ऑक्टोबर सरता सरता दुबईतील तापमानाचा पारा खाली उतरू लागतो. जीव नकोसा करणारा, अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा संपतो आणि चाहूल लागते ती हिवाळ्याची. नोव्हेंबर महिन्यात तापमान सामान्य होत जाते. बहुतेक घरातील ए सी बंद राहतात. भर दुपारी बाहेर फिरताना उन्हाची रखरख जाणवत नाही.
डिसेंबर महिन्यात बहुतेक वेळा आकाश काळ्या ढगांनी व्यापून जाते. या महिन्यात बरेचदा पाऊल अनुभवायला मिळतो. पाऊस आणि उत्तर पश्चिम दिशेकडून वाहणारा वारा यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. सलग आठ नऊ महिने अडगळीत पडलेली स्वेटर, मफलर बाहेर पडू लागतात. पावसाचे ठराविक प्रसंग सोडल्यास आकाश मोकळे असते. उबदार कोवळे उन अंगाखांद्यावर घ्यावेसे वाटते. दुबईतील बाग बगीचे, रस्ते मनमोहक सुगंधी फुलांनी सजवले जातात. स्वतःला वातानुकूलित घरात, गाडीत बंद करून ठेवणारे दुबईकर मुक्तपणे उघड्या गाडीतून फिरू लागतात.
दुबईतील रस्ते पर्यटकांनी भरून जातात. दुबईतील गुलाबी थंडी अनुभवायला देशविदेशातील पाहुणे डेरेदाखल होतात. परदेशी पाहुण्यात पक्षांचाही समावेश असतो. दुबई क्रिकवर परदेशी पक्षी मनमोकळेपणे वातावरणाचा आनंद लुटतात. आपल्या देशात अंग गोठणाऱ्या कडाक्याच्या थंडीपेक्षा इथले वातावरण त्यांना स्वर्गा सारखे भासू लागते.
नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबई आता जागतिक केंद्र बनले आहे. येथली आतिषबाजी पाहण्यास लाखो पर्यटक येतात. बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब, पाम आयलंड वरील नयनरम्य आतिषबाजी अनुभवायला प्रचंड गर्दी होते. नाताळ व नवीन वर्षाची येथे सरकारी सुट्टी असल्याने डिसेंबरचा शेवटचा आठवडा उत्साहात सरून जातो.
जानेवारी महिन्यात दुबई शॉपिंग फेस्टिवलची सुरूवात होते. दुबईतील हाॅटेल व पर्यटन व्यावसायिकांसाठी हा सुवर्ण काळ असतो. विविध ऑफर्स आणि योजना घेऊन दुबईतील दुकाने व माॅल्स तयार होतात. सोने खरेदीला उधाण येते. सोन्याची या दिवसात एवढी मोठी खरेदी होते की दर दिवशी एका भाग्यवान विजेत्याला चक्क एक किलो सोने बक्षिस म्हणून दिले जाते.
ग्लोबल व्हिलेज, समुद्र किनारे, माॅल्स अक्षरश: भरून जातात. या दिवसात लोक डेझर्ट सफारीचा आनंद घेतात. थंड वातावरणात वाळवंट अनुभवायला मिळतो. बरेच लोक वाळवंटात कॅम्प करून राहतात. फेब्रुवारी सरता सरता दुबईतील पर्यटक मायदेशी निघतात.
मार्च सुरू झाल्यावर तापमानाचा पारा परत चढू लागतो. हवा हवासा वाटणारा हिवाळा संपलेला असतो. पूढील आठ महिने हिवाळ्याची वाट पाहण्यात कंठावे लागतात.