२६ डिसेंबर २०१८ : तिब्लिसी शहर भ्रमंती
सकाळी साडेनऊ वाजता आम्ही नाश्ता करून हाॅटेलच्या लाॅबीत येऊन बसलो. हाॅटेलमधील इतर पर्यटक पाहुण्यांची फिरायला जाण्याची लगबग चालू होती. वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांचे गाईड त्यांच्या पाहुण्यांना फिरायला घेऊन जात होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातले होते. आम्ही देखील जॅकेट, टोप्या, मफलरी घालून तयार होतो. बरोबर दहा वाजता आमची टूर गाईड ऐका आम्हाला घेऊन जाण्यासाठी आली. हाॅटेलच्या बाहेर पाउल ठेवताच वारा आणि थंडीने आमचे स्वागत केले. तापमान जवळपास ४ अंश सेल्सिअस होते. ऐका आणि डेव्हिड हे दोघे पुढील सर्व प्रवासात आमच्या बरोबर असणार होते. गाडी चालू झाली आणि जाॅर्जिया पाहण्याचा आमचा कार्यक्रम अधिकृतपणे सुरू झाला.
पंधरा मिनिटांनी आम्ही शहरातील एका उंच टेकडीवर आलो. आजही रस्त्याच्या दुतर्फा सुंदर मॅपलची झाडं दिसली. कुरा नदीवर ठिकठिकाणी अनेक पुल बांधलेले होते. काही पुल जुण्या बांधणीचे तर काही पुल नवीन होते. आम्ही ज्या टेकडीवर आलो होतो तिथं पहिल्या वख्तांग गोर्गासाली राजाचा भव्य अश्वारूड पुतळा होता. या टेकडीवरून कुरा नदी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येवू शकत होती म्हणून पहिल्या वख्तांग राजाने येथे भव्य किल्ला आणि चर्च बांधले. आजही तिथं एक चर्च मोठ्या डौलाने उभे आहे. त्या चर्चला मेटेखी चर्च असे संबोधले जाते. स्थानिक भाषेत मेटेखीचा अर्थ म्हणजे 'राजवाड्याच्या आजूबाजूची जागा' असा होतो. मेटेखी चर्च खूप भव्य आहे आणि त्याची बांधणी देखील खूप मजबूत आहे. आम्ही चर्च पाहण्यासाठी आत गेलोत. जाॅर्जियातील जवळपास ९० टक्के ख्रिश्चन हे ऑर्थोडॉक्स आहेत. ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समजूतीनुसार महिलांना खूप नियम असतात. याची प्रचिती आम्हाला चर्चमध्ये प्रवेश करतांना झाली. चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट पेहराव (ड्रेस कोड) असणे आवश्यक होते. शरीरभर कपडे, पायात बूट, महिलांचे डोके झाकलेले असावे वगैरे. चर्चमध्ये गेल्यावर महिला एका ठराविक ठिकाणानंतर पुढे जावू शकत नाहीत. सोव्हिएत राजवटीच्या काळात जेव्हा कुठलाही धर्म मानण्यास व धार्मिक कार्य करण्यास बंदी होती त्यावेळी या जागेचा उपयोग कैदखाना म्हणून व्हायचा.
मेटेखी चर्च पाहिल्यानंतर आम्ही टेकडीच्या खाली चालत गेलोत. काही अंतरावर युरोप स्केअर नावाचा चौक होता. येथून आम्ही केबल कारमध्ये बसून नारीकाला किल्यावर जाण्यासाठी निघालो. केबल कारमधून तिब्लिसी शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडत होते. जुनी तिब्लिसी, नवी तिब्लिसी, त्याच बरोबर कुरा नदीचे हिरवेगार पाणी, नदीवरचे विविध पुल, हे सर्व खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते. जुन्या तिब्लिसीतील घरं पाहुन कोकणातील घरांची आठवण झाली. कौलारू घराप्रमाणे दोन्ही बाजूला निमूळती घरं जुन्या तिब्लिसीत दिसत होती. केबल कारमधून उतरल्यावर संपूर्ण तिब्लिसी शहराचे दर्शन नारीकाला किल्ल्यावरून झाले. हा किल्ला प्राचीन असून त्याची तटबंदी अजूनही टिकून आहे. तटबंदीच्या आत एक चर्च आहे. या चर्चचे नाव सेंट निकोलस चर्च असून तेराव्या शतकातील जुने चर्च आगीत भस्मसात झाल्यानंतर त्याजागी हे नवीन चर्च उभारण्यात आले आहे. त्याच डोंगरावर एका बाजूला मदर ऑफ जाॅर्जिया चा भव्य पुतळा आहे. तिब्लिसी शहराच्या स्थापनेस १५०० वर्ष पुर्ण झाल्या प्रित्यर्थ सन १९५८ साली या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. किल्याच्या पाठीमागच्या बाजूस नॅशनल बोटॅनिकल गार्डन ऑफ जाॅर्जिया आहे. पुर्वी हे शाही परिवारासाठी बनवलेले एक सुंदर उद्यान होते. कालांतराने या उद्यानाच्या संवर्धनासाठी जाॅर्जिया सरकारने तेथे वनस्पती शास्त्राचे विद्यापीठ स्थापन करून हे उद्यान त्याच्या अखत्यारीत दिले असावे.
किल्ला पाहिल्यानंतर आम्ही मागच्या बाजूने डोंगर उतरू लागलो. थोड्यावेळतच आम्ही रहीवाशी भागात आलोत. निमुळत्या गल्ली बोळातून खाली उतरण्यासाठी वाट होती. किल्ल्याच्या डोंगरामागून एक ओढा वाहतो. त्या ओढ्यावर एक सुंदर पुल बनवला असून त्या पुलास 'प्रेम सेतू' (लव्ह ब्रीज) असे म्हणतात. या छोट्या पुलाच्या दोन्ही कठड्यावर प्रेमीयुगुलांनी छोटछोटी कुलपं लावली आहेत. प्रेमाचं प्रतिक म्हणून प्रियकर किंवा प्रेयसी या पुलावर येवून कुलुप लावतात आणि चावी वाहत्या पाण्यात फेकून देतात. प्रेमीयुगुलांनी आपल्या प्रियकर वा प्रेयसीचे नावे कुलपांवर आवर्जून लिहीलेली होती. त्या पुलाचे दोन्ही कठडे सोनेरी कुलपांनी भरून गेले होते. असे पूल पॅरिस आणि एमस्टरडॅम येथे देखील आहेत. गंमत म्हणून कुणीतरी सुरू केलेली ही संकल्पना जगभर प्रसिद्ध पावत आहे.
प्रेम सेतू ओलांडून आम्ही उताराने जुन्या तिब्लिसीकडे मार्गक्रमण करू लागलो. काही अंतरावर गेल्यावर उजव्या हाताला तिब्लिसीतील प्रसिद्ध जुमा मस्जिद दिसली. पारंपारिक लाल विटांच्या बांधकामातील ती मस्जिद जाॅर्जियातील मुस्लिमांचे मुख्य प्रार्थनास्थळ आहे. जाॅर्जियाचा राष्ट्रीय धर्म जरी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन असला तरी तिथं धार्मिक स्वातंत्र्य आहे असं आमची गाईड ऐका म्हणाली.
थोडंसं पुढे आल्यावर रस्त्यावर कला सादर करणाऱ्या काही स्थानिक कलाकारांनी आम्हाला आडवलं. बहुधा त्यांना भारतीय लोक बरोबर ओळखता येत असावेत. आम्हाला त्यांनी विचारले "इंडियन?" आम्ही मान डोलावलताच त्यांनी राज कपूरचे प्रसिद्ध गाणे गायला सुरूवात केली.
"मेरा जूता है जपानी
ये पतलून इंग्लिशतानी
सर पे लाल टोपी रुसी
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी"
ये पतलून इंग्लिशतानी
सर पे लाल टोपी रुसी
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी"
भारतीय सिनेमा येथे फार लोकप्रिय आहे असं समजले. विषेशतः राज कपूरचे जाॅर्जियामध्ये खूप फॅन आहेत. जुन्या पिढीतील लोक अजूनही त्यांचे नाव घेतात. या आधी मी कुठेतरी याबाबत वाचले होते पण आज ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.
प्रेम सेतू वरून आम्ही जो ओढा ओलांडून पलिकडे गेलो होतो त्याच ओढ्याच्या कडेने आम्ही जात होतो. थोडंसं पुढे आल्यावर आम्ही परत ओढ्यावरला एक पादचारी पुल ओलांडला. या पुलावर देखील काही कुलपं लावलेली आढळली. कदाचित भविष्यात हा देखील तिब्लिसीचा प्रेस सेतू नंबर दोन होईल. ओढा ओलांडताच तिब्लिसीतील प्रसिद्ध सल्फर बाथ (गरम पाण्याचे झरे) लागले. हे गरम पाण्याचे झरे छोट्या छोट्या इमरती बनवून त्यात बंदिस्त केले आहेत. आत अंघोळ करण्यासाठी पंचतारांकित हाॅटेलप्रमाणे सुविधा करण्यात आल्या आहेत. यात अंघोळ करण्यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात. आम्ही फक्त बाहेरूनच त्याची माहीती घेतली. पूर्वीच्या काळी येथे वर्षातील ठराविक कालावधीत यात्रा भरायची. बाया आपल्या मुलांसाठी योग्य वधू निवडण्यासाठी येथे येत असत. आणि सल्फर बाथ मध्ये अंघोळ केल्यावर अनेक प्रकारचे त्वचा रोग बरे होतात ही देखील मान्यता आहे. त्यामुळे अनेक पर्यटक आवर्जून येथे अंघोळ करतात.
जुनी तिब्लिसी खरोखरच फार सुंदर होती. रस्ते दगडी विटांनी बनवलेले (पेव्हींग ब्लॅक्स) होते. यावून चालतांना वेगळीच मजा येत होती. सल्फर बाथ नंतर आम्ही सायओनी चर्चमध्ये आलोत. आत्तापर्यंत बघीतलेली सगळी चर्च याच बांधनीची होती. आणि खरोखरच जाॅर्जियातील चर्चच्या इमारती खूपच सुंदर होत्या. पिवळसर रंगातील दगडांनी या चर्चची बांधणी केलेली आहे. काही अंतरावरून पाहिल्यास ही सगळी चर्च सोनेरी रंगाची वाटतात.
आम्ही ज्या रस्त्याने जात होते बहुधा तो जुना बाजार असावा. रस्त्याच्या दोन्ही बाजून असंख्य दुकाणं होती. गालीचे, स्थानिक पदार्थ, भेटवस्तू, सोव्हिनियर्स, पेंटींग त्याच बरोबर काही रेस्टॉरंट देखील होते. विशेष म्हणजे जाॅर्जियात शाकाहारी जेवन मिळते याचं मला नवल वाटलं. मी ऐकाला याविषयी विचारले असता ती म्हणाली की, जाॅर्जियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन वर्षातील ठराविक काळ फक्त शाकाहारी जेवण घेतात. त्यामुळे येथे शाकाहारी जेवण मिळते. येथे शेपूची भाजी आणि वांग्याची भाजी फार प्रसिद्ध आहे.
काही अंतरावर आल्यानंतर आम्ही एका छान सोव्हिनियरच्या दुकानात गेलोत. तसं मलाही सोव्हिनियर्स जमा करण्याचा खूप छंद आहे. चलनी नोटा, नाणी, पोस्टाची तिकीटे, पोस्ट कार्ड या गोष्टी मी मोठ्या प्रमाणात जमवलेल्या आहेत. माझ्याकडे जवळपास सव्वाशे देशांच्या नोटा आहेत. तसेच वेगवेगळ्या देशांची खूप पोस्टकार्ड देखील आहेत. मी युनेस्को जागतिक वारसास्थळांची पोस्टकार्ड जमवत असतो. या दुकानात गेल्या बरोबर मी माझ्या आवडीची पोस्टकार्ड विकत घेतली. ओवीने एक जाॅर्जियाचा झेंडा आणि एक किचैन विकत घेतले.
तिब्लिसी शहर फिरण्याचा आमचा महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला होता. यानंतर कुरा नदीवर बनवलेल्या शांती सेतू (ब्रीज ऑफ पीस) याला आम्ही भेट दिली. हा कुरा नदीवर बांधलेला एक पादचारी पुल आहे. यांचे बांधकाम हे लोखंडी असून त्याच्या छताची सजावट हिरवट रंगाच्या काचांनी केली आहे. संध्याकाळी यावर खूप आकर्षक रोषणाई करण्यात येते. शांती सेतू आता तिब्लिसी शहरातील एक आकर्षण बनले आहे. तिब्लिसीला भेट देणारे पर्यटक नक्की या पुलास भेट देतात. या पुला शेजारीच कुरा नदीत नौकाविहार करण्याची सुविधा आहे. आम्ही या शांती सेतूवर मनसोक्त फोटो काढले.
शेवटच्या टप्प्यात आम्ही तिब्लिसी शहरातील सर्वात उंच डोंगरावर आलो. येथे एक मनोरंजक पार्क बनवला आहे. यात मुंबईतील एस्सेल वर्ल्ड सारख्या गोष्टी आहेत. डोंगराच्या एका बाजूला तिब्लिसी दुरदर्शनचा उंच मनोरा आहे. याच डोंगरावर जाण्यासाठी सुप्रसिद्ध फनिक्युलर ट्रेन आहे. ही ट्रेन डोंगराच्या उतारावरून जवळपास साठ ते सत्तर अंशाच्या कोनात वर खाली जाते. आम्ही डोंगर कारमधून चढून गेलो होतो तर खाली उतरताना फनिक्युलर ट्रेनमध्ये बसून आलोत. इतक्या उतारावर ट्रेनमध्ये बसून येणे खूपच मजेशीर अनूभव होता.
फनिक्युलर ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर आजचा तिब्लिसी पाहण्याचा कार्यक्रम संपला. आम्हाला ड्रायव्हरने हाॅटेलवर आणून सोडले. सकाळी गेलो होतो त्याच मार्गाने परत आलो. तिब्लिसी शहरात वाहतूकची कुठे कोंडी झालेली आढळली नाही. सगळे जण वाहतूकीचे नियम पाळतांना दिसत होते. शहरात सार्वजनिक वाहतूक चांगली होती. सरकारी पिवळ्या रंगाच्या खूप बस रस्त्याने ये जा करत होत्या. तिब्लिसी शहरात मेट्रो देखील आहे. तिब्लिसी हे इतर कुठल्याही युरोपियन शहरासारखे सुंदर होते.
□□□
□□□