शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

कविता : सरज्या राज्याची गाडी



सरज्या राज्याची गाडी 

गाडी चालली चालली खालच्या मळ्यात
वाजते घुंगरु सरज्या राज्याच्या गळ्यात 

डौलाने ओढती गाडी ही खिल्लार जोड
साऱ्या गावात नाही माझ्या बैलास तोड 

वाट वाकडी तिकडी तरी चालती चाकं
माझ्या बैलास नाही कधी चाबकाचा धाकं 

नानाभाऊ गाडीवान भरे वगंण आखात
कशी धावती गाडी तिचे जीवन चाकात 

वाजे वाजे घुंगरु समदं शिवार डोलतं
कामावरल्या बायांना ते वखूत सांगतं 

निघाली हो गाडी हिरव्या चाऱ्याने भरली
गोठ्यातली गाय साटं बघून हंबरली 

लाभली ही जोड साता जन्माची पुण्याई
सरज्या राज्याने बघा पिकवली काळी आई 

कुठे पांग फेडू सांगा कोणत्या देवळा?
पुढच्या जन्मी गळ्यात बांधीन मी शिवळा

~ गणेश

रविवार, ३१ जुलै, २०२२

महाराष्ट्र द्वेष्टे राज्यपाल : भगतसिंह कोश्यारी


राज्यपाल हे भारतीय राज्यघटनेप्रमाणे अतिशय महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. परंतू अलिकडच्या काळात राज्यपालांचा वापर राजकीय हत्यार म्हणून करण्याचा पायंडा संघराज्य सरकारने पाडला आहे. विशेषकरून विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये राज्यपाल नेहमीच पक्षपाती कारभार आणि निर्णय घेताना दिसतात. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या पक्षपातीपणाचे शिरोमणीच ठरावेत असे वागताना दिसत आहेत. महाराष्ट्राला इतिहासात अतिशय बुद्धिमान आणि प्रतिभावंत राज्यपालांची परंपरा लाभलेली आहे. भगतसिंह कोश्यारी हे त्याला अपवाद आहेत, हे खेदाने म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यभार स्विकारल्या पासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षात काम केलेले नेते आहेत. विशेष म्हणजे कोश्यारी हे प्राध्यापक, संपादक आणि अनेक महत्वाच्या राजकीय पदांवर काम केलेले आणि अनुभवी व्यक्ती आहेत. २००१ साली उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. ते उत्तराखंड मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून देखील निवडून गेले होते. एवढे अनुभवी व्यक्ती असूनही कोश्यारी यांनी अनेकदा महाराष्ट्राबाबत आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून आणि बोलण्यातून महाराष्ट्राचा अपमानच केलेला दिसतो. राज्यपाल कोश्यारी किती महाराष्ट्र द्वेष्टे आहेत हे अनेकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून सिद्ध केले आहे. कोश्यारी हे आपल्या दिल्लीश्वरांच्या खुश करण्यासाठी असे बोलत आहेत की, मुळात त्यांची बुद्धीच इतकी संकुचित आहे? हा मात्र संशोधनाचा विषय ठरू शकतो.

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा अनादर केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अतिशय बालिश आणि अपमानास्पद विधान केले होते. खरं तर राज्यापाल पदावरील व्यक्तीला असले फालतू विधान शोभणारे नव्हते. त्यानंतर संभाजीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. "समर्थ रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी विचारले नसते" अशा प्रकारचे ते विधान होते. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नव्हते हा महाराष्ट्रात अत्यंत वादाचा मुद्दा आहे. ब्राह्मण जातीतील अनेक व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू म्हणून चिकटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक तथाकथित इतिहासकारांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने स्वतःच्या हिमतीवर आणि आठरापगड जातीतील आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर स्वराज्याची निर्मिती केली हा इतिहास राज्यपाल कोश्यारी यांना माहित नसावा. स्वराज्य निर्माण करण्यात समर्थ रामदास यांचे काय योगदान होते? असा प्रश्न आता महाराष्ट्रा पडू लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असताना राज्यपालांनी किमान महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आगोदर समजून घ्यायला हवा होता.

२९ जुलै २०२२ रोजी भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत आणि मराठी माणसांबाबत अजून एक वादग्रस्त वक्तव्य केले. "मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी आणि राजस्थानी निघून गेल्यास या शहरात अजिबात पैसा उरणार नाही. मग या शहराला आर्थिक राजधानी कोण म्हणेल?" असे म्हणून त्यांनी एक प्रकारे मराठी माणूस भिकारी आहे असे अप्रत्यक्षपणे म्हणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मुंबई उभी राहिली ती कष्टकरी मराठी माणसांच्या घामावर. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नाना शंकरशेठ, डाॅ. भाऊ दाजी लाड, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या सारख्या विभूतींचे मुंबईसाठी दिलेले योगदान माहिती तरी असेल का? मुंबईतील गुजराथी आणि राजस्थानी लोक खूप पैसेवाले आहेत हे नाकारता येणार नाही. आजच्या घडीला मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे ही देखील वस्तुस्थिती असली तरी गुजराथी आणि मारवाड्यांनी कुठल्या मार्गाने पैसा कमावला हे राज्यपालांनी सांगायला हवे होते. सरकारी बँकांना गंडा घालून लाखो कोटी घेऊन पळालेले लोक कोण होते? आणि ते कुणाच्या आशिर्वादाने देशाबाहेर पळाले हे देखील कोश्यारी यांनी सांगायला हवे होते. 

शिवसेना पक्ष फोडल्यानंतर मुंबईतील मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न कोश्यारी करत होते, हे यावरून स्पष्ट होत आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सध्या दिल्लीत बसलेल्या गुजराथी शेठ लोकांच्या डोक्यात शिजत आहे, हे काही लपून राहिलेले नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती रक्त सांडून. मुंबईवर सर्वप्रथम  हक्क आहे तो इथल्या मराठी आग्री, कोळी बांधवांचा. जर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा जर कुणाचा डाव असेल तर महाराष्ट्रात मराठी माणसांचा ज्वालामुखी उसळल्याशिवाय राहाणार नाही. याचे परिणाम भारतीय संघराज्य खिळखिळे होण्यास कारणीभूत ठरतील हे दिल्लीश्वरांनी ध्यानात ठेवावे. राज्यपालांना यावेळी सांगावेसे वाटते की, गुजराथी आणि मारवाडी लोकांनी खुशाल आपापल्या राज्यात जावे आणि तिथली राज्य श्रीमंत करावीत. महाराष्ट्रातील मराठी माणूस हा भिकारी नाही. मुळात गुजराथी आणि राजस्थानी हे पैसेवाले होते तर त्यांना महाराष्ट्रात येण्याची काय गरज होती? ते मुंबईत कशासाठी आले? या प्रश्नाचे उत्तर कोश्यारी यांनी द्यावे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कामकाज हे घटनेला धरून नाही हे अनेकदा महाराष्ट्राने अनुभवले आहे. कोरोना काळात राजभवनातून समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न असो, किंवा राज्यपाल नियुक्त १२ विधानसभा सदस्य निवडी संदर्भात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावांना केराची टोपली दाखवणे असो. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अनेकदा सांगूनही ती त्यांनी जाणीवपूर्वक घेतली नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी त्यांची भुमिका देखील राज्यघटनेच्या विरुद्धच होती उघड झाले आहे.

एकूणच महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करणासाठीच गुजरात धार्जिण्या संघराज्य सरकारने भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती केलेली दिसते. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या या राज्यपालाची तत्काळ उचलबांगडी करून या माणसाची 'थेरं' बंद करावीत, अन्यथा मराठी माणूस या म्हाताऱ्याला हिसका दाखवल्या शिवाय राहाणार नाहीत.

(३१ जुलै २०२२)



शुक्रवार, २२ जुलै, २०२२

प्रेरणादायी "डाॅक्टर ते आयर्न मॅन"



जर मानवी शरीराच्या सहनशक्तीची परिक्षा घ्यायची ठरल्यास ती फक्त 'आयर्न मॅन' या सारख्या खडतर स्पर्धेतूनच घेता येऊ शकते. चपराक प्रकाशन कडून प्रकाशित केलेले 'डाॅक्टर ते आयर्न मॅन' हे प्रेरणादायी पुस्तक आज वाचून पुर्ण केले. हे पुस्तक वाचल्यानंतर तर माझा वरील विधानावर ठाम विश्वास बसला आहे. 

वडनेर भैरव या नाशिक जिल्ह्यातील एका खेडेगावात जन्मलेल्या आणि पेशाने बालरोगतज्ज्ञ असलेल्या डाॅ. अरुण गचाले यांच्या डबल आयर्न मॅन होण्याचा चित्तथरारक प्रवास लेखिका सुरेखा बोऱ्हाडे यांनी अगदी सहज सोप्या भाषे या पुस्तकातून शब्दबद्ध केला आहे. 

आयर्न मॅन म्हणजे ४ कि.मी. स्विमिंग, १८० कि.मी. सायकलिंग आणि ४२.२ कि.मी. रनिंग असे तीन क्रिडा प्रकार हे सलग न थकता पुर्ण करायचे असतात. आणि हे सगळे क्रिडा प्रकार दिलेल्या १७ तासांच्या वेळत पुर्ण करायचे असतात. 

हि स्पर्धा पुर्ण करण्यासाठी करावे लागणारे खडतर प्रशिक्षण आणि आव्हाने यावर डाॅ. अरुण गचाले यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेले आहे. 

आयर्न मॅन, सायकलिंग, Triathlon, मॅरेथॉन यासारख्या स्पर्धा पुर्ण करु इच्छिणाऱ्यांना हे पुस्तक नक्कीच मोलाचे मार्गदर्शक ठरेल. 

पुस्तकाचे नाव : डाॅक्टर ते आयर्न मॅन
लेखिका : सुरेखा बोऱ्हाडे
प्रकाशन : चपराक प्रकाशन, पुणे
प्रकाशक : घनश्याम पाटील
किमंत : २४०₹

रविवार, २९ मे, २०२२

यूएई चे नवे राष्ट्रपती MBZ (मोहम्मद बिन झायेद)

 



यूएई चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अलनह्यान यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अलनह्यान यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. मोहम्मद बिन झायेद यांचा परिचय करण्यापूर्वी यूएईच्या राज्य पद्धतीची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे. यूएई हा एक संवैधानिक राजेशाही देश असून यात एकूण सात राजशाह्यांचा (अमिरात) अंतर्भाव होतो.  १९७१ साली अबू धाबीचे राजे शेख झायेद बिन सुलतान अलनह्यान यांच्या नेतृत्वाखाली अबू धाबी, दुबई, शारजा, अजमान, रास अलखैमा, उम अलकुवैन आणि फुजैरा या सात स्वतंत्र राज्यांचे राजे (म्हणजेच शेख ) एकत्र येऊन त्यांनी संयुक्त अरब अमिरात या संघराज्यची स्थापन केली.

यूएईच्या स्थापने पासून अबू धाबीच्या राज गादीवर असणारे शेख हे देशाचे राष्ट्रपती तर दुबईच्या राज गादीवर असणारे शेख हे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान असतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची अधिकृत निवड ही सर्वोच्च सांघिक समिती (Federal Supreme Council) करते. या समितीचे सदस्य हे यूएईच्या सात राज्यांचे शेख असतात. यूएईच्या उपराष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती हीच या देशाचे पंतप्रधान देखील असते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अधिकृत कार्यकाळ जरी पाच वर्षांचा असला तरी या पदांवरील व्यक्तींना तयहयात या पदांवर कायम ठेवण्याची इथली परंपरा आहे. शेख झायेद हे यूएईचे पहिले राष्ट्रपती होते. २००४ साली शेख झायेद यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले पुत्र शेख खलिफा यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली होती. नवनिर्वाचित राष्ट्रपती शेख मोहम्मद हे यूएईचे तिसरे राष्ट्रपती आहेत.

यूएईचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे राजे ६१ वर्षीय शेख मोहम्मद बिन झायेद यांचा जन्म ११ मार्च १९६१ रोजी अलऐन शहरात झाला. शेख मोहम्मद यांचे पूर्ण नाव 'शेख मोहम्मद बिन झायेद बिन सुलतान बिन झायेद बिन खलिफा बिन शाखबौत बिन तय्यब बिन इसा बिन नह्यान बिन फलाह बिन यास' असे आहे. शेख मोहम्मद हे शेख झायेद यांचे तृतीय चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे वडलांच्या देखरेखी खाली अलऐन आणि अबू धाबी शहरात झाले. त्यांना १९७९ साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. इंग्लंच्या नामांकित सॅण्डहर्स्ट रॉयल मिलिटरी अकॅडेमी येथून त्यांनी सैन्य शिक्षणात पदवी संपादन केली. यूएई मध्ये परत आल्यानंतर त्यांनी देशाच्या सैन्य दलात अनेक वर्ष सेवा केली. ते हवाई दलाचे उत्तम वैमानिक देखील आहेत. १९९१ साली झालेल्या पहिल्या आखाती युद्धात त्यांनी कुवैतच्या बाजूने सहभाग घेतला होता. यूएई सैन्य दलाचे आधुनिकीकरण करण्याचे सगळे श्रेय हे शेख मोहम्मद यांनाच दिले जाते.

शेख मोहम्मद बिन झायेद यांची २००४ साली अबू धाबीच्या युवराज पदावर (Crown Prince) नियुक्ती झाली. २००५ साली त्यांना यूएई सैन्य दलाचे डेप्युटी सुप्रीम कमांडर करण्यात आले. शेख खलिफा यांच्या आजारपणात शेख मोहम्मद यांनी देशाची धुरा अगदी समर्थपणे सांभाळली. यूएईच्या जनमानसात शेख मोहम्मद बिन झायेद हे खूप लोकप्रिय नेते असून सामान्य जनतेत त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. अरब जगतातही शेख मोहम्मद बिन झायेद एक शक्तिशाली नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या देशाची रुढिवादी ओळख मिटवून त्यांनी उदारमतवादी आणि सहिष्णू धोरण अवलंबवले. अनेक दाशकांपासून असलेले इस्त्राईल बरोबरचे शत्रुत्व त्यांना पुढाकार घेऊन मिटवले. यूएई-इस्त्राईल या देशांनी मैत्रीचा हात धरत पहिल्यांदाच राजनैतिक संबंध स्थापित केले. इस्त्राईल आणि यूएई यांच्यात झालेल्या शांतात कराराचे खरे शिल्पकार हे शेख मोहम्मद बिन झायेद होते. धार्मिक सहिष्णुतेचे नवे धोरण त्यांनी राबवले. याचाच भाग म्हणून त्यांनी २०१९ साली पोप फ्रान्सिस यांना यूएईच्या भेटीसाठी आमंत्रित केले. पोप पहिल्यांदाच अरब खंडात येत होते, त्यामुळे त्यांचा हा दौरा खूप ऐतिहासिक ठरला. शेख मोहम्मद बिन झायेद यांनी अबू धाबी येथे हिंदू मंदिर बांधण्यास परवाणगी देखील दिली. बीएपीएस स्वामीनारायण या संस्थेच्या माध्यमातून या मंदिराची निर्मिती करण्यात येत असून लवकरच याचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

सगळ्याच आघाड्यावर देशाला पुढे घुवून जाण्यासाठी शेख मोहम्मद बिन झायेद हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आज यूएई हा देश आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, पर्यटन या सारख्या क्षेत्रात जगात आघाडीवर जात आहे. शेख मोहम्मद बिन झायेद हे देशाला याच्याही पुढे घेऊन जाण्यास समर्थ आहेत.