अजून एक योगायोग घडला तो म्हणजे प्रसिद्ध अनुवादक आणि लेखक रवींद्र गुर्जर हे यावेळी सुट्टीसाठी दुबईत आलेले होते. त्यांनाही या कार्यक्रमाची माहिती मिळाल्याने ते या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहिले. आमीचे संस्थापक संतोष कारंडे, आमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन साडेकर तसेच ग्रंथचे सगळ्या समन्वयकांसहित डाॅ. संदिप कडवे व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतीय संस्कृती प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाले. युएईत इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलींनी सरस्वती वंदना गाऊन कार्यक्रमात एक चैतन्य निर्माण केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे यांनी ही योजना सुरू करण्यामागचे आपले अनुभव सांगितले. दुबई नंतर ग्रंथ आता जगाच्या विविध देशात पोहचले असून दुबईत ५१ ग्रंथ पेट्यांचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. खरोखरच या माणूसात काहीतरी वेगळ रसायन असल्याचे जाणवले. वाचनाची आवड स्वतःपुरती न ठेवता तिला चळवळीचे रूप देणे आणि लोकांना वाचनासाठी प्रेरणा देण्या पूरतेच न थांबता मोफत ग्रंथही उपलब्ध करून देणे ही सर्वसाधारण गोष्ट नव्हती. ही व्यक्ती माझ्या मनात घर करून गेली.

बर्‍याच दिवसांपासून वाट पहात असलेल्या डाॅ. संदिप कडवे संपादित विश्व पांथस्थ या पहिल्या आखाती मराठी मासिकाचे या मेळाव्यात प्रकाशन झाले. गेल्या जवळपास एक वर्षांपासून डाॅ. कडवे मासिका साठी मेहनत घेत होते. त्यांची मासिका साठीची धडपड मी जवळून अनुभवली होती. मराठी मासिक युएई चालू करण्यासाठी किती तरी परवान्याची आवश्यकता होती. ते सर्व दिव्य पार करून हे मासिक वास्तवात आल्याने खरोखरच मराठी माणसांनी डाॅ. संदिप कडवे यांचे आभार मानायला हवेत. आखातात मराठी मासिक सुरू होणे ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल, कारण म्हणजे इतर भारतीय भाषेत कितीतरी दैनिकं, साप्ताहिकं आणि मासिकं दुबईतून प्रसिद्ध होत होती. जवळपास दिड लाख मराठी माणसांची लोकसंख्या असणाऱ्या या देशात मराठी माणसांसाठी त्यामानाने साधे त्रैमासिकही येथे प्रकाशित होत नव्हते. विश्व पांथस्थच्या रूपाने ही उणीव आता भरून निघणार आहे. हे मासिक आखाती मराठी माणसांचा आरसा होऊन उदयाला येईल यात मला अजिबात शंका वाटत नाही.

प्रवीण दवणे सरांनी दोन वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान दिले. पहिल्या सत्रात 'माझ्या लेखनाची आनंदयात्रा' आणि दुसऱ्या सत्रातील 'सावर रे' सादर करून रसिक प्रेक्षकांना मोहित केले. माझ्या लेखनाची आनंदयात्रा मध्ये श्री दवणे यांनी आपल्या जीवनातील साहित्यिक प्रवासाचे अत्यंत सुंदर वर्णन केले. आपले बालपणीचे विविध अनुभव सांगून त्यांनी श्रोत्यांना कधी हसवले तर कधी भावनिक बनवले. आजच्या आधुनिक काळात तरूण पिढी मोबाईल सारख्या उपकरणांच्या आहारी जावून वाचन संस्कृती विसरत चालली आहे. पैश्याच्या मागे न धावता खऱ्या बौद्धिक श्रीमंतीच्या मागे लागा, मातृभाषेवर प्रेम करा आणि वर्तमानात जगा असा संदेश त्यांनी दिला. दवणे सरांनी आपल्या आयुष्यात पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या सहवासात अनुभवलेल्या अनेक आठवणी ताज्या केल्या. गीत लेखन करण्यास किती मेहनत घ्यावी लागायची याचे अविस्मरणीय अनुभव त्यांनी सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रवीण सर खरोखरीच किती छान बोलत होते. सभागृहात बसलेल्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना हे व्याख्यान संपूच नये असे वाटत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री व प्रसिद्ध निवेदिका अनुजा पडसलगीकर यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. वाचकांना सहजपणे प्रश्नोत्तरांमधे गुंगवून प्रचिती तलाठी यांनी त्यांना सहभागी करुन घेतले. निवडक ग्रंथच्या वाचकांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्या निवडक वाचकात माझा समावेश होता. मी कुसुमाग्रज यांच्यात कवितेचा संदर्भ देऊन माझे मनोगत व्यक्त केले.

"आम्हा घरी आहे
शब्दांचेच धन
शब्द देता घेता
झाले आहे आता
शब्दाचेच मन"

माझ्या मनात शब्द पेरण्यात ग्रंथचा मोठा वाटा होता. मी सर्व ग्रंथ टीमचे आभार मानले. मनोगत व्यक्त केल्याबद्दल मला वाचक मेळाव्याचे स्मृतीचिन्ह म्हणून एक छानसा काॅफीमग भेट मिळाला.

मध्यंतरात रवींद्र गुर्जर, विनायक रानडे आणि प्रवीण दवणे यांच्याशी मला गप्पा मारण्याची संधी मिळाली. प्रवीण दवणे यांची काही पुस्तकंही विक्रीला उपलब्ध होती. त्यातील अलिकडेच प्रकाशित झालेला "एक कोरी सांज" हा काव्यसंग्रह विकत घेऊन त्यावर प्रवीण सरांचा स्वाक्षरी संदेश मिळवला. मी डाॅ संदिप कडवे यांची भेट घेऊन विश्व पांथस्थ मासिकाबाबत त्यांचे अभिनंदन केले. ग्रंथ तुमच्या दारीची पेटी मी रहात असलेल्या देअरा भागात उपलब्ध नव्हती. मी त्यांना विनंती केली की, एखादी शिल्लक पेटी असल्यास तिची जबाबदारी मला देण्यात यावी. या मेळाव्यासाठी विनायक रानडे यांनी भारतातून चार नवीन पेट्या वितरीत करण्यासाठी आणल्या होत्या. योगायोगाने त्यातील एक पेटी शिल्लक होती. डाॅ. कडवे यांनी तत्काळ ती पेटी मला देण्याचे मान्य केले. या कार्यक्रमात मला ती पेटी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. ग्रंथ पेटी मिळाल्याने मी फार भारावून गेलो. आजपर्यंत एक ग्रंथचा वाचक होतोच पण आता नवीन  जबाबदारी मिळाली, समन्वयक म्हणून.

या कार्यक्रमानिमित्त दोन महिन्यापूर्वी सर्व वाचकांसाठी 'ग्रंथ पेटीने मला काय दिले' आणि 'मला भावलेले पुस्तक' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा निकाल व बक्षीस समारंभ यावेळी ठेवण्यात आला. रणजीत देसाई यांच्या स्वामी या ऐतिहासिक कादंबरीवर मी 'मला भावलेले पुस्तक' हा विषय घेऊन निबंध लिहीला होता. त्याला बक्षीस मिळणे माझ्यासाठी अजून एक आश्चर्याचा धक्काच होता. बक्षीस म्हणून प्रवीण दवणे यांच्या स्वाक्षरीतील त्यांचेच 'रे जीवना' हा अमूल्य ठेवा मिळाला.

ग्रंथचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समन्वयक टीम मधून विशाखा पंडित, धनश्री पाटील, किशोर मुंढे, निखिल जोशी, श्रीकांत पैठणकर यांनी फार मेहनत घेतली. डॉ सुप्रिया सुधाळकर यांनी ६— १२ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट नाट्य वाचन करवून घेतले. आखाती देशात जन्मलेल्या/ वाढलेल्या मुलांचे मराठी वाचन ऐकून श्री प्रवीण दवणे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले. इतर समन्वयक नेमिका जोशी, अपर्णा पैठणकर, उमानंद आणि जयश्री बागडे, नीलम नांदेडकर, निलीमा वाडेकर, समीश्का जावळे, श्वेता करंदीकर, श्रिया जोशी आणि वीरभद्र कारेगावकर उपस्थित होते.

हा पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा यशस्वी झाला. गेल्या तीन महिन्यांपासून अविरत परिश्रमाचे चीज झाले. वाचक मेळाव्याची सांगता एका चिमुकलीने गायलेल्या पसारदानाने झाली. पसायदानाचे " येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥" हे शेवटचे शब्द कानावर पडले. कार्यक्रम संपला. माझ्यातला वाचक खरोखरच सुखिया होऊन ज्ञानाची शिदोरी घेऊन घरी परतत होता. मी ग्रंथ पेटी, निबंध स्पर्धेतील मिळालेले बक्षीस, आठवण भेट काॅफीमग घेऊन सभागृहाच्या बाहेर पडलो.

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

दुबईतील वाचन चळवळ भाग १

युएईत येऊन मला आता जवळपास सहा वर्ष झाली. पहिल्यांदा आल्यावर मला येथील हवामाना व्यतिरिक्त  भारतापेक्षा काही वेगळेपण जाणवले नाही. याचे महत्वाचे कारण दुबईत मोठ्या प्रमाणात असणारी मराठी माणसांची संख्या असू शकेल. दुबईला प्रती मुंबई म्हटले जाते ते बहुतेक यामुळेच. मराठी माणूस म्हणला तर आपली संस्कृती, साहित्य आणि कला जोपासणारा समुह. त्यामुळे दुबई कलागुण जोपासणाऱ्या अनेक संघटना होत्या. येथे आल्यावर मराठी माणसांनी सुरू केलेल्या विविध क्षेत्रातील संघटनांशी माझा परिचय होत गेला.

साधारणपणे दिडएक वर्षापूर्वी उमानंद बागडे नावाच्या एका सदगृहस्थशी माझी ओळख फेसबूकच्या माध्यमातून झाली. मैत्री होण्याचे कारण म्हणजे मी एकदा फेसबुकवरील कुठल्यातरी समुहावर "दुबईत कुणाकडे मराठी पुस्तकं वाचण्यासाठी मिळतील का?" असा संदेश पोस्ट केला होता. मला शालेय जीवनापासून वाचन, लेखन करण्याची आवड होती. मी भारतात सुट्टीवर गेल्यावर पुस्तकं खरेदी करून परत येतांना ती दुबईत घेऊन यायचो. प्रत्येक सुट्टीत मी वाचलेली पुस्तकं परत भारतात नेत असे व येतांना नवी पुस्तकं अनत असे. हा क्रम सुरूवातीला बरीच वर्ष चालू होता. यामुळे व्हायचे काय की, विमान प्रवासातील सामानाच्या बंधनामुळे मला जास्त पुस्तकं आणता येत नसत. आणि आणलेली पुस्तकं दोन तीन महीन्यातच वाचून संपायची. मग परत तिच तिच पुस्तकं कितीदा वाचायची? नंतर मी ऑनलाईन किंवा डिजिटल पुस्तकंही वाचायला लागलो. सतत मोबाईल व लॅपटॉपच्या स्क्रीनच्या प्रकाशाने डोळ्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे पारंपरिक छापील पुस्तकं वाचण्यासाठी योग्य वाटल्याने मला दुबईत एखाद्या मराठी लायब्ररीची गरज भासू लागली. अशातच बागडे यांच्या माध्यमातून ग्रंथ तुमच्या दारी चळवळीशी माझा जवळचा संबंध आला.

ग्रंथ तुमच्या दारी ही संकल्पना भारतात प्रथमतः राबवली ती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे श्री विनायक रानडे यांनी. आजकालच्या धावत्या युगात वेळेच्या कमतरतेमुळे बर्‍याच वाचकांना आवड असूनदेखील ग्रंथालयात जाण्यास जमत नाही. वाचकांची ही गरज ओळखून विनायक रानडे यांनी ग्रंथच आपल्या दाराशी आणून ठेवले. भारताबाहेर प्रथम ही संकल्पना दुबईतून सूरू झाली. प्रसिद्ध उद्योजक डाॅक्टर संदिप कडवे यांनी विनायक रानडे यांच्या मदतीने २०१४ ला या योजनेचा दुबईत शुभारंभ केला. प्रत्येकी २५ पुस्तकांच्या पेट्या वेगवेगळ्या विभागातल्या समन्वयकांना देण्यात आल्या. त्यामुळे दर्जेदार मराठी पुस्तकं वाचकांना मोफत उपलब्ध होऊ लागली. दर तीन महिन्यांनी समन्वयक आपापसात ग्रंथ पेटी बदलत असल्यामुळे वाचकांना सतत नवनवीन पुस्तकं वाचायला मिळू लागली. भारताबाहेर प्रथमच अशी मराठी वाचन चळवळ उभी राहिली याचा आम्हा सर्व वाचकांना अभिमान वाटतो. कालांतराने पेट्यांची संख्या वाढत जावून वाचकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील पुस्तकं दुबईत येऊ लागली.

डाॅक्टर संदिप कडवे यांच्याशी माझी ओळख देखील उमानंद बागडे यांच्यामुळेच झाली. ते आखाती देशातील मराठी वाचकांसाठी विश्व पांथस्थ नावाचे नवीन मासिक सुरू करणार असल्याचे मला उमानंद बागडे यांनी सांगितले होते आणि डाॅक्टर कडवे दुबईतील स्थायिक मराठी, कवी यांचा शोध घेत होते. तत्पूर्वी मी बरेचदा फेसबुकवर वेगवेगळे लेख लिहीत होतोच. माझे लेख आवडल्याने उमानंद बागडे यांनी डॉक्टर कडवे यांना माझे नाव सुचवले. विश्व पांथस्थच्या लिखाणासाठी मी डॉक्टर कडवे यांना अनेकदा भेटलो. त्याच्याकडून मला ग्रंथ तुमच्या दारी ची अजून माहिती होत गेली. वेगवेगळ्या ग्रंथच्या समन्वयकांचाही परिचय होत गेला.

ग्रंथ तुमच्या दारीचे सर्व समन्वयक आणि वाचक हे एक भले मोठे कुटुंब बनले. या सर्वांचा व्हाट्सअप ग्रुप बनवला गेला. विविध वाचक व समन्वयक यांच्यात साहित्याशी संबंधित वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. मला चर्चा करण्यासाठी एक हक्काचे आणि आवडीचे व्यासपीठ उपलब्ध झाले. तुमच्या पेटीत अमूक अमूक पुस्तकं आहे का? किंवा दुबईतील सर्व ग्रंथ पेट्यात अमूक एखादे पुस्तक आहे का? असले प्रश्न वाचक विचारू लागले. त्यांनी व्हाट्सअप वर विचारलेल्या प्रश्नची तात्काळ उत्तर मिळू लागली. विनायकजी भारतातून संदेश पाठवत की हवे असणारे अमूक एक पुस्तक पेटी क्रमांक अमूक अमूक मध्ये उपलब्ध आहे. वाचकांच्या शंकांचे निरसन तर व्हायचेच शिवाय त्यांना हवे असलेले विशिष्ट पुस्तक मिळायचे. आपले आवडते पुस्तक दुबईत वाचण्यास उपलब्ध आहे हाच मुळी अद्भुत आणि आनंदित करणारा अनुभव असायचा.

ग्रंथमुळे माझे आयुष्य पार बदलून गेले. अनेक नवे मित्र मिळाले, अनेक जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले त्याच बरोबर पुस्तकरूपी जीवलग सवंगडी मिळाले.
*****