शनिवार, २० जुलै, २०१९

कविता : रोज तू स्वप्नात येतोस



रोज तू स्वप्नात येतोस
म्हणून कधी जाणवत नाही
आपल्या दोघांतील काळाच्या पडद्याचं अंतर...

हे अंतर
म्हटलं तर अगदीच जवळ
फक्त एका क्षणाचं
म्हटलं तर खूपच लांब
अनेक वर्षांचं

तू
चुकता, कंटाळता येतोस
आणि अजूनही माझ्यासोबत खेळत रहातोस
तेच बालपणीचे खेळ
रंगीत गोट्यांचे रिंगण,
सूरपारंब्या,
धप्पाकुटी आणि
विटी दांडूचा डाव,

पण खरं सांगू का?
स्वप्नाबाहेरील दुनियेत
मी आता खेळत नाही असले खेळ
कारण
मी तेव्हाच सोडून दिलंय खेळणं
तू पडद्याआड गेल्यापासून

तुला नवल वाटेल
पण सांगतो
मी या बाजूला आता मोठा झालोय
मोठा म्हणजे बघ, म्हातारा होईल काही वर्षात
केस पांढरे झालेत, डोक्यावर टक्कल पडलंय
तू मात्र आहे तसाच आहेस
अगदी लहानपणी होतास ना, तसा....
काय रे!
पडद्याआड तुझं वय वाढत नाही का?

रोज तू स्वप्नात येतोस
तेव्हा आपण दोघे मिळून अजूनही हिंडत असतो
रानातील ओढ्याकाठी
कधी मधाचे पोळे काढत
तर
कधी सापाची कात शोधत
तुला ती संग्रही ठेवायला खूप आवडायची
पण आता मी फार घाबरतो
सापाची कात बघीतली की
काळीज धडधडतं , हात थरथरतात

स्वप्नात तू अजूनही हट्ट धरतोस पोहण्याचा
पोहणे हा तुझा आवडता छंद
पोहायला जाता यावं म्हणून
कधी कधी तू शाळेला दांडी मारायचास
तू नेहमीच हट्ट करायचास
मी देखील पोहायला शिकावं म्हणून
पण
मला अजूनही पोहता येत नाही
तुझ्यानंतर कुणी मला पोहणे शिकवलेच नाही

तू रोज स्वप्नात नसता आलास
तर
माझ्या संसाराचा गाडा ओढता ओढता
कदाचित मला विसर पडला असता तूझा
तुझ्या बरोबर घालवलेल्या क्षणांचा
म्हणूनच
तू रोज स्वप्नात येतोस
आणि
मला जाणीव करून देतोस
अतूट आहे आपल्यातील मैत्रीचा धागा
कळाचे पडदे तोडू शकत नाहीत नातीगोती
नाती अमर असतात
आपल्या मैत्री सारखी