संपूर्ण अरब खंड हा वाळवंटाने व्यापला आहे. अरब खंडाचा मध्य भाग तर प्रखर आणि अती उष्ण वातावरणामुळे निर्मनुष्य आहे. त्यामुळे येथील प्राचीन काळापासून लोकवस्ती ही सागर किनार्याच्या आवती भोवती व वाळवंटातील नैसर्गिक जलस्रोताच्या ठिकाणी असायची. या नैसर्गिक जलस्रोतांना मरूद्यान (Oasis) असे म्हणतात. इथली जमीन ही रेतीची आणि नापीक असल्याने शेती करण्यायोग्य नव्हती आणि लोक पाण्याच्या स्त्रोताबाबत नेहमीच चिंतेत असायचे. एकूणच शेती करण्याच्या संधी फारच कमी होत्या. वाळवंटात आणि कमी पाण्यात वाढणारे खजुराचे पिक हाच अरबांचा मुख्य शेती व्यवसाय होता. खजुराच्या झाडाच्या सावलीत खोडाशेजारी हे लोक काही प्रमाणात भाजीपाला आणि धान्य पिकवायचे. पण हे पिकवलेले अन्न सर्व जमातीच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते त्यामुळे येथील मुख्य आहार हा उंटाचे मांस आणि मासे हाच होता. अरब हे प्राचीन काळापासून भटकणाऱ्या टोळ्यात रहायचे. पाण्याच्या स्त्रोतानुसार व हवामानानुसार त्यांच्या जमाती एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी स्थानांतरीत व्हायच्या. खजुराचे पिक उन्हाळ्यात येत असल्याने आणि समुद्र किनार्याचे भीषण दमट वातावरण टाळण्यासाठी अरबांच्या टोळ्या उन्हाळ्यात वाळवंटातील जलस्रोताच्या आसपास लोकवस्ती करायच्या. खजुराचा मोसम संपल्यावर अरब टोळ्या हिवाळ्यात मासेमारी करण्यासाठी परत समुद्र किनारी परतायच्या. कालांतराने काही कुटुंब ही मासेमारी करण्यासाठी समुद्र किनारीच स्थायिक झाले. मासेमारी करत असताना आखाताच्या उथळ पाण्यात अरबांना मोती शिंपल्यांचा शोध लागला. मासेमारी दरम्यान सापडलेले मोती हे अरब जमवून ते व्यापारी लोकांना विकत.
स्थानिक भाषेत 'लूलू' म्हणजे मोती हे मध्यपूर्वेतील खनिज तेलाचा शोध लागण्या आधी उत्पन्नाचे मुख्य साधन होते. मोती शिंपल्यांचे नैसर्गिकरीत्या आखाताच्या उथळ पाण्यात रोपन होत असे. मोती व्यवसाय ह्या भागाच्या संस्कृतीचा किती जुना भाग आहे हे सांगणे कठीण आहे, पण संयुक्त अरब अमिरात आणि आखाती देशातील विविध पुरातत्व उत्खनना वरून येथील जमाती अंदाजे 5000 वर्षापासुन हा व्यवसाय करत असावेत हे याठिकाणी सापडलेल्या मोत्यावरून स्पष्ट होते. मोत्यांचा व्यापार हा प्राचीन रोमन साम्राज्यातही चालत होता. रास अल खैमाह हे प्राचीन मोती व्यापाराचे केंद्र होते.
समुद्रकिनारी खेड्यात हळूहळू बंदरे विकसित होऊ लागली. आबू धाबी, दुबई, शारजा, रास अल खैमाह ही खेडी व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला येऊ लागली. वेगवेगळ्या अरब जमाती व्यवसायात उतरल्याने या खेड्यात लोकवस्ती वाढत गेली. या छोट्या छोट्या बंदरातून भारतीय उपखंडात आणि युरोप मध्ये व्यापार होऊ लागला. उद्योगधंदे करण्यासाठी पोषक वातावरण आणि साधन संपत्तीचा अभाव यामुळे विनियोगाचे एकच माध्यम होते ते म्हणजे जलमार्गे होणारी वाहतूक. अरब हे मोती, खजूर, उंट, घोडे यांच्या बदल्यात मसाले, चहा, कॉफी, तंबाखू, खाद्यान्न, कापड विकत घेत. पुढे आठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात आखातातील नैसर्गिक मोत्यांची मागणी विशेषतः भारतीय उपखंडातील राजे राजवाडे याच्याकडून वाढत गेली. मंबई हे त्या काळी आखाती मोत्यांची मोठी बाजारपेठ होती.
मोती शिंपल्यांचा शोध घेण्यासाठी 18 ते 20 लोक एका मध्यम आकाराच्या बोटीवर निघत. ही बोट साधारणे मे ते सप्टेंबर अशी चार पाच महिने समुद्रात मोती शोध करायची. या प्रवासात खाण्यासाठी लागणार्या वस्तू जसे तांदुळ, पीठ, काॅफी, तंबाखू, खजूर व इतर किराणा सामानाबरोबर मांसाहार करता यावा यासाठी काही वेळा शेळ्या मेंढ्याही बोटीत नेत. बहुधा ते कामगार समुद्रात पकडलेले ताजे मासे आणि भात असा आहार घेत. शरीराला पुरेशी ऊर्जा व जीवनसत्त्व मिळण्यासाठी हे कामगार खजुराचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असत. किनार्यावरूनच गोड्या पाण्यानी भरलेले लाकडी पिंप बोटीत असत. पाणी व खाद्य पदार्थ संपल्यावर बोटी जवळपासच्या बेटावर किंवा किनार्याच्या गावात जाऊन जरूरी सामानाचा भरणा करत. बोटीत कमीत कमी आठ पानबुडे (Divers), बुड्यांना ओढणारे काही ताकतीचे लोक (Haulers), स्वयंपाकी, बोटीतील कामगारांचा उत्साह वाढवण्यासाठी एक गायक आणि या सर्वावर देखरेख ठेवणारा व काळजी घेणारा नायक ( Captain) असे. एकोणिसाव्या शतकाच्या प्ररंभी उपलब्ध माहितीनुसार जवळपास 1200 बोटी आणि 22000 कामगार या व्यवसायात सामील होते.
खोल समुद्रात बुडी घेणे हे फार कठीण व जोखमीचे काम होते. बरेचदा बुडी घेणार्याच्या हे काम जीवावर बेतायचे. बुड्याचे काम सकाळी सूर्योदया पासून ते सुर्यास्त होई पर्यंत चालायचे. बुडी मारणारे दिवसातून किमान 50 बुड्या घेत. बुडी साधारणपणे 40 मीटर खोल व जास्तीत जास्त दोन मिनिटे चालायची. जेवण करणे, काॅफी पिणे किंवा प्रार्थना करणे या कामासाठी पानबुडे यांना सुट्टी मिळायची. बुडी घेणार्याच्या पायाला दावे बांधलेले असत. पाण्यात लवकर बुडावे यासाठी त्यांच्या पायाला वजनी दगड बांधलेला असे. नाकात समुद्राचे पाणी जावू नये यासाठी नाक छोट्या चिमट्याने बंद केलेले असे. कानात विशिष्ट प्रकारच्या मेणाचे बोळे घालून बंद केलेले असत. हाताची बोटे चामड्याचे मोजे वापरून सुरक्षित केली जात. बुडी घेतल्या नंतर तळाला शक्य तेव्हढे शिंपले जमा करून पानबुडे त्यांच्या गळ्यात बांधलेल्या पिशवीत टाकत. काम संपल्यावर बोटीवरच्या ओढणार्यास इशारा केल्या नंतर तो संपूर्ण ताकदीनिशी पानबुड्याला वर ओढुन काढे. पानबुड्या पाण्यातून वर आल्यावर त्याच्या गळ्यातील पिशवी तत्काळ रिकामी करण्यात येई तोपर्यंत तो दम घेऊन पुढच्या बुडीसाठी तयार होत असे. दिवसभराच्या परिश्रमानंतर सर्व कामगारांना जेवण मिळायचे. थोड्या विश्रांती नंतर नायकाच्या कडक देखरेखी खाली दिवसभर जमलेले शिंपले फोडण्यात येत. अंदाजे 50 ते 200 शिंपल्यात एखाद दुसराच मोती मिळायचा. या शिंपल्यातून विविध आकाराचे लहान मोठे मोती मिळत. त्यांच्या आकारानुसार त्यांची वर्गवारी करण्यात येत. मोठ्या आकाराच्या मोत्यांना जास्त मागणी व भाव असे.
जमवलेले मोती व्यापाऱ्यांना विकण्यात येत. मोत्यांचा व्यवसायाच्या अर्थकारणाचे बरेच प्रकार होते. जर नायकाची स्वतःची बोट असल्यास त्याला सर्व मोती व्यापाऱ्याला विकण्याचा अधिकार असे. अन्यथा पतपुरवठा करणारे सावकार मंडळी हे सर्व मोती घेऊन कामगारांना त्याचा ठरलेला हिस्सा देत. कामगार हे रोजंदारीवर काम न करता उत्पन्नातून मिळणाऱ्या नफ्यात वाटा घेत. पानबुड्यांना ओढणार्या कामगारापेक्षा दुप्पट पैसे मिळत. या व्यवसायात रोजंदारीवर काम नसल्याने फार धोके होते. एकतर जीवावर बेतुन समुद्रात बुड्या मारायच्या आणि त्यात जर मोसम चांगला गेला नाहीतर कामगारचे मोठे आर्थिक नुकसान व्हायचे. हे कामगार पतपुरवठा करणाऱ्या सावकाराकडून आगाऊ उचल घ्यायचे त्यामुळे वाईट मोसमात मोती कमी मिळाल्यास त्यांना कर्ज बाजारीही व्हावे लागायचे. पण बरेचदा त्यांना मनाजोगती कमाई व्हायची. अशा वेळी हे कामगार त्या पैशातून उंट आणि खजुराच्या बागात गुंतवणूक करून वर्षभर आरामात जीवन जगायचे.
1920 नंतरचे दशक या व्यवसायासाठी काळ म्हणून सामोरे आले. जपानमध्ये कृत्रिमरीत्या मोत्याची लागवड सुरू झाली. हे मोती अतिशय कमी किंमतीत उपलब्ध होऊ लागल्याने आखाती मोत्याची मागणी घटत जावुन पुढे ती बंदच झाली. 1930 च्या दशकात खनिज तेलाचा शोध लागण्यापर्यंत येथील अर्थव्यवस्था कोलमडून पडली. या व्यवसाशी संबंधित सर्व कामगारांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आणि प्राचीन अशा मोती व्यवसायाची अखेर झाली.
_गणेश पोटफोडे (दुबई)
संदर्भ
1. Abu Dhabi Authority for Culture & Heritage
2. Records of Dubai 1761-1960 (Volume 3)