गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
कविता : सरज्या राज्याची गाडी
रविवार, ३१ जुलै, २०२२
महाराष्ट्र द्वेष्टे राज्यपाल : भगतसिंह कोश्यारी
भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा अनादर केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अतिशय बालिश आणि अपमानास्पद विधान केले होते. खरं तर राज्यापाल पदावरील व्यक्तीला असले फालतू विधान शोभणारे नव्हते. त्यानंतर संभाजीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. "समर्थ रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी विचारले नसते" अशा प्रकारचे ते विधान होते. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नव्हते हा महाराष्ट्रात अत्यंत वादाचा मुद्दा आहे. ब्राह्मण जातीतील अनेक व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू म्हणून चिकटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक तथाकथित इतिहासकारांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने स्वतःच्या हिमतीवर आणि आठरापगड जातीतील आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर स्वराज्याची निर्मिती केली हा इतिहास राज्यपाल कोश्यारी यांना माहित नसावा. स्वराज्य निर्माण करण्यात समर्थ रामदास यांचे काय योगदान होते? असा प्रश्न आता महाराष्ट्रा पडू लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असताना राज्यपालांनी किमान महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आगोदर समजून घ्यायला हवा होता.
२९ जुलै २०२२ रोजी भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत आणि मराठी माणसांबाबत अजून एक वादग्रस्त वक्तव्य केले. "मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी आणि राजस्थानी निघून गेल्यास या शहरात अजिबात पैसा उरणार नाही. मग या शहराला आर्थिक राजधानी कोण म्हणेल?" असे म्हणून त्यांनी एक प्रकारे मराठी माणूस भिकारी आहे असे अप्रत्यक्षपणे म्हणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मुंबई उभी राहिली ती कष्टकरी मराठी माणसांच्या घामावर. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नाना शंकरशेठ, डाॅ. भाऊ दाजी लाड, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या सारख्या विभूतींचे मुंबईसाठी दिलेले योगदान माहिती तरी असेल का? मुंबईतील गुजराथी आणि राजस्थानी लोक खूप पैसेवाले आहेत हे नाकारता येणार नाही. आजच्या घडीला मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे ही देखील वस्तुस्थिती असली तरी गुजराथी आणि मारवाड्यांनी कुठल्या मार्गाने पैसा कमावला हे राज्यपालांनी सांगायला हवे होते. सरकारी बँकांना गंडा घालून लाखो कोटी घेऊन पळालेले लोक कोण होते? आणि ते कुणाच्या आशिर्वादाने देशाबाहेर पळाले हे देखील कोश्यारी यांनी सांगायला हवे होते.
शिवसेना पक्ष फोडल्यानंतर मुंबईतील मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न कोश्यारी करत होते, हे यावरून स्पष्ट होत आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सध्या दिल्लीत बसलेल्या गुजराथी शेठ लोकांच्या डोक्यात शिजत आहे, हे काही लपून राहिलेले नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती रक्त सांडून. मुंबईवर सर्वप्रथम हक्क आहे तो इथल्या मराठी आग्री, कोळी बांधवांचा. जर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा जर कुणाचा डाव असेल तर महाराष्ट्रात मराठी माणसांचा ज्वालामुखी उसळल्याशिवाय राहाणार नाही. याचे परिणाम भारतीय संघराज्य खिळखिळे होण्यास कारणीभूत ठरतील हे दिल्लीश्वरांनी ध्यानात ठेवावे. राज्यपालांना यावेळी सांगावेसे वाटते की, गुजराथी आणि मारवाडी लोकांनी खुशाल आपापल्या राज्यात जावे आणि तिथली राज्य श्रीमंत करावीत. महाराष्ट्रातील मराठी माणूस हा भिकारी नाही. मुळात गुजराथी आणि राजस्थानी हे पैसेवाले होते तर त्यांना महाराष्ट्रात येण्याची काय गरज होती? ते मुंबईत कशासाठी आले? या प्रश्नाचे उत्तर कोश्यारी यांनी द्यावे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कामकाज हे घटनेला धरून नाही हे अनेकदा महाराष्ट्राने अनुभवले आहे. कोरोना काळात राजभवनातून समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न असो, किंवा राज्यपाल नियुक्त १२ विधानसभा सदस्य निवडी संदर्भात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावांना केराची टोपली दाखवणे असो. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी अनेकदा सांगूनही ती त्यांनी जाणीवपूर्वक घेतली नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी त्यांची भुमिका देखील राज्यघटनेच्या विरुद्धच होती उघड झाले आहे.
एकूणच महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करणासाठीच गुजरात धार्जिण्या संघराज्य सरकारने भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती केलेली दिसते. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या या राज्यपालाची तत्काळ उचलबांगडी करून या माणसाची 'थेरं' बंद करावीत, अन्यथा मराठी माणूस या म्हाताऱ्याला हिसका दाखवल्या शिवाय राहाणार नाहीत.
शुक्रवार, २२ जुलै, २०२२
प्रेरणादायी "डाॅक्टर ते आयर्न मॅन"
रविवार, २९ मे, २०२२
यूएई चे नवे राष्ट्रपती MBZ (मोहम्मद बिन झायेद)
यूएई
चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन
झायेद अलनह्यान यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू शेख मोहम्मद
बिन झायेद अलनह्यान यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
मोहम्मद बिन झायेद यांचा
परिचय करण्यापूर्वी यूएईच्या राज्य पद्धतीची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे. यूएई हा
एक संवैधानिक राजेशाही देश असून यात
एकूण सात राजशाह्यांचा (अमिरात)
अंतर्भाव होतो. १९७१
साली अबू धाबीचे राजे
शेख झायेद बिन सुलतान अलनह्यान
यांच्या नेतृत्वाखाली अबू धाबी, दुबई,
शारजा, अजमान, रास अलखैमा, उम
अलकुवैन आणि फुजैरा या
सात स्वतंत्र राज्यांचे राजे (म्हणजेच शेख ) एकत्र येऊन त्यांनी संयुक्त अरब अमिरात या
संघराज्यची स्थापन केली.
यूएईच्या स्थापने
पासून अबू धाबीच्या राज गादीवर असणारे शेख हे देशाचे राष्ट्रपती तर दुबईच्या राज गादीवर
असणारे शेख हे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान असतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची
अधिकृत निवड ही सर्वोच्च सांघिक समिती (Federal Supreme Council) करते. या समितीचे
सदस्य हे यूएईच्या सात राज्यांचे शेख असतात. यूएईच्या उपराष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती
हीच या देशाचे पंतप्रधान देखील असते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अधिकृत कार्यकाळ
जरी पाच वर्षांचा असला तरी या पदांवरील व्यक्तींना तयहयात या पदांवर कायम ठेवण्याची
इथली परंपरा आहे. शेख झायेद हे यूएईचे पहिले राष्ट्रपती होते. २००४ साली शेख झायेद
यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले पुत्र शेख खलिफा यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली
होती. नवनिर्वाचित राष्ट्रपती शेख मोहम्मद हे यूएईचे तिसरे राष्ट्रपती आहेत.
यूएईचे राष्ट्रपती
आणि अबू धाबीचे राजे ६१ वर्षीय शेख मोहम्मद बिन झायेद यांचा जन्म ११ मार्च १९६१ रोजी
अलऐन शहरात झाला. शेख मोहम्मद यांचे पूर्ण नाव 'शेख मोहम्मद बिन झायेद बिन सुलतान
बिन झायेद बिन खलिफा बिन शाखबौत बिन तय्यब बिन इसा बिन नह्यान बिन फलाह बिन यास'
असे आहे. शेख मोहम्मद हे शेख झायेद यांचे तृतीय चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक आणि
माध्यमिक शिक्षण हे वडलांच्या देखरेखी खाली अलऐन आणि अबू धाबी शहरात झाले. त्यांना
१९७९ साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. इंग्लंच्या नामांकित सॅण्डहर्स्ट
रॉयल मिलिटरी अकॅडेमी येथून त्यांनी सैन्य शिक्षणात पदवी संपादन केली. यूएई मध्ये परत
आल्यानंतर त्यांनी देशाच्या सैन्य दलात अनेक वर्ष सेवा केली. ते हवाई दलाचे उत्तम वैमानिक
देखील आहेत. १९९१ साली झालेल्या पहिल्या आखाती युद्धात त्यांनी कुवैतच्या बाजूने सहभाग
घेतला होता. यूएई सैन्य दलाचे आधुनिकीकरण करण्याचे सगळे श्रेय हे शेख मोहम्मद यांनाच
दिले जाते.
शेख मोहम्मद
बिन झायेद यांची २००४ साली अबू धाबीच्या युवराज पदावर (Crown Prince) नियुक्ती झाली.
२००५ साली त्यांना यूएई सैन्य दलाचे डेप्युटी सुप्रीम कमांडर करण्यात आले. शेख खलिफा
यांच्या आजारपणात शेख मोहम्मद यांनी देशाची धुरा अगदी समर्थपणे सांभाळली. यूएईच्या
जनमानसात शेख मोहम्मद बिन झायेद हे खूप लोकप्रिय नेते असून सामान्य जनतेत त्यांच्याविषयी
प्रचंड आदर आहे. अरब जगतातही शेख मोहम्मद बिन झायेद एक शक्तिशाली नेते म्हणून ओळखले
जातात. आपल्या देशाची रुढिवादी ओळख मिटवून त्यांनी उदारमतवादी आणि सहिष्णू धोरण अवलंबवले.
अनेक दाशकांपासून असलेले इस्त्राईल बरोबरचे शत्रुत्व त्यांना पुढाकार घेऊन मिटवले.
यूएई-इस्त्राईल या देशांनी मैत्रीचा हात धरत पहिल्यांदाच राजनैतिक संबंध स्थापित केले.
इस्त्राईल आणि यूएई यांच्यात झालेल्या शांतात कराराचे खरे शिल्पकार हे शेख मोहम्मद
बिन झायेद होते. धार्मिक सहिष्णुतेचे नवे धोरण त्यांनी राबवले. याचाच भाग म्हणून त्यांनी
२०१९ साली पोप फ्रान्सिस यांना यूएईच्या भेटीसाठी आमंत्रित केले. पोप पहिल्यांदाच अरब
खंडात येत होते, त्यामुळे त्यांचा हा दौरा खूप ऐतिहासिक ठरला. शेख मोहम्मद बिन झायेद
यांनी अबू धाबी येथे हिंदू मंदिर बांधण्यास परवाणगी देखील दिली. बीएपीएस स्वामीनारायण
या संस्थेच्या माध्यमातून या मंदिराची निर्मिती करण्यात येत असून लवकरच याचे बांधकाम
पूर्ण होणार आहे.
सगळ्याच आघाड्यावर
देशाला पुढे घुवून जाण्यासाठी शेख मोहम्मद बिन झायेद हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी घेतलेल्या
धोरणात्मक निर्णयामुळे आज यूएई हा देश आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, पर्यटन
या सारख्या क्षेत्रात जगात आघाडीवर जात आहे. शेख मोहम्मद बिन झायेद हे देशाला याच्याही
पुढे घेऊन जाण्यास समर्थ आहेत.
सोमवार, १७ जानेवारी, २०२२
दुबई आणि सायकल
सायकलविषयी माझ्या मनात नेहमीच कुतूहल राहिले आहे. सायकल शिकण्यासाठी मी लहानपणी खूप धडपड केली होती. घरी सायकल नसल्यामुळे सायकल मार्ट मधून भाड्याने सायकल आणावी लागे. सुरुवातीला ती नुसती हातात घेऊन पळवत असे. नंतर मात्र ती चालवायला शिकलो. पूर्वी सायकल चालवणे ही गरज होती. आजकाल सायकल गरजेपेक्षा हौस म्हणून जास्त वापरली जात असावी. आज माझी ती गरज नाही पण हौस म्हणून सायकल चालवायला खूप आवडते. मी जिथे जाईल तिथे सायकल चालवायच्या संधीची वाट बघत असतो. गेल्या काही वर्षांपासून मी दुबईत वास्तव्याला आहे. इथल्या रस्त्यावरल्या आधुनिक सायकली पाहून माझ्या मनात अजूनच कुतूहल निर्माण झाले. दुबई म्हणजे पंचतारांकित शहर! इथे येण्यापूर्वी इतरांप्रमाणे मलाही या शहराची ओळख म्हणजे फक्त उंच इमारती, सोन्या-चांदीच्या पेठा, आलिशान गाड्या, चकचकीत रस्ते किंवा लक्झरी लाईफ अशी मर्यादितच होती. काही दिवसांनी याही पलीकडे मला दुबई शहराची नवी ओळख होत गेली. जगात जे काही अशक्य आहे ते येथे शक्य झालेले पहायला मिळते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये तर या शहराच्या नावे अनेक विक्रम नोंदवलेले आहेत. अद्भुत किंवा अशक्य ते शक्य हीच दुबईची खरी ओळख आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर इथल्या वाहतूक व्यवस्थेचे घेता येईल. दुबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम वाहतूक व्यवस्थेत गणली जाते. मेट्रो, ट्राम, बस आणि टॅक्सी यासह अत्याधुनिक बोटी या प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था येथे कार्यरत आहे. याच बरोबर इथले लोक सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात याचे मला नवल वाटते.
वर्षातले काही महिने सोडल्यास जवळपास संपूर्ण वर्षभर इथले हवामान खूप उष्ण असते. चक्क आठ महिने उन्हाळा तर उरलेले चार महिने हिवाळा असे दोनच ऋतू येथे अनुभवायला मिळतात. उन्हाळ्यात वाळवंटामुळे येथे दिवसाचे तापमान हे ५० अंशाच्या पुढे जाते. येथे आर्द्रता देखील खूप असते. घराबाहेर नुसते उभे राहिले तरी संपूर्ण अंग भिजून जाते. असल्या उष्णतेमुळे दुबई शहर सायकल चालवण्यासाठी अनुकूल नसावे अशी माझी अगोदर भावना होती. परंतू दुबईसह संपूर्ण यूएई मध्ये सायकल खूप लोकप्रिय आहे. अनेकांना आश्चर्य वाटावे एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे सायकल चालवण्यास उत्तेजन आणि सुविधा पुरवल्या जातात. दुबईचे सरकार हे 'सायकल चालवा' एवढी घोषणा करून थांबले नाही, तर त्यांनी सायकल सुरक्षितपणे चालवण्यासाठी लागण्यारे सर्व नियम आणि पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अलमक्तूम हे स्वतः एक सायकल प्रेमी आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन दुबईत सायकलिंगसाठी अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. दुबईला सायकलिंगची वर्ल्ड कॅपिटल करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
हौशी सायकलप्रेमींसाठी इथल्या सरकारने खास सायकलिंग ट्रॅक बनवले आहेत. जगात जर कुठे सगळ्यात सुंदर सायकलिंग ट्रॅक असतील तर ते दुबई आहेत, असे मी म्हणेन. दुबईतील सायकलिंग ट्रॅक हे समुद्रकिनारे, वाळवंट, बगीचे आणि सुंदर रस्त्यांच्या बाजूने जातात. या ठिकाणच्या ट्रॅकवरून सायकलिंग करणे म्हणजे एक सुखद अनुभव असतो. तसं वर्षभर दुबईत सायकलिंगचा अस्वाद घेता येतो. कडक उन्हाळ्यातही अनेक सायकलप्रेमी दुबईच्या सायकलिंग ट्रॅकवरून फिरताना दिसतात. खासकरून हिवाळ्यात जेंव्हा इथले वातावरण आल्हादायक असते तेंव्हा अनेक जण आपली सायकल बाहेर काढून शहरभर सायकलिंगचा आनंद लुटतांना दिसतात. सायकलिंग ट्रॅकजवळ सायकल, हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट हे भाड्याने मिळते. त्यामुळे आपल्याकडे स्वतःची सायकल जरी नसली तरी सायकल चालवण्याची हौस भागवता येऊ शकते. हे ट्रॅक माझे सगळ्यात आवडते ठिकाण आहे. मला वेळ मिळेल तेंव्हा मी या ट्रॅकवरून सायकल चालवण्याचा आनंद लुटत असतो.
दुबईत प्रत्येक गोष्टीसाठी नियम आहेत. म्हणूनच या शहराला एक शिस्तप्रिय शहर म्हटले जाते. सायकल चालवायलाही कडक नियम असतात, हे मला इथे आल्यावर समजले. दुबईतील प्रत्येक सायकलस्वारांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. सायकलचा वापर येथे फक्त हौसेखातर होत नाही, तर दैनंदिन जीवनातही अनेक कामासाठी येथे सायकल वापरली जाते. देअरा, बरदुबई किंवा करामा यासारख्या भागातील अनेक सामान्य कामगार रोज सायकल वापरतात. छोट्यामोठ्या सामानाची ने आण, किराणा सामानाची डिलिव्हरी, जेवणाची डिलिव्हरी किंवा येण्या-जाण्यासाठी शक्यतो येथे सायकलच वापरली जाते. इथल्या कडक नियमांमुळेच सायकल चालवत असताना होणारऱ्या अपघातांची संख्या नगण्य आहे. कायद्यानुसार प्रत्येक सायकलस्वाराने हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालणे बंधनकारक असते. सुरुवातीच्या काळात हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालून जाणारे सायकलस्वार बघून मला खूप विशेष वाटायचे. नंतर या गोष्टीं किती महत्वाच्या आहेत हे समजले. सायकलिंग करतांना आपले ओळखपत्र म्हणजेच एमिरेट्स आयडी बाळगणे बंधनकारक आहे. सायकलस्वारांना पदपथ किंवा मुख्य रस्त्यावरून सायकल चालवण्यास बंदी आहे. सायकलस्वार फक्त सायकलिंग ट्रॅक किंवा ६० किमी प्रति तासपर्यंत वेग मर्यादा असलेल्या दुय्यम रस्त्याचा वापर करू शकतात. वाहतूक पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या कारणामुळे मुख्य रस्त्यावरून सायकल चालवण्यास येथे बंदी घातलेली आहे. हे नियम मोडणाऱ्यास ६०० दिरहम (१२००० रु.) पर्यंत दंड वसूल केला जातो आणि त्याची सायकल जप्त केली जाते. रात्रीचे अपघात टाळण्यासाठी येथे इतर वाहनांप्रमाणे सायकलला पुढचा आणि मागचा लाईट असणे बंधनकारक आहे. झेब्रा क्रॉसिंग पार करताना सायकलवरून खाली उतरावे लागते. त्याचप्रमाणे सायकल चालवताना पादचाऱ्यांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची काळजी सायकल स्वाराने घायची आहे. सायकल चालवत असतांना कानात हेडफोन घालण्यासही येथे बंदी आहे. सायकलवर डबलसीट जाणे येथे दंडनीय आहे. यासाठी किमान २०० दिरहम (४०००रु.) दंड आकारला जातो. सायकल पार्क करण्यासाठी देखील महत्वाचे नियम वाहतूक विभागाने आखून दिलेले आहेत. सायकल फक्त ठिकठिकाणी बनवलेल्या सायकल पार्किंगमध्येच पार्क करावी लागते. शहरात अनेक ठिकाणी विशेषतः मेट्रो स्थानकाबाहेर सायकल पार्क करता येऊ शकते. विविध इमारतींबाहेर सायकल पार्क करण्यासाठी खास सुविधा करण्यात आलेल्या आहेत.
दुबईतील सायकलचा इतिहास फार काही जुना नाही. भारतापेक्षाही येथे सायकल उशिराने आली. १९६० च्या दशकात खनिजतेलाचा शोध लागल्यानंतर अनेक पाश्चिमात्य अभियंते आणि कामगार हे दुबईसह अबुधाबी सारख्या शहरात कामासाठी येऊ लागले. यातील बहुतांश कामगार हे ब्रिटिश होते. ब्रिटिश लोक सवयीप्रमाणे आपल्या बरोबर चैनीच्या अनेक गोष्टी घेऊन आले. त्यात सायकलचाही समावेश होता. त्याकाळी ब्रिटिश बनावटीच्या सायकल जगभर खूप लोकप्रिय होत्या. सुरुवातीच्या काळात सायकलचा उपयोग हा ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या कॅम्पमध्ये केला जात असे. कालांतराने ही सायकल तेलाच्या कारखान्यातील दूरवरच्या साईटवर किंवा कार्यालयात जाण्यासाठी वापरली जाऊ लागली. पुढे शहराचा जसजसा पायाभूत विकास होत गेला तशी दुबईत सामान्य माणसाकडे सायकल येऊ लागली. आज दुबईतील रस्त्यावरून शिस्तीत चालणारे सायकलस्वार आणि वेगवेगळ्या ढंगातील सायकल बघून प्रत्येकाचे मन हरकून जाते.
दुबई शहरातील सार्वजनिक वाहतूकीवरचा ताण कमी करण्याच्या उद्धेशाने येथील रस्ते आणि वाहतूक विभाग (आरटीए) हा सायकलचा वापर वाढवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असे उपक्रम राबवत आहे. 'करीम बाईक' हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. रस्ते आणि वाहतूक विभाग आणि करीम या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने करीम बाईक ही सेवा सुरु केली आहे. या सेवेच्या माध्यमातून भाडेतत्वावर सायकल मिळवता येऊ शकते. करीमने यासाठी दुबईभर जवळपास ३५० स्वयंचलित केंद्रे उभारली आहेत. सायकल भाड्याने घेण्यासाठी करीम बाईक या मोबाईल ऍप मध्ये खाते उघडावे लागते. करीमच्या स्वयंचलित केंद्रावर जाऊन तेथे पार्क केलेल्या सायकलचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ऍपवर पाच अंकी कोड तयार होतो. हा कोड तेथील पार्किंग मशीनमध्ये टाकल्यानंतर सायकल अनलॉक होते. तुम्ही घेतलेली ही सायकल कुठल्याही केंद्रावर परत पार्क करू शकता. करीमची सर्व स्वयंचलित पार्कींग केंद्रे ही सौरऊर्जेवर चालतात. सगळ्या सायकल या आधुनिक बनावटीच्या असून त्या पेडल असिस्ट या तंत्रज्ञानावर चालतात. यामुळे कमी प्रयत्नात जास्त अंतर पार करता येऊ शकते. करीम बाईक या दुबईतील टॅक्सी पेक्षा फार स्वस्त असल्यामुळे त्या फार लोकप्रिय ठरत आहेत. करीमच्या सायकल वापरताना सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. या सायकल चालवताना स्वतःकडे हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असणे गरजेचे आहे. करीम बाईकसारख्या इतर अनेक खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या सायकल प्रेमींसाठी अनेक सुविधा पुरवत आहेत.
सामान्य माणसांना जसे येथे सायकल चालवण्यासाठी उत्तेजन दिले जाते, त्याच पद्धतीने जागतिक स्तरावरील रोड सायकलिंग स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना देखील एक जागतिक मंच उपलब्ध करून देण्याचे काम येथील सरकार करत आहे. यूएईमध्ये आयोजित होणारी 'यूएई टूर' ही रोड सायकलिंग स्पर्धा अल्पावधीतच जगातील सायकलिंग खेळाडूंसाठी आकर्षण ठरली आहे. या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात युसीआई वर्ल्ड टूर (UCI World Tour) च्या माध्यमातून केले जाते. यूएई टूर ही सात वेगवेगळ्या टप्प्यातील एक आव्हानात्मक स्पर्धा आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना यूएईच्या विविध भौगोलिक परिस्थितीचा सामना करत अतिशय खडतर प्रवास करावा लागतो. जागतिक नामवंत खेळाडू आणि संघ या स्पर्धेत भाग घेत असतात.
अँस्टरडॅम शहरानंतर आता दुबई हे 'सायकलिंग फ्रेंडली सिटी' म्हणून नावारूपाला येत आहे. सरकारने प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. सायकलिंगसाठी अनुकूल वातावरण नसतांनाही केवळ सरकारी प्रयत्नांमुळे दुबईत सायकलिंग हा पर्यावरणपूरक क्रीडा प्रकार सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय होत आहे. भविष्यातील इंधनाची अनिश्चितता ध्यानात घेऊन सरकारने योग्यवेळी उचललेले हे पाऊल नक्कीच महत्वाचे वाटते. दुबईत जगभरातील लोक जसे पर्यटनासाठी येतात तसेच ते वाळवंटातील सायकलिंगचा अनुभव घेण्यासाठी देखील येऊ लागले आहेत. सायकल उत्पादक कंपन्यांनी केलेल्या आकर्षक जाहिराती, सायकल चालवण्याचे आरोग्याला असलेले फायदे आणि पर्यावणपुरक वाहन म्हणून जगभरात सायकला परत सोनेरी दिवस आले आहेत. दुबईच्या अनुभवावरून तर मी हे ठामपणे म्हणू शकतो.
(पूर्व प्रसिद्धी : वाघूर २०२१)
■