फुजैरा किल्ला हा युएई मधील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या किल्ल्यापैकी एक मानला जातो. हा किल्ला कोणी व कधी बांधला याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नाही. पोर्तुगीज कालखंडात सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस हा किल्ला बांधला गेला असावा. हा किल्ला जुन्या फुजैरा शहराच्या मध्यवर्ती भागात अंदाजे २० मीटर उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे ६५०० चौरस फूट आहे. किल्ल्याची निर्मितीसाठी दगड-माती या स्थानिक साधनांचा वापर केलेला आढळतो. धाब्याच्या छताला आधार देण्यासाठी खजूर आणि खारफुटीच्या लाकडांचा वापर केलेला आढळतो. किल्ल्याच्या बांधकामानंतर आजूबाजूच्या परिसरात लोकवस्ती निर्माण होऊन जुने फुजैरा शहर वसले असावे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या फुजैरा शहराचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण शहरा भोवती संरक्षक भिंत बांधलेली होती. हा किल्ला समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे एक ते दिड किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सामरीक दृष्ट्या खूप महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेला होता. किल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसरावर तसेच फुजैरा बंदर आणि समुद्र किनाऱ्यावर सहज नजर ठेवता येत असे. फुजैरा किल्ल्यावर एकूण चार बुरुंज (Watch Tower) असून, त्यापैकी तीन गोलाकार तर एक चौकोनी आहे. हे सगळे बुरुंग तटबंदीने एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. चौकोनी बुरुंजास मुबारा असे म्हणतात.
पोर्तुगीज हे इराणच्या आखातात राज्यविस्तार आणि व्यापारासाठी येणारी पहिली युरोपियन महासत्ता होती. वास्को द गामाने १४९८ साली आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतात येण्याचा मार्ग शोधून काढला. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज सत्तेचा आरबी समुद्रात वावर वाढला. अरबी समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी १५०७ साली पोर्तुगीज आरमाराचा नौदलप्रमुख असलेल्या अफोन्सो दे अल्बुकर्क याने होर्मुझ बेट आपल्या ताब्यात घेतले. होर्मुझ बेट इराणच्या आखाताला आणि ओमानच्या आखाताला जोडणाऱ्या एका अरुंद सामुद्रधुनी जवळ स्थित आहे. यालाच होर्मुझची सामुद्रधुनी असेही म्हणतात. होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हे महत्वाचे आणि मोक्याचे ठिकाण पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी अरबी लोकांच्या अधिपत्याखालील असणारी अनेक महत्वाची ठिकाणे काबीज केली. त्यात मस्कत, सोहार, खोरफंक्कन, अल बिदीया, डिब्बा, खासाब, कतिफ आणि बहरीन यांचा समावेश होता. अल बिदीया आणि खोरफंक्कन या शहरांच्या नजीकच दक्षिणेला फुजैरा किल्ला स्थित आहे.
फुजैरा किल्ला हा स्थानिक शेख यांचे अधिकृत निवासस्थान आणि सत्तेचे मुख्य केंद्र होते. या किल्ल्यातील मोकळ्या अंगणाचा उपयोग विविध सण, उत्सव साजरे करण्यासाठी केला जात असे. वेळ प्रसंगी येथे कैद्यांना जाहीर मृत्युदंड देखील दिला जात असे. किल्ल्यात कैद्यांना ठेवण्यासाठी एक छोटे कारागृह देखील होते.
ऐतिहासिक नोंदीनुसार या किल्ल्यावर अनेक आक्रमणे झालेली दिसतात. सन १८०८ साली वहाबी योद्ध्यांनी या किल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. १८०८ ते १८१० असे जवळपास दोन वर्ष हा किल्ला वहाबी लोकांच्या ताब्यात होता. सन १८१० साली स्थानिक जमातीच्या फौजांनी यावर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर पुढे १९२५ साली गुलामगिरी विरोधात गस्तीवर असतांना राॅयल इंडियन नेव्हीच्या 'एच एम आय एस लाॅरेन्स' (HMIS Lawrence) या युद्ध नौकेने केलेल्या भडीमारात या किल्ल्याचे तीन बुरुंज हे उद्ध्वस्त झाले होते. यावेळी झालेल्या चकमकीत ब्रिटिशांनी तत्कालीन शेख यांच्याकडून १५०० रुपये खंडणी देखील वसूल केला होती. इंग्रजांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेला फुजैरा किल्ला पुढे अनेक वर्ष नादुरुस्त आणि पडक्या स्थिततीतच होता. युएईची स्थापना झाल्यानंतर मात्र या किल्ल्यावरील वावर कमी होऊन त्याची बरीचशी पडझड झाली. फुजैरा राज्याच्या पुरातन वारसा विभागामार्फत इ. स. १९९८ ते २००० दरम्यान या किल्ल्याचा जीर्णोद्धार करून त्याला पुर्वीचे ऐतिहासिक रुप देण्यात आले. हा किल्ला आता फुजैरा शहरातील महत्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे.